महाराष्ट्र

कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी क्रांती कारखान्याचा पुढाकार

कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी क्रांती कारखान्याचा पुढाकार
15 Aug 2026, 12:16

ऊस उत्पादनासोबतच पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागणार

कुंडल : क्रांती WAVE वृत्तसेवा

जागतिक तापमानवाढ (Global Warming) आणि हवामान बदलाच्या (Climate Change) वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या सहकार चळवळीला नवी दिशा देणारे महत्त्वपूर्ण पाऊल क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याने उचलले आहे. वाढते कार्बन उत्सर्जन रोखणे आणि शाश्वत ऊसशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी क्रांती कारखाना आणि ग्लोबार्क सोल्युशन्स यांच्यात कार्बन क्रेडिटचा महत्त्वपूर्ण करार नुकताच झाला. याबाबतची माहिती कारखान्याचे चेअरमन शरद लाड यांनी दिली.

शाश्वत ऊसशेतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर

शरद लाड म्हणाले, "क्रांती कारखाना ऊसशेतीमध्ये सातत्याने नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा प्रयत्न करीत आहे. कार्बन क्रेडिटचा हा प्रकल्प त्याच दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. या प्रकल्पासाठी कोलंबिया युनिव्हर्सिटी, न्यूयॉर्क येथून ‘मास्टर ऑफ सायन्स इन सस्टेनेबिलिटी’ या विषयात उच्च शिक्षण घेतलेले ग्लोबार्क सोल्युशन्सचे संस्थापक ध्रुव दीपक साकोरे तसेच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून उच्च शिक्षण घेतलेले संस्थापक वत्सल अग्रवाल यांचे तांत्रिक पाठबळ लाभणार आहे."

१४ हजार शेतकरी, २३ हजार एकर क्षेत्राचा समावेश

या प्रकल्पाची व्याप्ती तब्बल १४ हजार शेतकरी आणि सुमारे २३ हजार एकर ऊस क्षेत्र इतकी आहे. प्रकल्पांतर्गत आधुनिक ‘डिजिटल व स्मार्ट पीक निरीक्षण आणि व्यवस्थापन प्रणाली’ प्रभावीपणे वापरण्यात येणार आहे. कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शाश्वत ऊसशेती (Sustainable Sugarcane Cultivation) करण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

पाणी, खत बचतीसह कार्बन संवर्धनाला चालना

या प्रकल्पामुळे पर्यावरणपूरक कृषी पद्धतींना गती मिळण्यास मदत होणार आहे. शाश्वत शेती पद्धतींच्या माध्यमातून पाण्याची बचत, रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर आणि जमिनीतील कार्बन संवर्धन यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे ऊस उत्पादनासोबतच पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागणार असल्याचे सांगण्यात आले.

सहकार क्षेत्रासाठी नवा आदर्श

कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्देशाने सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना शाश्वत शेती पद्धतीशी जोडण्याचा हा उपक्रम सहकार क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पर्यावरणपूरक शेती, डिजिटल तंत्रज्ञान आणि कार्बन क्रेडिट यांचा संगम घडवून आणणाऱ्या या प्रकल्पातून भविष्यात शेतकऱ्यांना आर्थिक तसेच पर्यावरणीयदृष्ट्या फायदे मिळण्याची अपेक्षा आहे.

करारप्रसंगी मान्यवरांची उपस्थिती

या करारप्रसंगी कारखान्याचे व्हाइस चेअरमन जयप्रकाश साळुंखे, कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे, सचिव वीरेंद्र देशमुख, ऊस विकास अधिकारी विलास जाधव, नागराळेचे माजी उपसरपंच इंद्रजित पवार, सहाय्यक ऊस विकास अधिकारी हर्षल पाटील, जयकर मुळीक तसेच ग्लोबार्कचे प्रकल्प समन्वयक विनायक मोरे उपस्थित होते.
शेअर करा:
Facebook Twitter WhatsApp
कमेंट्स (0)

अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!