महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणूक प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. जानेवारी २०२६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीनुसार पुणे विभागात ३ लाख ७ हजार ८२३ पदवीधर मतदार, तर ५१ हजार ७५० शिक्षक मतदार आहेत. त्यानंतर झालेली मतदार नोंदणी तसेच २६ सप्टेंबरपर्यंत होणाऱ्या नव्या मतदार नोंदणीमुळे अंतिम मतदारसंख्येत बदल होणार आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने आदर्श आचारसंहिता तत्काळ प्रभावाने लागू झाली आहे. सर्व राजकीय पक्षांनी भारत निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेसंबंधी निर्देशांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले.
निवडणूक कार्यक्रम आणि आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांची माहिती राजकीय पक्षांना देण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले होत्या. पुणे जिल्ह्यातील राजकीय पक्षांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष, तर सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील प्रतिनिधी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. पाचही जिल्ह्यांतील जिल्हा निवडणूक प्रशासन, पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासनाचे अधिकारी व प्रतिनिधीही बैठकीला उपस्थित होते.
भारत निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या सार्वत्रिक किंवा पोटनिवडणुकांसाठी लागू असलेल्या आचारसंहिताविषयक तरतुदी या निवडणुकीसाठीही लागू असतील, अशी माहिती विभागीय आयुक्तांनी दिली. आचारसंहितेसंबंधी मार्गदर्शक पुस्तिका जिल्हा निवडणूक प्रशासन तसेच भारत निवडणूक आयोग आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विभागातील सर्व जिल्हाधिकारी संबंधित जिल्ह्यांसाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
या निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी नव्याने मतदार नोंदणीची संधी सर्वसाधारणपणे २६ सप्टेंबर २०२६पर्यंत उपलब्ध आहे. यासाठीचे अर्ज पदनिर्देशित अधिकाऱ्यांकडे जमा करावेत. पदनिर्देशित अधिकाऱ्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयात उपलब्ध आहे.
नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या अंतिम दिनांकाच्या दहा दिवस अगोदरपर्यंत नवीन मतदार नोंदणीसाठी दाखल झालेल्या अर्जांवर कार्यवाही करता येईल, अशी माहितीही विभागीय आयुक्तांनी दिली. त्यामुळे पात्र मतदारांनी निर्धारित मुदतीत मतदार नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले.
या निवडणुकीतील मतदान मतपत्रिकेद्वारे पसंतीक्रम नोंदवून केले जाते. त्याबाबत निवडणूक प्रशासनाकडून मतदारांमध्ये जनजागृती केली जात आहे. राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करताना आवश्यक ती काळजी घ्यावी. अर्जांची छाननी, उमेदवारी अर्ज मागे घेणे तसेच निवडणूक खर्चाच्या मर्यादांचे पालन करण्याबाबत आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी, असे आवाहन करण्यात आले. बैठकीदरम्यान राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या विविध शंकांचे विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी निरसन केले.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची अधिसूचना २९ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर २०२६ आहे. अर्जांची छाननी ७ ऑक्टोबर रोजी होणार असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ९ ऑक्टोबर २०२६ आहे.
२३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होणार आहे. मतमोजणी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार असून, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबर २०२६पूर्वी पूर्ण केली जाणार आहे.
अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!