हटके

विट्यात कवितांतून उमटला वेदनेचा हुंकार; मराठवाड्यातील कवींनी जिंकली रसिकांची मने

विट्यात कवितांतून उमटला वेदनेचा हुंकार; मराठवाड्यातील कवींनी जिंकली रसिकांची मने
23 Sep 2026, 23:21 215 views
विटा : क्रांती WAVE वृत्तसेवा

दुष्काळाने उद्ध्वस्त होणारी शेती, शेतकऱ्यांचे विदारक जगणे, तरुणाईची आंदोलने, लोकशाही, स्त्री-पुरुष समानता, निसर्ग, पर्यावरण, पाणी आणि सामाजिक वास्तव अशा विविध विषयांवरील कवितांनी विट्यातील क्रांतिसिंह नाना पाटील लोक विद्यापीठाचा परिसर अक्षरशः भारावून गेला. मराठवाड्यातील कवींनी आपल्या कवितांमधून सामाजिक वास्तव आणि व्यवस्थेविषयीची अस्वस्थता प्रभावीपणे मांडत पश्चिम महाराष्ट्रातील रसिकांची मने जिंकली.

क्रांतिवीरांगणा हौसाताई पाटील यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त क्रांतिसिंह नाना पाटील लोक विद्यापीठात निमंत्रित कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध कवी व विडंबनकार प्रभाकर साळेगावकर (माजलगाव) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कविसंमेलनाला साहित्यिक, कवी आणि रसिकांची मोठी उपस्थिती होती.

अध्यक्षीय मनोगतात प्रभाकर साळेगावकर म्हणाले, "कवितेतून जगण्याची प्रेरणा मिळते. आत्महत्येला पर्याय कविता असते. वेदनेतून कवितेची निर्मिती होते आणि कवी हा काळाच्या एक पाऊल पुढे असतो." क्रांतिसिंह नाना पाटील खासदार असताना १९६९ मध्ये त्यांनी मराठवाड्यात रेल्वे सुरू करण्याची मागणी केली होती, याचाही त्यांनी संदर्भ दिला. यावेळी त्यांनी ‘कोकणचा राजा आंबा पिकतो’ या गीताचे विडंबन सादर केले. त्याला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

प्रारंभी शाहीर काकासाहेब देशमुख यांनी ‘माय’ ही कविता सादर करून आईच्या आठवणींना उजाळा दिला. सीमंती पाटील यांनी ‘जेन झी’ या कवितेतून नव्या पिढीच्या आकांक्षा, शिक्षणासाठीची धडपड आणि सामाजिक प्रश्नांवर व्यक्त होणारी तरुणाईची भूमिका प्रभावीपणे मांडली.

दीपक पवार यांनी ‘कापूस’ आणि ‘दुष्काळ’ या कवितांमधून शेतकरी जीवनातील वेदना आणि ग्रामीण वास्तव मांडले. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर भाष्य करताना त्यांच्या कवितेतील प्रतिमा रसिकांच्या मनाला भिडल्या. ‘दुष्काळ’ या कवितेतूनही त्यांनी दुष्काळाच्या प्रश्नाकडे समाजाचे आणि व्यवस्थेचे लक्ष वेधले.

व्ही. एन. देशमुख यांनी ‘घर’, अनिल पाटील यांनी ‘जगण्याची धडपड’, गणेश झेंडे, प्रा. हेमांगिनी माने यांनी ‘चिमणा-चिमणी’, राम सुतार यांनी ‘वाघ हसे हरणीला’, विमल जाधव यांनी ‘काय मागू मी’, राम मिरेकर, दीपाली घाडगे यांनी ‘जाऊ दे झालं’, सुनील गुरव यांनी ‘एक तरी झाड लाव’, दीपाली जाधव यांनी ‘पॉलिसी’, तुकाराम पवार यांनी ‘आई’, चंद्रकांत वेल्हाळ यांनी ‘ज्ञानाचे भांडार’, वृषाली कुलकर्णी, अशोक पवार यांनी ‘हेडमास्तर’, शिराज शिकलगार, सीमंती पाटील यांनी ‘जेन-झी’, विश्वनाथ गायकवाड यांनी ‘प्रभात राणी’, रघुराज मेटकरी यांनी ‘मी कविता लिहावी कुणासाठी’ आणि ॲड. सुभाष पाटील यांनी ‘शंभू’ आदी कविता सादर केल्या.

या कविसंमेलनात विविध सामाजिक प्रश्नांबरोबरच नातेसंबंध, पर्यावरण, शिक्षण, ग्रामीण जीवन, स्त्री-पुरुष समानता आणि मानवी संवेदना यांचे विविध पैलू कवितेतून उलगडले. त्यामुळे अडीच तास चाललेल्या या काव्यसोहळ्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मानवी रावताळे यांनी मनोगत व्यक्त केले. विजयकुमार महिंद यांनी स्वागत केले, तर ॲड. सुभाष पाटील यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी क्रांतिसिंह नाना पाटील लोक विद्यापीठाचे अध्यक्ष सुभाष पवार, प्रा. विलास पाटील, संजय मोरे (हणमंतवडिये), अरुण लंगोटे, देवकुमार दुपटे, इंद्रजीत पाटील, दत्तात्रय सपकाळ, सागर पाटील, पद्माकर यादव, दमयंती पाटील, गणेश झेंडे, शिराज शिकलगार यांच्यासह साहित्यिक, कवी आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजेसाहेब कदम यांच्या बहारदार सूत्रसंचालनाने कविसंमेलन रंगले

क्रांतिवीरांगणा हौसाताई पाटील यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित हे कविसंमेलन तब्बल अडीच तास रंगले. मराठवाड्यातून आलेले सूत्रसंचालक राजेसाहेब कदम यांनी प्रसंगानुरूप निवेदन, काव्यपंक्ती आणि मिश्कील शैलीने कार्यक्रमात रंगत आणली. त्यांच्या बहारदार सूत्रसंचालनाला रसिकांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त दाद दिली.

शेअर करा:
Facebook Twitter WhatsApp
कमेंट्स (0)

अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!