शेती

महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर ; सांगली जिल्ह्यातील केवळ चार तालुक्यातच दुष्काळ ; इतर तालुके वगळले

महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर ; सांगली जिल्ह्यातील केवळ चार तालुक्यातच दुष्काळ ; इतर तालुके वगळले
26 Sep 2026, 11:37 1,610 views

पलूस, कडेगाव, तासगाव, खानापूर, शिराळा, वाळवा तालुका वगळल्याने नाराजी

मुंबई : क्रांती वृत्तसेवा : राज्यातील विविध भागांत पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषीपंपांच्या वीजबिलात सवलत, शेतीशी संबंधित कर्जवसुलीस स्थगिती, पीक कर्जाचे पुनर्गठन तसेच जमीन महसुलात सवलत अशा उपाययोजना करण्यात येणार आहेत.

दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपांच्या वीजबिलात सवलत देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांकडून शेतीशी संबंधित कर्जाची वसुली स्थगित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चालू हंगामातील पीक कर्जाचे मध्यम मुदतीच्या कर्जात पुनर्गठन केले जाणार आहे. त्यामुळे कर्जफेडीचा ताण कमी होण्यास शेतकऱ्यांना मदत होणार आहे.

दुष्काळग्रस्त तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या पाल्यांनाही या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात सवलत किंवा माफी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांना जमीन महसुलात शंभर टक्के सूट देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

सांगलीतील सात तालुक्यांचा समावेश

सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि मिरज (ग्रामीण भाग) या सात तालुक्यांचा समावेश आहे. जत हा पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करणारा जिल्ह्यातील महत्त्वाचा तालुका असून, पूर्व भागातील दुष्काळी पट्ट्याला या निर्णयामुळे दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, वाळवा, शिराळा, पलूस, कडेगाव, खानापूर, तासगाव या तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे या तीन तालुक्यांना सद्यस्थितीत जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळी सवलती लागू होणार नाहीत.

५ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष पंचनामे

पिकांच्या नुकसानीचे अचूक मूल्यांकन करण्यासाठी ५ ऑक्टोबर २०२६पासून प्रत्यक्ष क्षेत्र पाहणी करून पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पावसातील खंड, पिकांची प्रत्यक्ष स्थिती आणि नुकसानीचे प्रमाण यांचा विचार करून बाधित क्षेत्र निश्चित केले जाणार आहे.

ज्या गावांमध्ये ३३ टक्क्यांपेक्षा अधिक पीक नुकसान झाल्याचे आढळेल, त्या गावांना दुष्काळी मदतीसाठी पात्र ठरविण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पंचनाम्यांनंतरच पीक नुकसानीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

खरीप पिकांवर पावसाच्या खंडाचा परिणाम

राज्यातील अनेक भागांत पावसातील खंडामुळे खरीप पिकांवर परिणाम झाला आहे. सोयाबीन, कापूस, मूग, उडीद यांसह विविध पिकांना पावसाच्या कमतरतेचा फटका बसला आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची स्थिती चिंताजनक असल्याचे अहवाल समोर आले आहेत.

पंचनाम्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना किती मदत द्यायची, कोणत्या क्षेत्राचा त्यात समावेश करायचा आणि मदत कोणत्या निकषांनुसार वितरित करायची, याबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या पंचनाम्यांकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा:
Facebook Twitter WhatsApp
कमेंट्स (0)

अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!