हटके

सर्वधर्मीय उत्सवांमध्ये ध्वनीप्रदूषणाला आळा घाला : अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी

सर्वधर्मीय उत्सवांमध्ये ध्वनीप्रदूषणाला आळा घाला : अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी
04 Sep 2026, 18:37 391 views
पुणे : क्रांती WAVE वृत्तसेवा                                 सण, उत्सव, धार्मिक कार्यक्रम आणि सार्वजनिक समारंभ हे समाजाच्या सांस्कृतिक जीवनाचा महत्त्वाचा भाग आहेत. प्रत्येक नागरिकाला आपला धर्म, श्रद्धा आणि परंपरा पाळण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र, हे स्वातंत्र्य इतर नागरिकांच्या आरोग्य, शांतता आणि जगण्याच्या अधिकारावर अतिक्रमण करणारे असू शकत नाही. त्यामुळे सर्व धर्मीय सण-उत्सव, मिरवणुका, धार्मिक स्थळे तसेच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्यासाठी कायद्याची समान, पारदर्शक आणि कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी भूमिका महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (महाराष्ट्र अंनिस) मांडली आहे.

भारतामध्ये Noise Pollution (Regulation and Control) Rules, 2000 लागू आहेत. त्यानुसार निवासी क्षेत्रासाठी दिवसा (सकाळी ६ ते रात्री १०) ध्वनीची मर्यादा ५५ डेसिबल, तर रात्री (रात्री १० ते सकाळी ६) ४५ डेसिबल आहे. शांतता क्षेत्रासाठी ही मर्यादा अनुक्रमे ५० आणि ४० डेसिबल आहे. नियमांनुसार लाऊडस्पीकर किंवा सार्वजनिक ध्वनिवर्धक यंत्रणा वापरण्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक आहे. तसेच, रात्रीच्या वेळेत त्याच्या वापरावर स्पष्ट निर्बंध आहेत.

विशेषतः ‘डॉल्बी’, मोठ्या क्षमतेच्या साउंड सिस्टीम किंवा डीजेच्या नावाखाली कायदेशीर ध्वनीमर्यादेपेक्षा मोठ्या आवाजात ध्वनीप्रक्षेपण करण्यास कोणतीही मुभा नाही. एखाद्या यंत्रणेचे नाव ‘डॉल्बी’ किंवा ‘डीजे’ असणे हा मुद्दा नसून, त्या यंत्रणेतून निर्माण होणारा आवाज कायद्याने निश्चित केलेल्या मर्यादेत आहे की नाही, हा महत्त्वाचा निकष आहे. सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर वापरण्यास लेखी परवानगी आवश्यक असल्याचे मुंबई उच्च न्यायालयानेही स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र अंनिसने गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरणपूरक गणपती आणि पर्यावरणपूरक दिवाळी यांसारख्या उपक्रमांतून सण साजरे करण्याची संस्कृती अधिक संवेदनशील, विवेकी आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी जनजागृती केली आहे. पर्यावरणपूरक सण म्हणजे केवळ प्रदूषण कमी करणे नव्हे, तर मानवी आरोग्य, प्राणी-पक्षी, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि आजारी व्यक्ती यांचा विचार करून उत्सव साजरा करणे होय.

ध्वनीप्रदूषण हा देखील पर्यावरणीय आणि सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न आहे. महाराष्ट्र अंनिसची भूमिका कोणत्याही एका धर्माच्या किंवा विशिष्ट उत्सवाच्या विरोधात नाही. गणेशोत्सव असो, नवरात्र असो, ईद असो, मोहरम असो, ख्रिसमस असो, गुरुपर्व असो किंवा अन्य कोणताही धार्मिक अथवा सांस्कृतिक कार्यक्रम असो—कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे. मुंबई उच्च न्यायालयानेही ध्वनीप्रदूषणासंदर्भातील निर्देश सर्व धर्म आणि सर्व पंथांच्या सण-समारंभांना लागू असल्याचे स्पष्ट केले आहे.

ही भूमिका महाराष्ट्र अंनिसच्या वतीने डॉ. हमीद दाभोलकर, मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, श्रीपाल ललवाणी, राहुल थोरात, सम्राट हटकर, मधुकर गायकवाड, प्रवीण देशमुख, अण्णा कडलसकर, रामभाऊ डोंगरे, मुक्ता दाभोलकर आणि नीता सामंत यांनी मांडली.


महाराष्ट्र अंनिसच्या प्रमुख मागण्या

  • सर्व धर्मीय सण-उत्सव आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये Noise Pollution Rules, 2000 ची काटेकोर अंमलबजावणी करावी.
  • लाऊडस्पीकर, डीजे, डॉल्बी किंवा अन्य ध्वनिवर्धक यंत्रणांना पूर्वपरवानगी आणि निर्धारित डेसिबल मर्यादेचे पालन अनिवार्य करावे.
  • नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळे, आयोजक, ध्वनियंत्रणा चालक आणि संबंधित जबाबदार व्यक्तींवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी.
  • नागरिकांच्या तक्रारींवर पोलिस व संबंधित प्रशासनाने त्वरित घटनास्थळी जाऊन ध्वनीची पातळी मोजावी आणि बेकायदेशीर ध्वनिवर्धक तत्काळ बंद करावेत. न्यायालयीन निर्देशांमध्येही तक्रारीवर त्वरित कारवाई आणि ध्वनीपातळीची नोंद करण्यावर भर देण्यात आला आहे.
शेअर करा:
Facebook Twitter WhatsApp
कमेंट्स (1)
बळीराम जी किनाळकर , छत्रपती संभाजी नगर. 04 Sep 2026 21:10

अतिशय महत्त्वाचे.
अमल झाले पाहिजे.