महाराष्ट्र

पलूस मिनी एमआयडीसीतील भूखंड इतर उद्योगांना मिळण्याचा मार्ग मोकळा

पलूस मिनी एमआयडीसीतील भूखंड इतर उद्योगांना मिळण्याचा मार्ग मोकळा
10 Jul 2026, 16:01

पलूस मिनी एमआयडीसीतील भूखंड इतर उद्योगांना मिळण्याचा मार्ग मोकळा        

आ. अरुण लाड यांच्या मागणीची दखल घेत उद्योगमंत्री यांनी दिला निर्णय. 

मुंबई : विशेष प्रतिनिधी पलूस तालुक्यातील उद्योगवाढीला मोठी चालना देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला. अतिरिक्त पलूस औद्योगिक क्षेत्रातील उपलब्ध असलेले सुमारे १ लाख चौरस मीटर क्षेत्र द्राक्ष व अन्न प्रक्रिया उद्योगांसाठीच्या आरक्षणातून मुक्त करून सर्वसाधारण उद्योगांसाठी खुले करण्यास मंजुरी दिली. त्यामुळे अभियांत्रिकीसह विविध प्रकारच्या उद्योगांना या ठिकाणी भूखंड उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विधानपरिषदेत आमदार अरुण (अण्णा) लाड यांनी  केलेल्या मागणीची दखल घेत उद्योगमंत्री यांनी हा निर्णय जाहीर केला.विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनात  आमदार अरुण लाड यांनी पलूस औद्योगिक वसाहतीतील विविध समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधले होते. जवळपास ५० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या औद्योगिक वसाहतीत सध्या सुमारे १६० उद्योग कार्यरत आहेत. त्यापैकी बहुतांश अभियांत्रिकी उद्योग आहेत. नवीन उद्योग सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने पलूस, रामानंदनगर आणि सांडगेवाडी परिसरात नवीन औद्योगिक क्षेत्र उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.त्यांनी औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची दुरवस्था, अपुऱ्या सुविधा, वाढलेले वीजदर, पथदिव्यांचा अभाव, नगरपालिका स्तरावरील दुर्लक्ष तसेच सांडगेवाडी येथे वाईन पार्कसाठी आरक्षित असलेले क्षेत्र इतर उद्योगांसाठी खुले करण्याची उद्योजकांची सातत्यपूर्ण मागणी शासनासमोर मांडली. या निर्णयामुळे स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असेही त्यांनी नमूद केले.यावर उद्योगमंत्र्यांनी सांगितले की, पलूस येथील खासगी औद्योगिक वसाहतीतील काही प्रश्न महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) अखत्यारित येत नसले तरी सांडगेवाडी येथील वाईन पार्कबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सन २००१ च्या द्राक्ष प्रक्रिया उद्योग धोरणानुसार विकसित करण्यात आलेल्या या क्षेत्रात सुरुवातीला केवळ द्राक्ष प्रक्रिया उद्योगांना परवानगी होती. त्यानंतर २०१५ मध्ये अन्न प्रक्रिया उद्योगांनाही भूखंड वाटप करण्यास मान्यता देण्यात आली.मात्र, अभियांत्रिकी व इतर उद्योगांकडून वाढती मागणी लक्षात घेऊन एमआयडीसीच्या संचालक मंडळाने २४ मार्च २०२६ रोजी झालेल्या बैठकीत अतिरिक्त पलूस औद्योगिक क्षेत्रातील उपलब्ध १ लाख चौरस मीटर क्षेत्र सर्वसाधारण औद्योगिक वापरासाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार प्रचलित धोरणानुसार पात्र उद्योजकांना भूखंडांचे वाटप करण्यात येणार आहे.शासनाच्या माहितीनुसार, अतिरिक्त पलूस औद्योगिक क्षेत्रात एकूण ७१ औद्योगिक व एक व्यापारी भूखंडांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी ४१ औद्योगिक भूखंडांचे वाटप झाले आहे. तर पलूस मिनी औद्योगिक क्षेत्रातील सर्व ११ औद्योगिक व तीन व्यापारी भूखंडांचे वाटप यापूर्वीच पूर्ण झाले आहे. अतिरिक्त पलूस व पलूस (मिनी) औद्योगिक क्षेत्रात रस्ते, पाणीपुरवठा, पथदिवे आदी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याचेही उद्योगमंत्र्यांनी स्पष्ट केले.                             औद्योगिक विकासाला मिळणार चालना.                  या निर्णयामुळे पलूस तालुक्यातील औद्योगिक विकासाला नवी गती मिळणार आहे. अभियांत्रिकी, मशिनरी, फॅब्रिकेशन, मेटल वर्क तसेच इतर उत्पादन क्षेत्रातील उद्योगांना मोठा दिलासा मिळणार आहे. परिणामी स्थानिक स्तरावर गुंतवणूक वाढण्याबरोबरच रोजगारनिर्मितीलाही चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.                        पलूस तालुक्यात नवीन उद्योगांसाठी जागेचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. स्थानिक उद्योजक, औद्योगिक वसाहत सोसायटी आणि विविध उद्योग संघटनांकडून सांडगेवाडी येथील वाईन पार्कमधील आरक्षित क्षेत्र सर्वसाधारण उद्योगांसाठी खुले करण्याची मागणी सातत्याने होत होती. या मागणीची दखल घेत आमदार अरुण (अण्णा) लाड यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी सूचना मांडून शासनाकडे ठोस भूमिका घेण्याची मागणी केली. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अतिरिक्त पलूस औद्योगिक क्षेत्रातील उपलब्ध १ लाख चौरस मीटर क्षेत्र सर्वसाधारण उद्योगांसाठी खुले करण्याचा निर्णय जाहीर झाला. त्यामुळे पलूस तालुक्यातील औद्योगिक विस्ताराचा मार्ग मोकळा होणार आहे. स्थानिक उद्योजकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागणीला अखेर न्याय मिळाल्याची भावना उद्योग क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
शेअर करा:
Facebook Twitter WhatsApp
कमेंट्स (0)

अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!