महाराष्ट्र

वाढीव घरपट्टीविरोधात सांगली, मिरज आणि कुपवाड बंद; नागरिक-व्यापाऱ्यांचा एल्गार, महापालिकेला घेराव

वाढीव घरपट्टीविरोधात सांगली, मिरज आणि कुपवाड बंद; नागरिक-व्यापाऱ्यांचा एल्गार, महापालिकेला घेराव
04 Aug 2026, 17:49


सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेने भांडवली मूल्यावर आधारित वाढीव घरपट्टी लागू केल्याच्या निर्णयाविरोधात मंगळवारी शहरात अभूतपूर्व बंद पाळण्यात आला. वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली नागरिक, व्यापारी, व्यावसायिक, विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याने शहरातील प्रमुख बाजारपेठांमधील व्यवहार दिवसभर ठप्प झाले.

बंददरम्यान स्टेशन चौकातून महापालिकेपर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांनी महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत वाढीव घरपट्टीचा निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी केली. अनेक मालमत्ताधारकांना अवाजवी कर आकारणीच्या नोटिसा मिळाल्याचा आरोप करत या प्रक्रियेत गंभीर त्रुटी असून नागरिकांवर अन्याय होत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवत आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यामुळे सांगली, मिरज आणि कुपवाडमधील प्रमुख बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. नागरिकांनीही मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होत महापालिकेच्या कर धोरणाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन वाढीव घरपट्टीची अंमलबजावणी स्थगित करावी, सर्व हरकतींची पारदर्शक सुनावणी घ्यावी, त्रुटी दुरुस्त करूनच अंतिम कर आकारणी करावी आणि अन्यायकारक वाढ पूर्णपणे मागे घ्यावी, अशी मागणी केली. यावेळी प्रशासनाकडून नागरिकांच्या हरकतींची दखल घेऊन नियमानुसार पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले.

महापालिकेच्या वाढीव घरपट्टीविरोधातील हे आंदोलन आगामी काळात आणखी तीव्र करण्याचा इशाराही कृती समितीने दिला असून, जोपर्यंत अन्यायकारक कर आकारणी मागे घेतली जात नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील, असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला. 

शेअर करा:
Facebook Twitter WhatsApp
कमेंट्स (0)

अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!