शेती

खानापूर तालुक्यातील ऊसाला गाळपास प्राधान्य : शरद लाड

खानापूर तालुक्यातील ऊसाला गाळपास प्राधान्य : शरद लाड
03 Sep 2026, 20:18 673 views
कुंडल : क्रांती WAVE वृत्तसेवा
क्रांती सहकारी साखर कारखान्याच्या वतीने खानापूर तालुक्यातील घानवड गट कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात राबविण्यात आलेल्या ऊस विकास योजनांमुळे एकरी सरासरी उत्पादनात लक्षणीय वाढ झाली असून, शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी कारखाना प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन शरद लाड यांनी केले.
शरद लाड म्हणाले, “क्रांती कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस विकास योजना राबविल्यामुळे एकरी सरासरी २५ टनांवरून ४८ टनांपर्यंत उत्पादन वाढले आहे. आजूबाजूच्या परिसरातील शेतकरीही आता चांगली शेती करू लागले असून, त्यामुळे या भागातील उत्पादनक्षमता वाढत आहे. कारखान्याची पूर्वीची गाळप क्षमता प्रतिदिन पाच हजार टन होती. त्यामुळे या परिसरातील ऊस गाळपासाठी आणताना अडचणी येत होत्या. आता ही क्षमता प्रतिदिन दहा हजार टनांपर्यंत वाढविण्यात आली आहे.”
खानापूर तालुक्यातील ऊसाला प्राधान्य
खानापूर तालुक्यात पाणी यावे यासाठी क्रांतीचे अग्रणी जी. डी. बापू यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यामुळे या भागातील शेतीला मोठा आधार मिळाला आहे. खानापूर तालुक्यातील ऊस सातत्याने क्रांती कारखान्याकडे आणला जाईल. येथील शेतकऱ्यांनी आजपर्यंत सातत्याने ऊस देऊन कारखान्याला सहकार्य केले आहे. यापुढेही ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगला दर देण्यासोबतच ऊस विकासाच्या विविध योजना या भागात राबविण्यात येतील, असेही लाड यांनी सांगितले. कारखान्याचे कामकाज जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कारखान्याला भेटी द्याव्यात. कारखाना आणि शेतकरी यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी अशा भेटी उपयुक्त ठरतील, असे आवाहन त्यांनी केले.
२४ गावांतील ५०० हेक्टर ऊसाच्या नोंदी
कारखान्याचे शेती अधिकारी दिलीप पार्लेकर म्हणाले, “कारखान्यापासून ३५ ते ७० किलोमीटर परिसरातील ऊस आणण्यासाठी हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. आगामी गाळप हंगामासाठी या परिसरातील २४ गावांतील ५०० हेक्टर ऊसाच्या नोंदी पहिल्या टप्प्यात झाल्या आहेत. पुढील टप्प्यात हे क्षेत्र आणखी वाढविण्यात येईल. ऊस वाहतुकीसाठी १६ हून अधिक ट्रॅक्टर टोळ्या आणि चार मशीन या ठिकाणी देण्यात येणार आहेत.” चांगला दर मिळण्यासाठी या परिसरातील शेतकऱ्यांनी क्रांती कारखान्याकडे अधिकाधिक ऊस नोंदी कराव्यात, असे आवाहन पार्लेकर यांनी केले.
ऊस विकास योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
कारखान्याचे संचालक ॲड. सतीश चौगुले म्हणाले, “कारखान्याच्या कृषी विकास योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचे बियाणे शेतात लावावे आणि अधिकाधिक उत्पादन घ्यावे. कारखाना शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे.” गाळपासाठी ऊस आणणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला प्रतिटन अर्धा किलो साखर १५ रुपये दराने देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शेतकरी, वाहतूकदारांची मोठ्या संख्येने उपस्थिती
कार्यक्रमास क्रांती कारखान्याचे व्हाईस चेअरमन जयप्रकाश साळुंखे, संचालक सर्वश्री सुकुमार पाटील, दिलीप थोरबोले, वैभव पवार, अनिल पवार, श्रीकांत पाटील, संग्रामसिंह जाधव, रामचंद्र देशमुख, कारखान्याचे सेक्रेटरी वीरेंद्र देशमुख, चीफ इंजिनिअर आशिष चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य विशाल सावंत, सागर सावंत, माजी सरपंच प्रशांत भोसले, गट अधिकारी नितीन चौगुले, नागनाथ पतसंस्थेचे चेअरमन महेश निकम, कृष्णा रावताळे, उद्योजक सीताराम सावंत, प्रगतिशील शेतकरी लक्ष्मण निकम यांच्यासह गार्डी, घानवड, नागेवाडी, माहुली, भाग्यनगर, साळशिंगे, चिखलहोळ, सांगोले, लेंगरे परिसरातील ऊस वाहतूकदार व ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेअर करा:
Facebook Twitter WhatsApp
कमेंट्स (0)

अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!