सांगलीत १०० विद्यार्थी क्षमतेचे बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालय; राज्य शासनाची मंजुरी
10 Jul 2026, 21:44
100 views
सांगलीत १०० विद्यार्थी क्षमतेचे बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालय; राज्य शासनाची मंजुरी सांगली : सांगली जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी असून, सांगली येथील शासकीय जी.एन.एम. नर्सिंग महाविद्यालयाचे श्रेणीवर्धन करून तेथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे बी.एस्सी. नर्सिंग पदवी महाविद्यालय सुरू करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. ही माहिती सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी दिली. महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने ८ जुलै २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. राज्यातील आठ शासकीय जी.एन.एम. महाविद्यालयांचे श्रेणीवर्धन करण्यात येणार असून त्यामध्ये सांगलीचा समावेश आहे. हे नवीन बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालय पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली येथे सुरू होणार आहे. यासाठी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. महाविद्यालयात दरवर्षी १०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर दर्जेदार परिचर्या पदवी शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच शासकीय रुग्णालयाच्या परिसरातच महाविद्यालय असल्याने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वैद्यकीय प्रशिक्षण व प्रात्यक्षिकांचा लाभ मिळणार आहे. केंद्र पुरस्कृत ‘Upgradation of Schools of Nursing to College of Nursing’ या योजनेअंतर्गत महाविद्यालयासाठी सुमारे ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय आवश्यक पदनिर्मिती व पायाभूत सुविधांसाठीही शासनाने मान्यता दिली आहे. या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करताना आमदार सुधीरदादा गाडगीळ म्हणाले की, “सांगली हे दक्षिण महाराष्ट्राचे वैद्यकीय केंद्र म्हणून ओळखले जाते. बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाच्या स्थापनेमुळे विद्यार्थ्यांना मोठी संधी मिळणार असून आरोग्य व्यवस्थेलाही प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होईल. याचा थेट फायदा सर्वसामान्य रुग्णांना होणार आहे.” या निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आमदार गाडगीळ यांनी आभार मानले.