महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांना यापुढे सडेतोड उत्तर; अपप्रचार खपवून घेतला जाणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
08 Jul 2026, 16:36
110 views
महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांना यापुढे सडेतोड उत्तर; अपप्रचार खपवून घेतला जाणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
'मिसिंग लिंक' प्रकरणावर सभागृहात मुख्यमंत्री आक्रमक; सोशल मीडियावरील दिशाभूल करणाऱ्या पोस्टांवर कडक इशारा, महाराष्ट्राच्या सन्मानाशी तडजोड होणार नसल्याचे स्पष्टमुंबई | विशेष प्रतिनिधीमहाराष्ट्राच्या सन्मानाला धक्का पोहोचविणारा कोणताही अपप्रचार किंवा दिशाभूल करणारी माहिती यापुढे खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिला. 'मिसिंग लिंक' प्रकरणावरून सोशल मीडियावर सुरू असलेल्या कथित अपप्रचाराला उत्तर देताना त्यांनी विरोधकांवर आणि खोटी माहिती पसरविणाऱ्यांवर जोरदार टीका केली.सभागृहात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "ज्यांना समाजात कोणी विचारत नाही, असे काही लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून निराधार आरोप आणि अपप्रचार करत आहेत. समाजासाठी आयुष्यभर योगदान दिलेल्या अनेक मान्यवर नेत्यांविषयी खालच्या पातळीवर जाऊन अपमानास्पद भाषा वापरणे ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी बाब नाही." 'मिसिंग लिंक' प्रकरणाबाबत अनेकांनी वस्तुस्थितीचा विपर्यास करून सोशल मीडियावर चुकीच्या पोस्ट प्रसारित केल्या. काहीजण आर्थिक स्वार्थातूनही अपप्रचार करत असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा करत त्यांनी अशा प्रवृत्तीवर कठोर कारवाईचा इशाराही दिला.मुख्यमंत्री म्हणाले की, सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्ट ही सत्य असतेच असे नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत माहितीवरच भरोसा ठेवावा. चुकीची माहिती पसरवून समाजात संभ्रम निर्माण करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध शासन आवश्यक ती पावले उचलेल, असे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राच्या प्रतिमेला धक्का पोहोचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणालाही शासन पाठीशी घालणार नाही. "महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांना योग्य आणि सडेतोड उत्तर दिले जाईल. अपप्रचाराची ही संस्कृती आम्ही यापुढे सहन करणार नाही," असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.सभागृहातील त्यांच्या या भूमिकेमुळे 'मिसिंग लिंक' प्रकरणावरील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, सोशल मीडियावरील अपप्रचार आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीविरोधात शासन अधिक कठोर भूमिका घेण्याचे संकेत त्यांनी दिले.