कुपवाड येथे सांगली जिल्हा महानुभाव परिषद आणि श्रीकृष्ण ज्ञानमंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांचा ८०६ वा अवतरण दिन सोहळा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. ‘चक्रधर स्वामी यांचे तत्त्वज्ञान सर्वव्यापी असून, त्यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन सातारा आश्रमाचे संचालक महंत सातारकर बाबाजी महानुभाव यांनी केले.
महंत सातारकर बाबाजी महानुभाव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात त्यांनी श्रीचक्रधर स्वामी यांच्या विचारांचे महत्त्व विशद केले. सुमारे आठशे वर्षांपूर्वी स्वामींनी समाजाला अहिंसा, समता आणि विश्वकल्याणाचा संदेश दिला. स्वामींचे तत्त्वज्ञान केवळ एका विशिष्ट समाजापुरते मर्यादित नसून त्यातील मानवतावादी विचार सर्वव्यापी आहेत. हे विचार अधिक व्यापक प्रमाणात समाजापर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
जळगाव येथील महंत सारंगधर बाबा पंजाबी, फलटण येथील महंत विरागव्यास बाबाजी बिडकर तसेच परमपूजनीय जयेशमुनीदादा अंकुळनेरकर यांनी मनुष्य जीवनातील भक्ती, संयम आणि श्रद्धेचे महत्त्व विशद केले. श्रीचक्रधर स्वामींच्या तत्त्वज्ञानाचा अंगीकार करून मनुष्य जन्माचे सार्थक करावे, असे आवाहन त्यांनी केले.
महाराष्ट्र ही संतांची आणि देवभूमी म्हणून ओळखली जाणारी भूमी असून, श्रीचक्रधर स्वामींनी महाराष्ट्राचा उल्लेख ‘सात्त्विक भूमी’ असा केल्याचे वक्त्यांनी नमूद केले. श्रीचक्रधर स्वामींचा अवतरण दिन शासकीय स्तरावर साजरा व्हावा आणि स्वामींचे विचार गावागावांत तसेच तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचावेत, या दृष्टीने शासनाकडून होत असलेल्या प्रयत्नांचाही उल्लेख यावेळी करण्यात आला.
सांगली जिल्हा महानुभाव परिषदेचे अध्यक्ष परमपूजनीय महंत श्री गुंजोटीकर बाबा महानुभाव यांनी प्रास्ताविक केले. जून २०२६ मध्ये अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या अंतर्गत सांगली जिल्हा महानुभाव परिषदेची नव्याने कार्यकारिणी स्थापन करण्यात आली. त्यानंतर अल्पावधीतच हा प्रबोधनपर अवतरण दिन सोहळा आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सोहळ्याच्या निमित्ताने सकाळी श्रीमूर्तींना मंगल अभिषेक, सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींच्या सूत्रपाठाचे पारायण तसेच श्रीमद्भगवद्गीतेतील अध्यायांचे पठण करण्यात आले. ‘श्यामरंग’च्या माध्यमातून भाविका चेंडके यांच्या सुमधुर आवाजात भजनसंध्या रंगली. आचार्य महंत श्री सिन्नरकर बाबा यांच्या उपस्थितीत देवपूजा, कुलवंदन आणि प्रसाद सेवा पर्व पार पडले.
सूत्रसंचालन पु. श्री हरिराज शास्त्री विद्वांस यांनी केले. यावेळी श्रीकृष्ण ज्ञानमंदिर कुपवाड सेवा समितीचे पदाधिकारी, सांगली जिल्हा महानुभाव परिषदेचे सचिव पु. श्री अमितराज कपाटे, पु. श्री सुरेंद्रमुनी बिडकर, पु. श्री महेंद्रव्यास बाबा शेवलीकर, पु. श्री गोपाळव्यास बाबा बिडकर, राहुल बोडके, अक्षय विद्वांस, अभिजीत सिन्नरकर, अक्षय लांडगे, कोल्हापूर जिल्हा महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत श्री राजधरबाबा महानुभाव, धनगाव मठाचे मठाधिपती महंत जयवंत बाबा, वनवासमाची येथील आश्रमाच्या संचालिका महंत श्री कमळाकर बाबाजी, त. रूपा बिडकर, त. रेखा बिडकर, कराड तालुका महानुभाव परिषद अध्यक्ष पु. सुमन जामोदेकर यांच्यासह सांगली जिल्हा उपाध्यक्ष सुनील पाटील, जयसिंग निकम, मुकुंद कदम, रमेश चेंडके, अमोल कोकाटे आणि निरंजन इंगवले आदी उपस्थित होते.
सांगली, मिरज-कुपवाड, कोल्हापूर, मुंबई, पुणे, कराड आदी भागांतून आलेल्या भाविकांनी सोहळ्याचा लाभ घेतला. सांगली जिल्हा महानुभाव परिषदेचे जिल्हा संघटक व परमार्ग सेवक तानाजी घार्गे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाचे व्हिडिओ चित्रीकरण करून पु. श्री पुरुषोत्तम साळुंखे, मुंबई यांनी स्वामींचे विचार सर्वांपर्यंत पोहोचविण्याच्या सेवेत योगदान दिले.
अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!