शेती
एकरी शंभर टन उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा क्रांती कारखान्यातर्फे सन्मान
08 Sep 2026, 18:36
763 views
कुंडल : क्रांती WAVE वृत्तसेवा
क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना, कुंडल यांच्यातर्फे मंगळवारी एकरी शंभर टनांहून अधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. व्हीएसआयचे महासंचालक संभाजीराव कडू पाटील, कारखान्याचे मार्गदर्शक आमदार अरुण लाड, चेअरमन शरद लाड, व्हाईस चेअरमन जयप्रकाश साळुंखे व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे, ऊस विकास अधिकारी विलास जाधव, शेती अधिकारी दिलीप पार्लेकर यांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा झाला.
आडसाली हंगामात शेतकऱ्यांची उल्लेखनीय कामगिरी
आडसाली हंगामात अर्जुन अशोक पवार (रा. विठलानगर, ता. तासगाव) यांनी ०.७३ हेक्टर क्षेत्रातून १९६.०४८ टन ऊस उत्पादन घेतले. त्यांच्या उत्पादनाची नोंद प्रति हेक्टरी २६८.५५८ टन, तर प्रति एकरी १०७.४२३ टन अशी आहे. संभाजी महादेव पाटील (रा. बोरगाव (रा.), ता. तासगाव) यांनी ०.२९ हेक्टर क्षेत्रातून ७७.२७९ टन उत्पादन घेतले असून, त्यांची प्रति एकरी उत्पादकता १०६.५९१ टन आहे. अशोक निवृत्ती होनमाने (रा. देववाडी, ता. कडेगाव) यांनी ०.२५ हेक्टर क्षेत्रातून ६६.००४ टन उत्पादन घेतले. त्यांची प्रति एकरी उत्पादकता १०५.६०६ टन नोंदली आहे.
पूर्वहंगामी व सुरू हंगामातील उत्पादन
पूर्वहंगामी हंगामात नामदेव रघुनाथ जाधव (रा. आळसंद, ता. खानापूर) यांनी ०.७१ हेक्टर क्षेत्रातून १४४.७०६ टन ऊस उत्पादन घेतले. त्यांची प्रति एकरी उत्पादकता ८१.५२३ टन आहे. अर्जुन धोंडीराम कदम (रा. आंधळी, ता. पलूस) यांनी ०.३६ हेक्टर क्षेत्रातून ७२.२५९ टन उत्पादन घेतले असून, त्यांची प्रति एकरी उत्पादकता ८०.२८७ टन आहे. बाळकृष्ण विश्वनाथ धोत्रे (रा. बांबवडे, ता. पलूस) यांनी ०.३९ हेक्टर क्षेत्रातून ७४.४२७ टन उत्पादन घेतले. त्यांची प्रति एकरी उत्पादकता ७६.३३५ टन आहे.
सुरू हंगामात दिलीप रघुनाथ जाधव (रा. आळसंद, ता. पलूस) यांनी ०.२२ हेक्टर क्षेत्रातून ३७.६७९ टन उत्पादन घेतले. त्यांची प्रति एकरी उत्पादकता ६८.५०७ टन आहे. शिवाजी रंगराव लाड (रा. कुंडल, ता. पलूस) यांनी ०.५५ हेक्टर क्षेत्रातून ८८.९३१ टन उत्पादन घेतले असून, त्यांची प्रति एकरी उत्पादकता ६४.६७७ टन आहे.
खोडवा हंगामातील उत्पादन
खोडवा हंगामात दशरथ नारायण लाड (रा. कुंडल, ता. पलूस) यांनी ०.२४ हेक्टर क्षेत्रातून ३९.८२७ टन उत्पादन घेतले. त्यांची प्रति एकरी उत्पादकता ६६.३७८ टन आहे. ऋषिकेश सर्जेराव पाटील (रा. सावंतपूर, ता. पलूस) यांनी ०.३७ हेक्टर क्षेत्रातून ५८.३६० टन उत्पादन घेतले असून, त्यांची प्रति एकरी उत्पादकता ६३.०९१ टन आहे.
गट कडेगावमध्ये उच्चांकी उत्पादनाची नोंद
गट कडेगावमधील आडसाली हंगामात जयवंतराव अधिकराव यादव (रा. कडेपूर, ता. कडेगाव) यांनी ०.४० हेक्टर क्षेत्रातून १०६.६९३ टन ऊस उत्पादन घेतले. त्यांच्या उत्पादनाची नोंद प्रति हेक्टरी आणि प्रति एकरी १०६.६९३ टन अशी आहे.
शेतकरी सन्मानातून ऊस उत्पादनाला प्रोत्साहन
ऊस उत्पादनातील उच्चांक गाठणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करून त्यांच्या कष्टाला प्रोत्साहन देण्याची भूमिका क्रांती कारखान्याने जपली आहे. मंगळवारी झालेल्या या सत्कार सोहळ्यात उच्चांकी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळे ऊस उत्पादनातील नवे विक्रम नोंदविले जात असून, त्यांचा आदर्श इतर ऊस उत्पादकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
कमेंट्स (0)
अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!