महाराष्ट्र
सागरेश्वर अभयारण्यात निसर्ग सौंदर्याची मुक्त उधळण
03 Aug 2026, 11:30
245 views
पलूस | प्रतिनिधी
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कडेगाव तालुक्यात पावसाळ्याने निसर्गाला नवसंजीवनी दिली असून, संपूर्ण परिसर हिरवाईने नटला आहे. पावसामुळे डोंगरदऱ्या, जंगल परिसर आणि पठारे खुलून दिसत असून, सागरेश्वर अभयारण्य, डोंगराई मंदिर आणि सोनसळ येथील चौरंगीनाथ मंदिर परिसर सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र ठरत आहेत.
कडेगाव शहरापासून अवघ्या तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगराई मंदिराकडे जाणारा नागमोडी घाटमार्ग आणि प्रवेशद्वारावरील भव्य कमान पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. डोंगरमाथ्यावर पोहोचल्यानंतर हिरवाईने नटलेले विस्तीर्ण पठार, कडेगाव शहराचे विहंगम दृश्य आणि पाण्याने तुडुंब भरलेला तलाव पर्यटकांना मंत्रमुग्ध करतो. येथे भाविकांसाठी निवासाची तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
डोंगराई परिसरातील वाघजाई आणि तरस गुहा या ठिकाणांनाही विशेष महत्त्व आहे. या परिसरात विविध प्रकारचे पक्षी, वन्यप्राणी तसेच औषधी वनस्पतींची समृद्ध जैवविविधता पाहायला मिळते. त्यामुळे निसर्गप्रेमी आणि वन्यजीव अभ्यासकांसाठीही हा परिसर आकर्षणाचा विषय ठरत आहे.
दरम्यान, मानवनिर्मित म्हणून देशभरात ओळख असलेले सागरेश्वर अभयारण्य पावसाळ्यात आणखी खुलून दिसत आहे. दाट जंगल, हिरव्यागार टेकड्या आणि निसर्गरम्य वातावरणामुळे ट्रेकिंगसाठी तसेच कुटुंबासह सहलीसाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे भेट देत आहेत.
अभयारण्यात देवताळ, वेणुविहार तलाव, छत्री बंगला, घोडेबिळ, तरस गुहा, रणशुळा, शिखर, महानगुंड आणि किर्लोस्कर पॉइंट यांसारखी अनेक पर्यटनस्थळे आहेत. येथे हरण, चितळ, काळवीट, चिंकारा, कोल्हा, लांडगा, तरस, साळिंदर, खवले मांजर आदी वन्यप्राण्यांसह घार, ससाणा, पिंगळा, खंड्या, सुतार, सुगरण, बगळा अशा विविध पक्ष्यांचेही दर्शन घडते.
कडेगावपासून सुमारे १६ किलोमीटर अंतरावरील ऐतिहासिक व पौराणिक चौरंगीनाथ मंदिर परिसरही पावसामुळे नटला आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेल्या या मंदिर परिसरात धुक्याची चादर, हिरवागार निसर्ग आणि शांत वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. छायाचित्रकार, ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींसाठी हा परिसर विशेष आकर्षण ठरत आहे.
कमेंट्स (2)
Hemant kale hypnotism
03 Aug 2026 11:45
Very nice 👍
Hemant kale hypnotism
03 Aug 2026 11:45
Very nice 👍