वारणा धरण परिसरात अतिवृष्टी; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
08 Jul 2026, 20:46
वारणा धरण परिसरात अतिवृष्टी; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा शिराळा : वारणा धरण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बुधवार (दि. ८ जुलै) रोजी उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत १४६ मिमी पावसाची नोंद झाली असून यंदाच्या हंगामात आतापर्यंत एकूण ८१४ मिमी पाऊस झाला आहे. सततच्या पावसामुळे वारणा धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. धरणाची एकूण साठवण क्षमता ३४.४० टीएमसी असून सध्या धरणात १७.८८ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणाची पाणी पातळी ६०७.४० मीटर इतकी नोंदविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, केवळ गेल्या २४ तासांत धरणातील पाणीसाठ्यात १.६६ टीएमसीची वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास धरण व्यवस्थापनाकडून पाण्याचा विसर्ग वाढविण्याची शक्यता व्यक्त होत आहे. धरण क्षेत्रात तसेच वारणा नदीच्या खोऱ्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.