शेती

क्रांतीला देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखान्याचा पुरस्कार मंगळवारी प्रदान होणार

क्रांतीला देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखान्याचा पुरस्कार मंगळवारी प्रदान होणार
19 Sep 2026, 11:59 893 views
चेअरमन शरद लाड, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाची नवी दिल्लीत उपस्थिती; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवराजसिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण होणार 

कुंडल : क्रांती WAVE वृत्तसेवा

कुंडल येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याला सन २०२५-२६ च्या गळीत हंगामातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्यासाठीचा प्रतिष्ठेचा ‘वसंतदादा पाटील पुरस्कार’ मंगळवार, दि. २२ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्यास कारखान्याचे चेअरमन शरद लाड, व्हाईस चेअरमन तसेच संपूर्ण संचालक मंडळ उपस्थित राहणार आहे.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ लिमिटेड (NFCSF), नवी दिल्ली यांच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या या पुरस्काराचे वितरण नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे सकाळी ११.३० वाजता होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय कृषिमंत्री व शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच केंद्रीय व राज्य मंत्र्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाने दि. ११ सप्टेंबर  रोजी कारखान्याला पाठविलेल्या अधिकृत पत्राद्वारे पुरस्काराची घोषणा केली होती. कारखान्याने सादर केलेल्या कामगिरीच्या माहितीचे मूल्यमापन केल्यानंतर भारत सरकारच्या साखर विभागाच्या मुख्य संचालकांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ पुरस्कार निवड समितीने कार्यप्रदर्शन पुरस्कार २०२५-२६ चे निकाल अंतिम केले आहेत.

सन २०२५-२६ चा गळीत हंगाम विविध आव्हानांनी भरलेला असतानाही क्रांती कारखान्याने कार्यक्षमता, साखर उत्पादनातील गुणवत्ता, तांत्रिक व्यवस्थापन आणि शेतकरीहिताची भूमिका या क्षेत्रांत केलेल्या कामगिरीची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा मानाचा ‘वसंतदादा पाटील पुरस्कार’ क्रांती कारखान्याला जाहीर झाला आहे.

पुरस्कार सोहळ्यास केंद्रीय मंत्र्यांची उपस्थिती

नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेडतर्फे २१ व २२ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे ‘मेगा ट्रिपल इव्हेंट’ आयोजित करण्यात आला आहे. याच कार्यक्रमात क्रांती कारखान्याला ‘वसंतदादा पाटील पुरस्कार’ प्रदान केला जाणार आहे.

या अंतर्गत २१ सप्टेंबर रोजी नॅशनल शुगर अँड बायो-एनर्जी कॉन्क्लेव्ह, २१ व २२ सप्टेंबर रोजी इंडस्ट्री एक्झिबिशन अँड इनोव्हेशन एक्स्पो, तर २२ सप्टेंबर रोजी नॅशनल एफिशियन्सी अवॉर्ड्स सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमास केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय उत्तर प्रदेशचे साखर विकास राज्यमंत्री संजय सिंह गंगवार, उत्तर प्रदेशचे साखर विकासमंत्री लक्ष्मी नारायण चौधरी, गुजरातचे सहकारमंत्री जितुभाई वाघाणी, हरियाणाचे सहकारमंत्री अरविंद कुमार शर्मा, महाराष्ट्राचे सहकारमंत्री बाबासाहेब एम. पाटील तसेच पंजाबचे कृषिमंत्री गुरमीतसिंग खुडियन यांचीही विशेष उपस्थिती राहणार आहे.

‘क्रांती’च्या कार्यक्षमतेचा राष्ट्रीय गौरव

क्रांती कारखान्याला यापूर्वीही विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. मात्र, संपूर्ण भारतातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना म्हणून ‘वसंतदादा पाटील पुरस्कार’ मिळणे हा क्रांतीच्या कार्यक्षमतेचा राष्ट्रीय स्तरावरील गौरव मानला जात आहे.

क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या शेतकरी व कष्टकरी हिताच्या विचाराने कार्यरत असलेल्या क्रांती कारखान्याने आव्हानात्मक परिस्थितीतही कार्यक्षमता आणि गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. संस्थापक संचालक आमदार अरुण लाड यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

हा पुरस्कार केवळ कारखान्याचा सन्मान नसून क्रांतीवर विश्वास ठेवणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा, संचालक मंडळाचा, अधिकारी-कर्मचारी वर्गाचा आणि संपूर्ण क्रांती परिवाराच्या सामूहिक प्रयत्नांचा गौरव असल्याची भावना व्यक्त होत आहे.

शरद लाड म्हणाले...

“कारखाना प्रशासन व कर्मचारी वर्गाचे अथक परिश्रम, संचालक मंडळाचे मार्गदर्शन आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांनी क्रांती कारखान्यावर ठेवलेला दृढ विश्वास, या सामूहिक योगदानातूनच संपूर्ण भारतातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा ‘वसंतदादा पाटील पुरस्कार’ मिळविण्यात यश आले आहे. हा पुरस्कार क्रांती परिवारातील प्रत्येक घटकाच्या कष्टांचा आणि शेतकऱ्यांच्या विश्वासाचा गौरव आहे.”

— शरद लाड, चेअरमन, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना लि., कुंडल

स्थळ : डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर, १५ जनपथ रोड, विंडसर प्लेस, नवी दिल्ली
दिनांक : मंगळवार, २२ सप्टेंबर २०२६
वेळ : सकाळी ११.३० वाजता

शेअर करा:
Facebook Twitter WhatsApp
कमेंट्स (0)

अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!