कुंडल : क्रांती WAVE वृत्तसेवा
वक्तृत्व स्पर्धेत केवळ भाषण पाठ करून येऊन क्रमांक मिळवण्यापेक्षा स्पर्धेसाठी दिलेल्या विषयांचा सखोल अभ्यास करा. स्पर्धेत क्रमांक मिळाला नाही तरी त्यासाठी केलेला अभ्यास आणि मिळवलेला अनुभव आयुष्यभर उपयोगी पडतो. त्यामुळे वक्तृत्व स्पर्धेत जिंकण्यापेक्षा ज्ञानार्थी होण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य परिषदेचे अध्यक्ष, लेखक, अभिनेते व दिग्दर्शक योगेश सोमण यांनी केले.
कुंडल येथील क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड महाविद्यालयात आयोजित दहाव्या क्रांतिअग्रणी वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटक म्हणून सोमण बोलत होते. आमदार अरुणअण्णा लाड प्रमुख उपस्थित होते.
वक्तृत्वातून विचारांची जडणघडण
सोमण म्हणाले, वक्तृत्व ही केवळ प्रभावीपणे बोलण्याची कला नाही, तर त्यामागे असलेले ज्ञान, चिंतन, वाचन आणि विषयाचा अभ्यास महत्त्वाचा असतो. वक्त्याने एखाद्या विषयावर बोलताना त्या विषयाची विविध बाजूंनी माहिती करून घेतली पाहिजे. केवळ पाठांतर केलेले भाषण काही काळ प्रभाव पाडू शकते; मात्र सखोल अभ्यासातून आलेले विचार श्रोत्यांच्या मनावर दीर्घकाळ परिणाम करतात. या वक्तृत्व स्पर्धेला महाराष्ट्रात वेगळे स्थान निर्माण झाले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक नामवंत वक्ते घडले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आणि युवकांना आपल्या विचारांना व्यक्त करण्याची संधी मिळणे ही या स्पर्धेची मोठी जमेची बाजू आहे. स्पर्धेच्या निमित्ताने युवकांनी वाचनाची सवय लावून घेतली, विविध विषय समजून घेतले आणि त्यावर स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता विकसित केली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
क्रमांकापेक्षा अभ्यास आणि अनुभव महत्त्वाचा
स्पर्धेत तुमचा क्रमांक आला किंवा आला नाही, यापेक्षा या निमित्ताने तुम्ही केलेला अभ्यास अधिक महत्त्वाचा आहे. आज स्पर्धेसाठी केलेले वाचन आणि मिळवलेला अनुभव भविष्यातील जीवनात निश्चितच उपयोगी पडेल. त्यामुळे प्रत्येक स्पर्धकाने केवळ बक्षिसासाठी नव्हे, तर स्वतःची वैचारिक क्षमता वाढवण्यासाठी स्पर्धेत सहभागी व्हावे. वक्तृत्वातून स्वतःला घडवा आणि ज्ञानाच्या दिशेने वाटचाल करा, असे आवाहन सोमण यांनी केले.
कुंडलच्या भूमीतून वैचारिक क्रांतीची मशाल : शरद लाड
स्वागताध्यक्ष तथा क्रांती कारखान्याचे चेअरमन शरद लाड म्हणाले, क्रांती उद्योग समूहाच्या माध्यमातून राबविला जाणारा प्रत्येक उपक्रम दर्जेदार करण्याचा आमचा प्रयत्न असतो. कुंडल ही क्रांतीची भूमी आहे. स्वातंत्र्यलढ्यात याच भूमीतून क्रांतीची मशाल पेटली आणि तिचा प्रकाश राज्यभर, देशभर पोहोचला. त्यामुळे कुंडलच्या भूमीतून सुरू होणाऱ्या प्रत्येक विधायक उपक्रमामागे विचार आणि सामाजिक बांधिलकी असते.
कुंडलमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र कुस्ती मैदानाला देशभरातील नामवंत पैलवान सहभागी होतात. त्याच धर्तीवर ग्रामीण भागातील युवकांच्या वैचारिक आणि वक्तृत्वक्षमतेला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने क्रांतिअग्रणी वक्तृत्व स्पर्धेचा उपक्रम दहा वर्षांपूर्वी सुरू केला,
दहा वर्षांपूर्वी सुरू केलेला हा उपक्रम आज मोठ्या स्वरूपात विकसित झाला असून वक्तृत्व क्षेत्रात या स्पर्धेचे नाव राज्यभर गाजत आहे. ग्रामीण भागातील युवकांमध्ये असलेली गुणवत्ता आणि वैचारिक क्षमता पुढे यावी, त्यांना आपल्या विचारांची अभिव्यक्ती करण्यासाठी व्यापक व्यासपीठ मिळावे, या भावनेतून ही स्पर्धा सुरू करण्यात आली. आज या स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद पाहता त्या प्रयत्नांचे समाधान वाटते, असेही त्यांनी नमूद केले.
युवकांच्या मनात वैचारिक क्रांतीची ज्योत
या वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक युवकाच्या मनात वैचारिक क्रांतीची मशाल पेटत आहे, ही आमच्यासाठी समाधानाची आणि स्वाभिमानाची बाब आहे. युवकांनी केवळ स्पर्धेपुरते भाषण न करता वाचन, चिंतन आणि सामाजिक प्रश्नांचा अभ्यास करण्याची सवय लावून घ्यावी. भविष्यात हा उपक्रम आणखी मोठ्या स्वरूपात नेण्याचा मानस असल्याचे लाड यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनीही मनोगत व्यक्त केले. संयोजक पी. बी. लाड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमास ज्येष्ठ विचारवंत व्ही. वाय. आबा पाटील, द्राक्षगुरू वसंतराव माळी, निरंजन फरांदे, पट्टणशेट्टी मॅडम यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
३०० हून अधिक युवकांचा सहभाग
स्पर्धेच्या यंदाच्या पर्वात ३०० हून अधिक युवकांनी सहभाग घेतला. विविध विषयांवर स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे आणि प्रभावीपणे विचार मांडले. ग्रामीण भागातील युवकांना आपली वक्तृत्वकला, वैचारिक क्षमता आणि अभिव्यक्ती दाखविण्यासाठी मिळालेले हे व्यासपीठ स्पर्धेच्या दशकपूर्तीच्या निमित्ताने अधिक व्यापक होत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले.
अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!