हटके

कुंडलमध्ये रविवारी कुस्तीचा महाकुंभ; २३० लढतींची पर्वणी

कुंडलमध्ये रविवारी कुस्तीचा महाकुंभ; २३० लढतींची पर्वणी
25 Sep 2026, 21:37 708 views
महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरींसह आंतरराष्ट्रीय मल्लांचा सहभाग; महिला कुस्तीगीरही आखाड्यात

कुंडल : क्रांती वृत्तसेवा

कुंडल (ता. पलूस) येथील ऐतिहासिक महाराष्ट्र कुस्ती मैदानात रविवारी, दि. २७ सप्टेंबर रोजी कुस्तीचा भव्य महाकुंभ रंगणार आहे. महाराष्ट्रासह देशभरातील नामांकित मल्लांसोबत आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीगीर आखाड्यात उतरणार असून, तब्बल २३० कुस्त्या होणार आहेत. त्यामुळे कुस्तीप्रेमींचे लक्ष कुंडलकडे लागले आहे.

कुंडलच्या महाराष्ट्र मैदानाला कुस्तीची प्रदीर्घ आणि वैभवशाली परंपरा आहे. या मैदानात देशभरातील अनेक नामवंत मल्लांनी शड्डू ठोकला असून, निकाली कुस्त्यांसाठी या मैदानाची विशेष ओळख आहे.

यंदाच्या मैदानातील प्रमुख आकर्षण म्हणजे महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी आणि भारत केसरी किताब विजेत्या मल्लांच्या लढती. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आणि हिंदकेसरी दिनेश गुलिया यांच्यातील लढतीकडे कुस्तीशौकिनांचे विशेष लक्ष आहे. तसेच डबल महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर यांच्यासमोर भारत केसरी राजू रायवाल यांचे आव्हान असणार आहे.

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांच्यासमोर पंजाबचे राष्ट्रीय पदकविजेते शुभम रायवाल, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांच्यासमोर जम्मू केसरी लल्लू जम्मू, तर महाराष्ट्र केसरी दादा शेळके यांच्यासमोर भारत केसरी साहिल कोहाली यांची लढत होणार आहे.

उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे आणि आंतरराष्ट्रीय मल्ल हदी इराण, तसेच शिवगर्जना केसरी शुभम सिदनाले आणि पंजाब केसरी चीनू रायवाल यांच्यातील लढतीही लक्षवेधी ठरणार आहेत.

महिला मल्लांचाही आखाड्यात जलवा

यंदाच्या मैदानाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महिला कुस्तीगीरांचा सहभाग. महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडी हिची ऑलिम्पियन आणि वर्ल्ड चॅम्पियन रीतिका हुडा हिच्याशी लढत होणार आहे. राष्ट्रीय पदकविजेती सई भेलके हिच्यासमोर वर्ल्ड चॅम्पियन बिपाशा दहिया हिचे आव्हान असेल.

याशिवाय राष्ट्रीय पदकविजेती प्रेरणा पाटील विरुद्ध शिवछत्रपती पुरस्कारविजेती सृष्टी भोसले, तसेच महाराष्ट्र चॅम्पियन रिया भोसले विरुद्ध आंतरराष्ट्रीय मल्ल आश्लेषा बागडे यांच्यातही चुरशीच्या लढती रंगणार आहेत.

दुपारपासून सुरू होणाऱ्या या मैदानात लहान-मोठ्या मिळून एकूण २३० लढती होणार असून सायंकाळी सातपर्यंत मैदानाची सांगता करण्याचे नियोजन आहे. यापूर्वीही कुंडलच्या महाराष्ट्र मैदानात शेकडो कुस्त्या आणि देशभरातील नामांकित मल्लांच्या लढती झाल्या आहेत.

कुंडलच्या लाल मातीतील या कुस्ती महाकुंभामुळे परिसरात कुस्तीचा थरार अनुभवायला मिळणार असून, मोठ्या संख्येने कुस्तीप्रेमी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.

शेअर करा:
Facebook Twitter WhatsApp
कमेंट्स (0)

अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!