तासगाव : क्रांती WAVE वृत्तसेवा : “अभियंत्यांनी केवळ आपल्या व्यावसायिक क्षेत्रापुरते मर्यादित न राहता समाजोपयोगी कामांना प्राधान्य द्यावे. विकासकामे करताना अभियंत्यांची कल्पकता, तांत्रिक ज्ञान आणि कामाचा दर्जा यांना सर्वोच्च महत्त्व दिले पाहिजे. गुणवत्तापूर्ण कामाची आज समाजाला नितांत गरज आहे,” असे प्रतिपादन पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण (आण्णा) लाड यांनी केले.
अभियंता दिनाचे औचित्य साधून तासगाव इंजिनिअर्स असोसिएशनच्या प्रस्तावित ‘अभियंता भवन’ या नूतन वास्तूचे भूमिपूजन मंगळवारी आमदार लाड यांच्या हस्ते झाले. तासगावातील धनवडे प्लॉट, जुना येळावी रस्ता येथे झालेल्या या समारंभाला राजकीय, प्रशासकीय आणि अभियंता क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
तासगाव इंजिनिअर्स असोसिएशनच्या स्वप्नातील ‘अभियंता भवन’ या वास्तूची उभारणी आमदार अरुण लाड यांच्या २१ लाख ५० हजार रुपयांच्या विकासनिधीतून होणार आहे. अभियंत्यांसाठी स्वतंत्र व सर्वसमावेशक व्यासपीठ उभे करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
या कार्यक्रमास माजी खासदार संजय पाटील, तासगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. विजया पाटील, मुख्याधिकारी इंजि. सुधाकर लेंडवे तसेच तासगाव नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात आमदार लाड म्हणाले, बांधकाम क्षेत्रातील विविध अभियंते एकत्र येऊन स्थापन केलेल्या इंजिनिअर्स असोसिएशनच्या माध्यमातून समाजोपयोगी कामांना प्राधान्य दिले पाहिजे. केवळ बांधकाम क्षेत्रातील अभियंत्यांचाच नव्हे, तर इतर विभागांतील अभियंत्यांचाही सहभाग या संघटनेत असल्याने तिचे कार्य अधिक व्यापक होणार आहे.
रस्ते, बंधारे, छोटे-मोठे पूल आणि विविध विकासकामांची गुणवत्ता टिकविण्याची जबाबदारी अभियंत्यांवर आहे. दर्जेदार काम, तांत्रिक कौशल्य आणि कल्पकतेच्या बळावर समाजाचा विश्वास जिंकण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
माजी खासदार पाटील यांनी तासगाव नगरपालिकेने इंजिनिअर्स असोसिएशनला जागा हस्तांतरणासाठी कमी कालावधीत केलेल्या सहकार्याचे कौतुक केले. भविष्यातही असोसिएशनच्या विकासासाठी आवश्यक ते सहकार्य व मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
‘अभियंता भवन’ उभारण्यासाठी कै. इंजि. निवृत्ती बाळा धनवडे, संस्थापक व माजी उपाध्यक्ष यांनी दहा गुंठे जागा विनामूल्य प्रदान केली. त्यांच्या या योगदानाबद्दल कार्यक्रमात विशेष उल्लेख करण्यात आला.
कार्यक्रमास असोसिएशनचे इंजि. युवराज लुगडे, दिग्विजय खरमाटे, रणजीत कोळी, उदय गायकवाड, प्रकाश संकपाळ, निशांत शिंदे, अश्विन कोकणे, संजय नाईक, मुकुंद माळी, प्रताप जाधव, किरण कदम, परदेशी सर, शिरीष फाकडे, मनोज चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने अभियंते व सदस्य उपस्थित होते.
अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!