महाराष्ट्र

कोयना धरणातून पाणी सोडणार ; कृष्णाकाठला सावधानतेचा इशारा

कोयना धरणातून पाणी सोडणार ; कृष्णाकाठला सावधानतेचा इशारा
28 Jul 2026, 09:11 793 views

मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ; बुधवारी सकाळी ९ वाजता विद्युतगृहातून १,०५० क्युसेक पाणी सोडणार


कोयनानगर | प्रतिनिधी

कोयना धरण 80 टीएमसी भरण्याकडे वाटचाल सुरू आहे. धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी बुधवार, दि. २९ जुलै रोजी सकाळी ९ वाजता धरणाच्या पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू करून कोयना नदीपात्रात १,०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. पाऊस वाढल्यास धरणातील पाणीसाठा वाढण्याच्या शक्यतेने पुढील दोन तीन दिवसात निसर्ग आणखी वाढवण्याची शक्यता आहे. यामुळे कृष्णाकाठच्या गावाला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

 सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू  आहे.  धरणाच्या पाणीसाठ्यात सातत्याने मोठी वाढ होत आहे. यामुळे धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोयना सिंचन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पावसाचे प्रमाण आणि धरणात होणारी पाण्याची आवक लक्षात घेऊन या विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार बदल केला जाऊ शकतो. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

नदीपात्रात किंवा नदीकाठी अनावश्यक वावर टाळावा, तसेच नदीलगतच्या गावांतील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ग्रामपंचायती, महसूल विभाग, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि संबंधित विभागांनीही या सूचनेची तातडीने दखल घेऊन आवश्यक खबरदारीची उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.

शेअर करा:
Facebook Twitter WhatsApp
कमेंट्स (0)

अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!