महाराष्ट्र

पदवीधर, शिक्षक मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचा : चंद्रकांत पाटील

पदवीधर, शिक्षक मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचा : चंद्रकांत पाटील
19 Jul 2026, 09:21
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक-कर्मचाऱ्यांची मिरजेत बैठक

मिरज : आगामी पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल, मिरज येथे संस्थेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार नोंदणी, मतदानाची टक्केवारी वाढविणे, शिक्षक व पदवीधर मतदारांशी प्रभावी संपर्क साधणे, तसेच निवडणुकीसाठी आवश्यक नियोजन आणि संघटनात्मक जबाबदाऱ्यांबाबत बैठकीत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित शिक्षक व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. लोकशाही प्रक्रियेत शिक्षक आणि पदवीधर मतदारांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक पात्र मतदारापर्यंत पोहोचून त्यांना मतदार नोंदणी आणि मतदानासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

बैठकीस आमदार सुरेश खाडे, भाजपचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, भाजप नेते पृथ्वीराज पाटील, दीपक शिंदे, मकरंद देशपांडे, माजी आमदार विनय नातू, शरद लाड, अमर देशमुख, सुरेश आवटी यांच्यासह अन्य मान्यवर, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. आगामी निवडणुकीत सक्रिय सहभाग नोंदवून संघटनात्मक कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.


शेअर करा:
Facebook Twitter WhatsApp
कमेंट्स (0)

अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!