हटके

कुंडल येथे १ सप्टेंबरला क्रांतिअग्रणी वक्तृत्व स्पर्धा

कुंडल येथे १ सप्टेंबरला क्रांतिअग्रणी वक्तृत्व स्पर्धा
28 Aug 2026, 17:47 195 views
दोनशेहून अधिक स्पर्धकांची नोंदणी; पदवी व ज्युनिअर विभागातील विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके

कुंडल : क्रांती WAVE वृत्तसेवा

कुंडल येथील क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड महाविद्यालयाच्या वतीने ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आयोजित करण्यात येणारी राज्यस्तरीय ‘क्रांतीअग्रणी वक्तृत्व स्पर्धा’ सोमवार, १ सप्टेंबर रोजी महाविद्यालयात होणार आहे. या स्पर्धेसाठी आतापर्यंत दोनशेहून अधिक स्पर्धकांनी नोंदणी केली असून, अंतिम मुदतीपर्यंत सुमारे २२५ स्पर्धक सहभागी होतील, अशी माहिती स्वागताध्यक्ष तथा क्रांती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड यांनी दिली. स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांच्या हस्ते होणार असून, आमदार अरुण लाड यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होईल.

विचार आणि कृतिशील वारशाला व्यासपीठ

क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांनी स्वातंत्र्यलढ्यासह सामाजिक, शैक्षणिक, सहकार आणि कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या विचारांचा आणि कृतिशील वारशाचा पुढे नेण्याबरोबरच तरुणांमधील वक्तृत्वकौशल्याला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले जाते. स्पर्धेत पदवी आणि ज्युनिअर असे दोन विभाग करण्यात आले आहेत. विविध सामाजिक, राजकीय आणि समकालीन विषयांवर स्पर्धकांना आपले विचार मांडावे लागणार आहेत.

या विषयांवर होणार वक्तृत्व स्पर्धा

स्पर्धेसाठी पुढील विषय देण्यात आले आहेत—

  • ‘धुमसत्या जगातील भारत’
  • ‘स्वाभिमानाचा हुंकार’
  • ‘साताऱ्याचे प्रतिसरकार’
  • ‘तोचि साधु ओळखावा’
  • ‘ही हाक कुठे घेऊन जाईल?’
  • ‘भेसळ’
  • ‘जेन-झी : बदलत्या काळाची स्पंदने’
  • ‘तीचा संयम’

या विषयांमधून देशातील बदलती परिस्थिती, सामाजिक प्रश्न, इतिहास, मूल्यव्यवस्था, तरुणाई आणि समकालीन आव्हाने यांचा वेध घेण्याची संधी स्पर्धकांना मिळणार आहे.

विजेत्यांना आकर्षक पारितोषिके

स्पर्धेतील पदवी विभागातील विजेत्यांना अनुक्रमे १५ हजार, १३ हजार, ९ हजार, ७ हजार, ५ हजार, ३ हजार आणि २ हजार रुपये अशी रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. ज्युनिअर विभागातील विजेत्यांना अनुक्रमे १० हजार, ८ हजार, ६ हजार, ४ हजार, २ हजार आणि १ हजार रुपये अशी रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. याशिवाय दोन्ही विभागांत उत्तेजनार्थ पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. विजेत्यांना रोख पारितोषिकांसोबत सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग

या स्पर्धेत राज्यातील विविध भागांतील महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होत आहेत. यंदा आतापर्यंत दोनशेहून अधिक स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. अंतिम मुदतीपर्यंत सुमारे २२५ स्पर्धक सहभागी होतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. वक्तृत्वाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या वैचारिक क्षमतेला चालना मिळावी, सामाजिक प्रश्नांवर त्यांना प्रभावीपणे व्यक्त होता यावे आणि नव्या पिढीतून दर्जेदार वक्ते घडावेत, हा या स्पर्धेमागील प्रमुख उद्देश आहे.

मान्यवरांची उपस्थिती

स्पर्धेच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रताप लाड, डॉ. धनंजय होनमाने, प्रा. भारती सुतार, प्रा. गायत्री शिंदे, प्रा. अरुणा जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कुंडल येथे दरवर्षी होणाऱ्या या वक्तृत्व स्पर्धेला राज्यभरातील विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद मिळत असून, यंदाची स्पर्धाही वैचारिक आणि दर्जेदार वक्तृत्वाचा अनुभव देणारी ठरण्याची अपेक्षा आहे.

शेअर करा:
Facebook Twitter WhatsApp
कमेंट्स (0)

अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!