फीचर्स

पदवीधर-शिक्षकसाठी महायुतीचे ३-१-१ असे सूत्र निश्चित ; भाजपकडून शरद लाड यांचे नाव निश्चित

पदवीधर-शिक्षकसाठी महायुतीचे ३-१-१ असे सूत्र निश्चित ; भाजपकडून शरद लाड यांचे नाव निश्चित
02 Oct 2026, 17:03 1,234 views
मुंबई : क्रांती WAVE वृत्तसेवा

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागावाटपाचे ३-१-१ असे सूत्र निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार भाजप तीन, शिवसेना शिंदे गट एक आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एक जागा मिळणार असल्याचे वृत्त आहे. या जागावाटपामुळे पुणे पदवीधर मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाण्याचे जवळपास निश्चित मानले जात असून, या मतदारसंघातून शरद लाड यांच्या नावाची चर्चा आता अधिक  आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपकडून शरद लाड यांच्या नावाची यापूर्वीपासूनच चर्चा सुरू आहे. त्यामुळे जागावाटप भाजपच्या बाजूने झाल्यानंतर आता उमेदवाराच्या अधिकृत घोषणेकडे लक्ष लागले आहे. शरद लाड यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. २०२०च्या निवडणुकीत या मतदारसंघातून अरुण लाड विजयी झाले होते. यंदाच्या निवडणुकीत शरद लाड यांच्या नावाची भाजपकडून चर्चा सुरू असल्याने या मतदारसंघाकडे पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघाचा तिढा कायम

महायुतीच्या जागावाटपाच्या सूत्रानुसार नागपूर पदवीधर आणि पुणे पदवीधर या दोन जागा भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे, तर छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे जाणार असल्याचे वृत्त आहे. मात्र पुणे शिक्षक मतदारसंघावर भाजप आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही पक्षांचा दावा कायम असल्याने या एका जागेचा तिढा अद्याप कायम आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेनेकडून मंगेश चिवटे यांच्या नावाची चर्चा आहे, तर भाजपकडून कौस्तुभ गावडे यांच्यासह अन्य इच्छुकांची नावे पुढे आली आहेत. त्यामुळे जागावाटपाचा अंतिम निर्णय आणि उमेदवारांची अधिकृत घोषणा झाल्यानंतरच या मतदारसंघातील चित्र स्पष्ट होणार आहे.

उमेदवारांच्या घोषणेकडे लक्ष

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारांची नावे वरिष्ठ पातळीवर निश्चित केली जाणार असल्याचे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वी सांगितले होते. त्यामुळे ३-१-१ जागावाटपाचे सूत्र स्पष्ट झाल्यानंतर आता उमेदवारांच्या अधिकृत घोषणेला वेग येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, विधान परिषदेच्या या पाच जागांसाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार असून २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होण्यापूर्वी महायुतीतील सर्व जागांवरील उमेदवारांचे चित्र स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.

शेअर करा:
Facebook Twitter WhatsApp
कमेंट्स (0)

अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!