महाराष्ट्र

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी
24 Sep 2026, 20:40 18 views

सांगली : क्रांती WAVE वृत्तसेवा : पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व समन्वय अधिकाऱ्यांनी सोपविलेल्या जबाबदाऱ्या संघभावनेने पार पाडून विधानपरिषद निवडणूक यशस्वी करावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिले.

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्त समन्वय अधिकाऱ्यांची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात शीतल तेली-उगले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी अतिरिक्त आयुक्त तुषार ठोंबरे यांच्यासह नोडल अधिकारी तसेच दूरदृश्यप्रणालीद्वारे निवडणुकीशी संबंधित पाचही जिल्ह्यांतील अधिकारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले म्हणाल्या, या निवडणुका मतपत्रिकेद्वारे पसंतीक्रम नोंदवून घेण्यात येतात. ही बाब वगळता आचारसंहितेसह अन्य निवडणूकविषयक तरतुदी सार्वत्रिक निवडणुकांप्रमाणेच आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी निवडणूक नियमांचा सखोल अभ्यास करून त्यानुसार कार्यवाही करावी.

निवडणुकीच्या विविध जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक नियोजन करावे. मतमोजणीची प्रक्रिया तुलनेने अधिक वेळ चालण्याची शक्यता लक्षात घेता, मतमोजणीच्या वेळी अधिकारी, कर्मचारी तसेच संबंधित घटकांना आवश्यक सुविधा योग्य प्रकारे उपलब्ध होतील, याचे नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी अतिरिक्त आयुक्त तुषार ठोंबरे यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्त समन्वय अधिकाऱ्यांच्या अधिनस्त विविध कक्षांच्या जबाबदाऱ्यांचे सादरीकरण केले.

बैठकीत मनुष्यबळ नियोजन, आचारसंहिता, तक्रारी, माध्यमे व खर्च नियंत्रण, मतदानपूर्व तयारी, वाहतूक आराखडा, अधिकारी-कर्मचारी तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींचे प्रशिक्षण, वेबकास्टिंग, संगणकीकरण, माध्यम कक्ष, पेड न्यूज, पोलीस मनुष्यबळ नियोजन, कायदा व सुव्यवस्था, भरारी पथक, स्थिर सर्वेक्षण पथक आदींच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.

तसेच प्रचार साहित्यविषयक तरतुदींचे पालन, जाहिरातींचे पूर्वप्रमाणीकरण, प्रत्यक्ष मतदानाची तयारी, मतदान केंद्रांवरील आवश्यक सुविधा, मतमोजणी प्रक्रिया आणि त्यासाठीच्या सुविधांबाबतही अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विविध पातळ्यांवर नियोजन सुरू केले असून, निवडणूक प्रक्रिया नियमबद्ध, पारदर्शक आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी संबंधित यंत्रणांना जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.

शेअर करा:
Facebook Twitter WhatsApp
कमेंट्स (0)

अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!