फीचर्स

यंदा उसाला चांगला दर मिळणार : आ.अरुण लाड : क्रांती १२ लाख टन ऊस गाळप करणार

यंदा उसाला चांगला दर मिळणार : आ.अरुण लाड : क्रांती १२ लाख टन ऊस गाळप करणार
24 Sep 2026, 14:40 956 views
कुंडल : क्रांती WAVE वृत्तसेवा : यंदाचा ऊस गळीत हंगाम आव्हानात्मक असला, तरी यंदा उसाला व साखरेला चांगला दर मिळण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना चांगला ऊसदर देण्याच्या दृष्टीने क्रांती साखर कारखाना प्रयत्नशील आहे. सन २०२६-२७ मध्ये १२ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, कार्यक्षेत्रातील सभासद व शेतकऱ्यांनी आपला ऊस क्रांती कारखान्याला पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा आमदार अरुण लाड यांनी केले.

कुंडल येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२६-२७ च्या २५ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ चिखलगोठण येथील प्रगतिशील शेतकरी सौ. व श्री. अशोक शामराव पवार यांच्या हस्ते, कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. अरुण लाड यांच्या अध्यक्षतेखाली आणि चेअरमन शरद लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी आ. अरुण लाड बोलत होते.

आ. लाड म्हणाले, “यंदाचा गळीत हंगाम आव्हानात्मक आहे. मात्र साखरेला चांगला दर मिळण्याची परिस्थिती निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांना चांगला ऊसदर देण्याची क्षमता कारखान्याला निर्माण होऊ शकते. त्यासाठी शेतकऱ्यांचा ऊस पुरवठा आणि कारखान्याचे काटेकोर नियोजन महत्त्वाचे आहे.”

शेतकऱ्यांना ऊस तोडणी व वाहतुकीची सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी कारखान्याने यावर्षी घानवड आणि शिरढोण येथे नव्याने ऊस गट कार्यालये सुरू केली आहेत. तसेच कारखान्याची ऊस तोडणी यंत्रणा यंदा अधिक सक्षम व नियोजनबद्ध राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

“शेतकऱ्यांनी ऊस १४ महिन्यांचा झाल्यानंतरच तोडणीसाठी द्यावा. योग्य वयाचा ऊस गाळपासाठी उपलब्ध झाल्यास अपेक्षित वजनाबरोबरच साखरेचे उत्पादनही वाढण्यास मदत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस पिकाची योग्य वाढ होण्यासाठी आवश्यक काळजी घ्यावी,” असे आवाहनही आ. लाड यांनी केले.

ते पुढे म्हणाले, आपल्या भागाच्या विकासामध्ये सहकारी संस्थांचे मोठे योगदान आहे. सहकाराच्या माध्यमातून शेतकरी, कामगार आणि ग्रामीण भागाच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळाली आहे. त्यामुळे सहकाराची ही चळवळ अधिक सक्षम आणि टिकाऊ ठेवण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी क्रांती कारखान्याला ऊस पुरवठा करून या सहकार चळवळीत आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन जयप्रकाश साळुंखे, संचालक मंडळातील सर्व संचालक, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक कार्यकारी संचालक अप्पासाहेब कोरे यांनी केले. सूत्रसंचालन पवन चव्हाण यांनी केले. 

शेअर करा:
Facebook Twitter WhatsApp
कमेंट्स (0)

अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!