शेती

उसातील पाणी व्यवस्थापनासाठी 'क्रांती'कडून मॉइश्चर सेन्सर्स : आ. अरुण लाड

उसातील पाणी व्यवस्थापनासाठी 'क्रांती'कडून मॉइश्चर सेन्सर्स : आ. अरुण लाड
04 Aug 2026, 16:40 994 views
 कुंडल : क्रांती WAVE वृत्तसेवा                                                                                                                                                                                             ऊस शेतीमध्ये वैज्ञानिक पद्धतीने पाणी व्यवस्थापन करून पाण्याची बचत, उत्पादनवाढ आणि जमिनीचे आरोग्य जपण्यासाठी क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या ऊस विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मॉइश्चर सेन्सर्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत, अशी घोषणा कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा आमदार अरुण लाड यांनी केली.

                                                               कारखान्याच्या वतीने मंगळवारी शेतकरी चर्चासत्र आयोजित केले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना आ. लाड म्हणाले, ऊस शेतीमध्ये अनेकदा गरजेपेक्षा अधिक पाणी दिले जाते. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होण्याबरोबरच जमिनीच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा अवलंब केला असला, तरी पिकाला नेमक्या वेळी आणि किती पाणी द्यावे, याबाबत अनेकदा संभ्रम निर्माण होतो. अशा वेळी जमिनीतील ओलाव्याचे अचूक मोजमाप करून पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार आवश्यक तेवढेच पाणी देण्यास मार्गदर्शन करणारे मॉइश्चर सेन्सर्स अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. या आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कारखान्याने फायलो कंपनीशी करार केला आहे. परिसरातील जास्तीत जास्त ऊस उत्पादकांनी या योजनेचा लाभ घेऊन आधुनिक सिंचन तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.                                                                                                                      यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी मनोजकुमार वेताळ यांनी मार्गदर्शन करताना शेतीकडे केवळ पारंपरिक नव्हे, तर व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असल्याचे सांगितले. शाश्वत ऊस उत्पादनासाठी जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण किमान ०.७० टक्क्यांपेक्षा अधिक असणे आवश्यक असून, त्यासाठी हिरवळीची खते, जिवाणू खते आणि एकात्मिक खत व्यवस्थापनाचा अवलंब करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

फायलो कंपनीचे विपणन व्यवस्थापक विशालकुमार मिरजे यांनी मॉइश्चर सेन्सर्सची कार्यपद्धती, त्याचे फायदे आणि प्रत्यक्ष वापर याबाबत सविस्तर माहिती दिली. या तंत्रज्ञानामुळे पाणी बचत, अचूक सिंचन व्यवस्थापन आणि ऊस उत्पादनात वाढ साध्य होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

चर्चासत्रास कारखान्याचे व्हाईस चेअरमन जयप्रकाश साळुंखे, कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे, दिलीप थोरबोले, अनिल पवार, जितेंद्र पाटील, संग्रामसिंह जाधव, सचिव विरेंद्र देशमुख,  माजी संचालक कुंडलिक थोरात,  पोपट संकपाळ, संदीप पवार, अशोक पवार, शेती अधिकारी दिलीप पार्लेकर, ऊस विकास अधिकारी विलास जाधव, जगन्नाथ आवटे, संदीप पाटील, प्रवीण जाधव, विनोद जाधव, संपत जाधव, प्रवीण पवार, मोहन पवार, आकाराम पाटील, शंकर जगदाळे तसेच परिसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. स्वागत - प्रास्ताविक सहाय्यक ऊस विकास अधिकारी हर्षल पाटील यांनी केले. जयकर मुळीक यांनी आभार मानले. 

शेअर करा:
Facebook Twitter WhatsApp
कमेंट्स (6)
Chetan Subhash Sarade 04 Aug 2026 18:17

आयडियल पद्धतीने चांगले आहे

Sandip nanaso chavan 04 Aug 2026 21:16

कारखान्याच्या ह्या उपक्रमाबद्दल हार्दिक अभिनंदन

Sandip nanaso chavan 04 Aug 2026 21:16

कारखान्याच्या ह्या उपक्रमाबद्दल हार्दिक अभिनंदन

Prashant Jounjale 04 Aug 2026 21:57

Super Management for the farmar.

दिनकर पाटील 04 Aug 2026 22:42

क्रांतीच्या आधुनिक तंत्रज्ञामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यान्च्या उत्पनात बरीच वाढ झाली आहे.

Ramij mulla 05 Aug 2026 20:12

डेमो चा विडिओ पाठवा