कोयना धरणातून सहा वक्र दरवाज्यांद्वारे १६ हजार ५३५ क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. याशिवाय कोयना पायथा विद्युतगृहाचे एक युनिट कार्यरत असून त्याद्वारे १ हजार ५० क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कोयना नदीत एकूण १७ हजार ५८५ क्युसेक पाण्याचा विसर्ग होणार आहे. पावसाच्या तीव्रतेनुसार आणि धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणानुसार हा विसर्ग आणखी वाढविण्याची शक्यता जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे.
धरणातून वाढीव पाणी सोडण्यात येत असल्याने नदीपात्रातील पाणीपातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे, तसेच ग्रामपंचायत प्रशासन, महसूल यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील वारणा धरणात शुक्रवारी आठ वाजेपर्यंत २९.२४ टीएमसी पाणीसाठा नोंदविण्यात आला असून धरणाची एकूण साठवण क्षमता ३४.४० टीएमसी आहे. वारणा धरणातून ६ हजार ९०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
कोयना धरणात ८६.१२ टीएमसी, राधानगरीत ८.३३ टीएमसी, दूधगंगा १६.२५ टीएमसी, कासारी २.३३ टीएमसी, पाटगाव २.५९ टीएमसी आणि अलमट्टी धरणात ११४.५७ टीएमसी पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे.
कर्नाटकातील अलमट्टी धरणाची पाणीपातळी शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता ५१९.०६ मीटर इतकी होती. धरणात मागील दहा तासांत सरासरी ९१ हजार ९४५ क्युसेक पाण्याची आवक झाली, तर १ लाख १० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग कृष्णा नदीपात्रात सुरू होता. धरणात सध्या ११३.९२ टीएमसी (९२.५५ टक्के) एकूण पाणीसाठा असून त्यापैकी ९६.३० टीएमसी उपयुक्त (लाइव्ह) पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणाची कमाल साठवण क्षमता १२३.०८ टीएमसी आहे.
जिल्ह्यातील प्रमुख नद्यांवरील पूल अद्याप धोक्याच्या पातळीपासून दूर आहेत. आयर्विन पूल (सांगली) येथे पाण्याची पातळी १४.६ फूट असून इशारा पातळी ४० फूट आहे. तर हरिपूर येथील अंकली पुलाजवळ पाण्याची पातळी २०.३ फूट असून इशारा पातळी ४५.११ फूट आहे.
जलसंपदा विभागाने पुढील काही तासांत पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणांमधून विसर्गात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली असून नदीकाठच्या नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!