महाराष्ट्र

रेणावी घाटात दोन बसचा भीषण अपघात ; दोघे ठार ; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता२८ हून अधिक जखमी

रेणावी घाटात दोन बसचा भीषण अपघात ;  दोघे ठार ; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता२८ हून अधिक जखमी
13 Aug 2026, 19:22

विटा : विटा-भिवघाट मार्गावरील रेणावी घाटात दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून २८ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचाही मोठ्या प्रमाणात समावेश असल्याची माहिती आहे.

नियंत्रण सुटल्याने दोन बसची धडक

मिळालेल्या माहितीनुसार, खानापूरकडून विट्याकडे येणारी ‘विजापूर-जत-कराड मार्गे मेढा’ एसटी बस (एमएच १४ बीटी ४२७०) रेणावी घाटातून जात असताना चालकाचा बसवरील ताबा सुटला. त्याचवेळी विट्याकडून भिवघाटच्या दिशेने जाणारी दुसरी एसटी बस (एमएच १४ बीटी ३२५५) समोरून येत होती.

नियंत्रण सुटलेल्या बसची समोरून येणाऱ्या बसला जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.

वृद्ध पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

या अपघातात मृत्युमुखी पडलेले दोन्ही प्रवासी वृद्ध पती-पत्नी असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मृतांमध्ये एका वृद्ध महिलेचा आणि एका वृद्ध पुरुषाचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. मृतांची अधिकृत ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

जखमींवर विविध रुग्णालयांत उपचार

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमी प्रवाशांना उपचारासाठी विटा ग्रामीण रुग्णालय तसेच स्थानिक खासगी रुग्णालयांत दाखल करण्यात आले.

विटा ग्रामीण रुग्णालयात ११ जखमींवर उपचार सुरू असून, त्यापैकी गंभीर जखमी असलेल्या पाच प्रवाशांना पुढील उपचारासाठी सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

घाटातील वाहतूक काही काळ विस्कळीत

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त बस बाजूला करण्यासह वाहतूक सुरळीत करण्याचे काम करण्यात आले. या दुर्घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

रेणावी घाटातील या भीषण अपघातामुळे विटा-भिवघाट मार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. घाटातील धोकादायक वळणे, वाहनांचा वेग आणि वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजनांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

शेअर करा:
Facebook Twitter WhatsApp
कमेंट्स (0)

अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!