शेती
कवठेमहांकाळ,जत परिसरातील ऊस क्रांती कारखाना नेणार : शरद लाड
03 Sep 2026, 20:47
1,305 views
शिरढोण : क्रांती WAVE वृत्तसेवा कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण येथे क्रांती सहकारी साखर कारखान्याच्या गट कार्यालयाचा प्रारंभ करण्यात आला. ताकारी-टेंभू योजनेच्या पाण्यामुळे कवठेमंकाळ-जत तालुक्यातील शेतीचे स्वरूप बदलले असून, या भागातील ऊस उत्पादकांना गाळपासाठी अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी क्रांती कारखाना सज्ज झाला आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन शरद लाड यांनी केले.
शरद लाड म्हणाले, कवठेमहांकाळ-जत हा परिसर पूर्वी ऊसतोडणी कामगारांचा म्हणून ओळखला जात होता. मात्र, ताकारी-टेंभू योजनेचे पाणी उपलब्ध झाल्यामुळे या तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. त्यामुळे बागायती क्षेत्र वाढले असून, ऊस, डाळिंब आणि द्राक्षांच्या बागाही वाढल्या आहेत. मात्र, डाळिंब व द्राक्षांना हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी पुन्हा हमीभाव मिळणाऱ्या उसाकडे वळले आहेत.”
“क्रांती कारखान्याची गाळप क्षमता आता प्रतिदिन दहा हजार टनांपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील ऊस मोठ्या प्रमाणात गाळपासाठी आणता येणार आहे. शेतकऱ्यांनी सातत्याने ऊस पुरवठा करून कारखान्याला सहकार्य करावे. यापुढेही कारखाना ऊस उत्पादकांना चांगला दर देण्यासोबतच ऊस विकासाच्या विविध योजना राबविणार आहे,” असे लाड यांनी सांगितले.
२४०० हेक्टर ऊसाच्या नोंदी; गाळपासाठी यंत्रणा सज्ज
कारखान्याचे शेती अधिकारी दिलीप पार्लेकर म्हणाले, “कवठेमहांकाळ व जत तालुक्यातील ऊस जास्तीत जास्त प्रमाणात क्रांती कारखान्याकडे गाळपासाठी आणण्यात येणार आहे. कारखाना यंदा एक महिना आधी तोडणी व गाळप सुरू करणार आहे. या भागातील २४०० हेक्टर ऊसाच्या नोंदी कारखान्याकडे झाल्या आहेत. त्यासाठी तोडणी मजुरांची यंत्रणा आणि वाहतूक व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे.”
“ऊसाचा उतारा चांगला ठेवून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त चांगला दर देण्यासाठी कारखान्याची धडपड सुरू आहे. यावर्षीही चांगला दर देण्याची परंपरा कायम ठेवण्यात येणार आहे. कारखान्याच्या बिगरसभासदांनाही सभासदांप्रमाणे सर्व सोयी-सुविधांचा लाभ दिला जाईल. गाळपासाठी येणाऱ्या उसासाठी प्रतिटन १५ रुपये दराने अर्धा किलो साखर दिली जाईल,” .
कर्नाटकातील कारखान्यांवरील अवलंबित्व कमी होणार
या भागातील कमी वयाचा ऊस यापूर्वी कर्नाटकातील कारखाने गाळपासाठी नेत होते. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना कमी दर मिळत होता. आता क्रांती कारखान्याची गाळप क्षमता वाढल्यामुळे या भागातील ऊस स्थानिक पातळीवर गाळपासाठी आणता येणार असून, शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्यास मदत होईल, असे यावेळी सांगण्यात आले.
ऊस विकास योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
शेतकऱ्यांनी कारखान्याच्या कृषी विकास योजनेचा लाभ घेऊन चांगल्या प्रतीचे बियाणे वापरावे आणि अधिकाधिक उत्पादन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले. ऊस नोंदणी, तोडणी, वाहतूक आणि गाळप याबाबत शेतकऱ्यांना आवश्यक सहकार्य करण्यासाठी गट कार्यालयाच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
प्रमुख पदाधिकारी व शेतकऱ्यांची उपस्थिती
कार्यक्रमास कारखान्याचे व्हाईस चेअरमन जयप्रकाश साळुंखे, संचालक सुकुमार पाटील, दिलीप थोरबोले, विजय पाटील, अनिल पवार, वैभव पवार, जितेंद्र पाटील, सतीश चौगुले, कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे, शिरढोण गट अधिकारी भारत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष टी. व्ही. पाटील, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती दत्ताजीराव पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती एम. के. पाटील, माजी पंचायत समिती सदस्य दादासो पाटील, शिवसेना तालुका अध्यक्ष मारुती पवार, शेतकरी कामगार पक्षाचे राज्य सरचिटणीस दिगंबर कांबळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कदम, शिरढोण हायस्कूलचे मुख्याध्यापक एम. एस. पाटील, शिरढोणचे माजी सरपंच टी. के. पाटील, बोरगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश पाटील, आरेवाडीचे सरपंच रमेश कोळेकर, बिरोबा देवस्थानचे सचिव शंकर कोळेकर यांच्यासह परिसरातील पदाधिकारी, ऊस वाहतूकदार व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
कमेंट्स (0)
अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!