फीचर्स

क्रांती देशातील सर्वोत्कृष्ट कारखाना : मानाचा वसंतदादा पाटील पुरस्कार जाहीर

क्रांती देशातील सर्वोत्कृष्ट कारखाना : मानाचा वसंतदादा पाटील पुरस्कार जाहीर
11 Sep 2026, 19:38 804 views
कुंडल : क्रांती WAVE वृत्तसेवा                                                                          कुंडल येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ च्या गळीत हंगामातील उल्लेखनीय कामगिरीची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ लिमिटेड (NFCSF), नवी दिल्ली यांच्यावतीने देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्यासाठीचा प्रतिष्ठेचा ‘वसंतदादा पाटील पुरस्कार’ क्रांती कारखान्यास जाहीर झाला आहे.राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाने दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी कारखान्याला पाठविलेल्या अधिकृत पत्राद्वारे पुरस्काराची घोषणा केली. कारखान्याने सादर केलेल्या कामगिरीच्या माहितीचे मूल्यमापन केल्यानंतर भारत सरकारच्या साखर विभागाच्या मुख्य संचालकांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ पुरस्कार निवड समितीने कार्यक्षमता पुरस्कार २०२५-२६ चे निकाल अंतिम केले आहेत.सन २०२५-२६ चा गळीत हंगाम विविध आव्हानांनी भरलेला असतानाही क्रांती कारखान्याने दाखविलेली कार्यक्षमता, साखर उत्पादनातील गुणवत्ता, तांत्रिक व्यवस्थापन आणि शेतकरीहिताची भूमिका यांची प्रभावी दखल घेत राष्ट्रीय पातळीवरील हा प्रतिष्ठेचा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.मंगळवार, दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे आयोजित दिमाखदार पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय मंत्री व राज्य मंत्र्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्यास क्रांती कारखान्याचे संपूर्ण संचालक मंडळ उपस्थित राहणार आहे.क्रांती कारखान्याला यापूर्वीही विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. मात्र, संपूर्ण भारतातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना म्हणून ‘वसंतदादा पाटील पुरस्कार’ मिळणे ही क्रांतीच्या कार्यक्षम आणि शेतकरीकेंद्री वाटचालीवर राष्ट्रीय पातळीवरील शिक्कामोर्तब करणारी बाब आहे.हा पुरस्कार केवळ कारखान्याचा सन्मान नसून क्रांतीवर विश्वास ठेवणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा, संचालक मंडळाचा, अधिकारी-कर्मचारी वर्गाचा आणि संपूर्ण क्रांती परिवाराच्या सामूहिक कार्याचा गौरव असल्याची भावना व्यक्त होत आहे.क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड यांच्या शेतकरी व कष्टकरी हिताच्या विचाराने कार्यरत असणारे कारखान्याचे संस्थापक संचालक आमदार अरुण लाड यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांती कारखान्याने आव्हानात्मक परिस्थितीतही कार्यक्षमता आणि गुणवत्तेचा उच्चांक कायम राखत सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण केला आहे. या राष्ट्रीय पुरस्कारामुळे ‘क्रांती’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.  
  • “कारखाना प्रशासन व कर्मचारी वर्गाचे अथक परिश्रम, संचालक मंडळाचे मार्गदर्शन आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांनी क्रांती कारखान्यावर ठेवलेला दृढ विश्वास, या सामूहिक योगदानातूनच संपूर्ण भारतातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा ‘वसंतदादा पाटील पुरस्कार’ मिळविण्यात यश आले आहे. हा पुरस्कार क्रांती परिवारातील प्रत्येक घटकाच्या कष्टांचा आणि शेतकऱ्यांच्या विश्वासाचा गौरव आहे.”.                                                               - शरद लाड, अध्यक्ष, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना लि., कुंडल
शेअर करा:
Facebook Twitter WhatsApp
कमेंट्स (2)
Vitthal kesu jamdade wai dist satara 11 Sep 2026 21:03

Ahabnindan

Akash Balaso Shelke 11 Sep 2026 21:26

क्रांती अग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना लि कुंडल ता. पलुस जि. सांगली
भारतातील सर्वश्रेष्ठ साखर कारखाना अवॉर्ड 2025 2026