महाराष्ट्र

क्रांतीसिंहांच्या विचारांचा वारसा समाजहितासाठी जपूया : आ. अरुण लाड

क्रांतीसिंहांच्या विचारांचा वारसा समाजहितासाठी जपूया : आ. अरुण लाड
03 Aug 2026, 13:12
क्रांतीसिंह नाना पाटील  यांना जयंतीनिमित्त अभिवादन; क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. (बापू) लाड यांच्या कार्यालाही उजाळा
कुंडल : प्रतिनिधी                                                     क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या राष्ट्रभक्ती, त्याग, धैर्य आणि क्रांतिकारी विचारांना विनम्र अभिवादन करताना, त्यांच्या विचारांचा वारसा जपत समाजहितासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन आमदार अरुण लाड यांनी केले.
जयंतीनिमित्त क्रांती इंटरनॅशनल पब्लिक स्कूलतर्फे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच क्रांती साखर कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी यांनी कारखाना कार्यस्थळावरील  क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.  यानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार लाड म्हणाले, "क्रांतीसिंह नाना पाटील यांनी अन्यायाविरुद्ध संघर्षाची मशाल पेटवत स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली. त्यांचे राष्ट्रप्रेम, त्याग, धैर्य आणि जनतेसाठी लढण्याची वृत्ती आजही प्रत्येकाला प्रेरणा देणारी आहे. त्यांच्या विचारांतील सामाजिक न्याय, स्वाभिमान आणि लोकहिताची मूल्ये आजच्या काळात अधिक महत्त्वाची ठरतात."
यावेळी त्यांनी सहकार, शिक्षण आणि समाजपरिवर्तनाच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. (बापू) लाड यांनाही कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. "ग्रामीण भागाच्या विकासासाठी, शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी बापूंनी उभारलेले सहकाराचे मॉडेल आजही प्रेरणादायी आहे. समाजसेवा, प्रामाणिकपणा आणि विकासाची त्यांची दृष्टी पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहे," असेही ते म्हणाले.
आमदार लाड यांनी पुढे सांगितले की, संघर्षाची जिद्द, समाजसेवेची निष्ठा आणि परिवर्तनाची व्यापक दृष्टी ही या दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांची खरी ओळख आहे. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा जपत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच सर्वसामान्यांच्या हितासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा निर्धार आपण सर्वांनी केला पाहिजे.
क्रांतीसिंह नाना पाटील आणि क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. (बापू) लाड यांच्या कार्यामुळे स्वातंत्र्य, सहकार, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाची जी परंपरा निर्माण झाली, ती अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येकाने योगदान देणे हीच त्यांना खरी मानवंदना ठरेल, असे आवाहनही लाड यांनी केले. यावेळी क्रांती इंटरनॅशनल पब्लिक स्कूलचे विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी तसेच क्रांती कारखन्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
शेअर करा:
Facebook Twitter WhatsApp
कमेंट्स (0)

अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!