महाराष्ट्र

अलमट्टीत करारापेक्षा जादा पाणीसाठा ; कृष्णाकाठला पुन्हा महापुराची भीती ; सरकारने नियंत्रण ठेवावे

अलमट्टीत करारापेक्षा जादा पाणीसाठा ; कृष्णाकाठला पुन्हा महापुराची भीती ; सरकारने नियंत्रण ठेवावे
31 Jul 2026, 16:55
आ. अरुण लाड : सर्वोच्च न्यायालयात ठाम भूमिका मांडण्याची मागणी; इरिगेशन फेडरेशन, सर्वपक्षीय पदाधिकारी व पाटबंधारे अधिकारी यांची व्यापक बैठक ; जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन
सांगली : प्रतिनिधी.                                                  कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणात सध्या ठरलेल्या करारापेक्षा जादा पाणी साठविले आहे. यामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत महाराष्ट्र सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष व आमदार अरुण लाड यांनी केली. तसेच अलमट्टीची उंची वाढविण्याबाबत कर्नाटकची मनमानी सुरू आहे. या निर्णयाला प्रतिबंध करण्यासाठी  महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात ठाम भूमिका मांडावी, अशी मागणीही आमदार लाड यांनी केली.         महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, सांगलीतील सर्वपक्षीय पदाधिकारी यांची शुक्रवारी सांगली पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांसोबत व्यापक बैठक झाली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाला यासंदर्भातील सविस्तर निवेदन देण्यात आले.
बैठकीत आ. लाड म्हणाले, कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची 517 मीटरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असतानाही पुढील कार्यवाही सुरू असल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली होती. तसेच आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यांनीही या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने संबंधित अधिसूचनेला स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे अंतिम निर्णय होईपर्यंत कर्नाटक सरकारला धरणाची उंची वाढविण्याचा अधिकार नाही. राज्य सरकारने या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे.  शासनाकडून सर्वोच्च न्यायालयात प्रभावी कायदेशीर लढा उभारला गेला नाही तर कृष्णा नदीकाठच्या लाखो नागरिकांचे जीवन, शेती आणि अर्थव्यवस्था धोक्यात येऊ शकते. त्यामुळे राज्य शासनाने तत्काळ  आवश्यक ती सर्व कायदेशीर पावले उचलावीत.  सध्या कोयना धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे. धरणात 86 टीएमसीहून अधिक पाणीसाठा झाला आहे. मुसळधार पावसामुळे कोयना धरणातून सुरू असलेल्या विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. अलमट्टी धरणात मात्र दोन्ही राज्यात ठरलेल्या करारापेक्षा जादा पाणी साठवले जात आहे. पुढील काळात पावसाचा जोर कायम राहिल्यास कृष्णा नदीच्या पात्रातील प्रवाह आणखी वाढू शकतो. अशा परिस्थितीत अलमट्टी धरणात पाणी अडविण्यात आल्यास किंवा विसर्गाचे योग्य नियोजन न झाल्यास सांगली, कोल्हापूर आणि कृष्णा खोऱ्यातील पूरस्थिती गंभीर होण्याची भीती आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचे शास्त्रशुद्ध नियोजन करावे, अशी मागणी आमदार लाड यांनी यावेळी केली. 
२००५, २०१९ आणि २०२१ मधील महापुरामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत शेती, उद्योग, पर्यावरण, सार्वजनिक सुविधा आणि जनजीवनाचे मोठे नुकसान झाले होते. तसेच २०१९ मधील ब्रह्मनाळ (ता. पलूस) येथील दुर्दैवी दुर्घटनेत १७ जणांचा बळी गेला होता. या घटनांचा उल्लेख करून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी दीर्घकालीन आणि प्रभावी उपाययोजना राबविण्याची गरज बैठकीला उपस्थित इरिगेशन फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा, सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव पाटील यांनी केली. 
यावेळी जिल्हा प्रशासन व पाटबंधारे विभागाला दिलेल्या निवेदनात केंद्रीय जलआयोगाच्या २०१९ मधील मार्गदर्शक तत्त्वांनुसार अलमट्टी धरणाचे संचालन करावे, पावसाळ्याच्या काळात धरणाचे सर्व दरवाजे आवश्यकतेनुसार उघडे ठेवून कृष्णा नदीचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी, तसेच धरणाची पातळी ५१९ मीटरपेक्षा अधिक वाढविण्याचा निर्णय न्यायालयाचा अंतिम निकाल लागेपर्यंत स्थगित ठेवावा, अशा महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. 

  • बैठकीस महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे कार्याध्यक्ष  आर. जी. तांबे, क्रांती सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन जयप्रकाश साळुंखे, संचालक शितल बिरनाळे, सांगली जिल्हा उपाध्यक्ष जे. पी. लाड, सचिव विश्वास पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा, सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव पाटील,  अशोक पवार, क्रांती कारखान्याचे माजी संचालक पोपट फडतरे, उमेश जोशी, सुभाष वडेर, दिनकर लाड यांच्यासह इरिगेशन फेडरेशनचे पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.                                      "महाराष्ट्रातील विशेषतः सांगली, कोल्हापूर आणि कृष्णा खोऱ्यातील नागरिकांचे सुरक्षित राहण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारशी समन्वय साधून कर्नाटकवर अलमट्टीचा पाणीसाठा कमी करण्यासाठी दबाव आणावा. तसेच तेलंगणाला पाणी मिळावे यासाठीच्या याचिका दाखल आहे. त्याचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याअगोदर महाराष्ट्र सरकारला कोर्टात जावं लागेल."             -आ. अरुण लाड                                                                        लवकरच बैठक घेऊ : जिल्हाधिकारी घोष                                                                         जिल्हाधिकारी घोष यांनी इरिगेशन फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले की, मी लवकरच पाटबंधारे विभागाची बैठक घेऊन हा विषय मार्गी लावणार आहे.  तसेच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही सातत्याने कर्नाटक सरकार व अलमट्टी धरण प्रशासनाशी संपर्क साधून आहे. सांगली पाटबंधारे विभागातील एका अधिकाऱ्याची अलमट्टी धरणावर पाणी पातळी पाहण्यासाठी नेमणूक केली आहे. तेथून आम्हाला  पाणी पातळीचे व निसर्गाचे दररोज अपडेट्स येत आहेत. अलमट्टीच्या व कोयनेच्या विसर्गात एकसमानता ठेवण्यात येत आहे. एल निनोच्या भीतीमुळे बहुतांशी  लवकर धरणे भरून घेतली आहेत. त्यामुळेच अलमट्टीत सध्या जादा पाणीसाठा आहे. ही बाब आम्ही  पाटबंधारे विभागाचे मुख्य सचिव यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे याबाबत लवकरच राज्य पातळीवर बैठक घेऊन तोडगा काढला जाईल.

शेअर करा:
Facebook Twitter WhatsApp
कमेंट्स (0)

अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!