सांगलीत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा पश्चिम महाराष्ट्र मेळावा ; शिवराज काटकर यांची संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड
सांगली : क्रांती WAVE वृत्तसेवा पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात असूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी जाणीवपूर्वक केली जात नाही. पत्रकार सन्मान निधीचा लाभ आतापर्यंत केवळ १२४ पत्रकारांनाच मिळाला असून, त्यातील सात ते आठ पत्रकार आज हयात नाहीत. राज्यातील सुमारे ३० हजार पत्रकारांपैकी केवळ तीन हजार पत्रकारांकडे अधिस्वीकृती आहे. त्यामुळे सरकार पत्रकारांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून संरक्षण, पेन्शन आणि आरोग्य योजना देत असल्याचा दावा करत असले तरी प्रत्यक्षातील वास्तव वेगळे आहे, अशी टीका अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केली.
पत्रकारांच्या प्रश्नांवर व्यापक कामाची गरज
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि डिजिटल मीडिया परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पश्चिम महाराष्ट्र मेळावा, राष्ट्रीय कार्यकारिणी सभा आणि राज्यस्तरीय पत्रकार प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष सुरेंद्र गांगण, अनिल सिंग, मधू नैनन यांच्यासह सर्व सदस्य, परिषदेचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष शिवराज काटकर, मावळते अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर यांच्यासह विविध पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, पत्रकारांना देण्यात येणाऱ्या सन्मान निधीची व्याप्ती अत्यंत मर्यादित आहे. अधिस्वीकृतीच्या बाबतीतही पत्रकारांची अडवणूक केली जाते. आरोग्य योजना अधिस्वीकृतीशी जोडण्यात आली आहे. राज्यात पत्रकारांची संख्या सुमारे ३० हजार असताना केवळ तीन हजार पत्रकारांकडे अधिस्वीकृती असल्याने मोठ्या संख्येने पत्रकार या योजनांपासून वंचित आहेत. सरकारने पत्रकारांच्या प्रश्नांवर प्रामाणिकपणे आणि व्यापक स्वरूपात काम करण्याची गरज आहे.
पत्रकार महामंडळाच्या घोषणेवर सवाल
“एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना पत्रकार महामंडळ सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. राज्यात आधीच ७८ महामंडळे आहेत; त्यांच्याकडे साफसफाईसाठी कर्मचारी नाहीत, बसण्यासाठी जागा नाही. अशा परिस्थितीत पत्रकारांना महामंडळाचे चॉकलेट का दाखविले जात आहे?” असा सवाल देशमुख यांनी केला.
पत्रकारांच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र महामंडळाऐवजी प्रेस कौन्सिलच्या धर्तीवर प्रभावी व्यवस्था निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगून ते म्हणाले, ज्येष्ठ पत्रकार आणि निवृत्त न्यायमूर्ती यांचा समावेश असलेली स्वतंत्र यंत्रणा निर्माण करून पत्रकारांचे प्रश्न एका छत्राखाली सोडवावेत. “महामंडळे म्हणजे पत्रकारांची फसवणूक आहे. पत्रकारांच्या चळवळींचा बुद्धिभेद करून त्यांना नाउमेद करण्याचा कार्यक्रम सुरू आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.
पत्रकारांवरील हल्ल्यांचा ठाम निषेध करावा
पत्रकारांवर हल्ले झाल्यास पत्रकार संघटनांनी ठामपणे निषेध करायला हवा, ही परिषदेची भूमिका असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. डिजिटल माध्यमांचे महत्त्व झपाट्याने वाढत असून, पत्रकारांना बदलत्या माध्यमविश्वासाठी प्रशिक्षित करण्याचे काम डिजिटल मीडिया परिषदेच्या माध्यमातून सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिवराज काटकर यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शिवराज काटकर यांची निवड करण्यात आली. सांगली जिल्ह्याला प्रथमच परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्षपद मिळाल्याने यावेळी त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मावळते अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर यांनी काटकर यांच्याकडे पदभार सोपविला.
यावेळी सांगली जिल्ह्यातील विविध दैनिकांच्या संपादकांचा सन्मान करण्यात आला. मुंबई प्रेस क्लबवर विजयी झालेल्या सर्व पदाधिकारी आणि पत्रकारांचा सत्कार एस. एम. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रवीण शिंदे, तर कार्याध्यक्षपदी तुकाराम धायगुडे यांची निवड करण्यात आली.
डिजिटल मीडिया परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी मोहन राजमाने, ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी प्रताप मेटकरी, कार्याध्यक्षपदी प्रकाश सूर्यवंशी, तर हल्ला विरोधी कृती समितीच्या अध्यक्षपदी किरण जाधव आणि कार्याध्यक्षपदी शैलेश पेटकर यांची निवड झाली. तसेच विकास सूर्यवंशी, तानाजी जाधव, कुलदीप देवकुळे, संजय माळी आणि अविनाश कोळी यांची राज्य कार्यकारिणीवर निवड करण्यात आली.
विविध कार्यक्रमांनी मेळाव्याची सांगता
कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर पत्रकार प्रशिक्षण कार्यशाळा, राष्ट्रीय कार्यकारिणी सभा, पदग्रहण समारंभ, संपादक सत्कार आणि पश्चिम महाराष्ट्रातील पत्रकारांचा मेळावा अशा विविध कार्यक्रमांनी दिवस भरला. सहभागी पत्रकारांना कार्यशाळेची प्रमाणपत्रे देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
विश्वासार्हता जपणे ही पत्रकारांची जबाबदारी : सुरेंद्र गांगण
कोविडनंतर माध्यम क्षेत्र विविध संकटांना सामोरे जात आहे. अशा परिस्थितीत माध्यमांची विश्वासार्हता जपणे हे पत्रकारांचे कर्तव्य आहे. माध्यमांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष सुरेंद्र गांगण यांनी सांगितले.
अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!