महाराष्ट्र

कोल्हापुरात महापुराचा धोका; शिरोळमध्ये NDRF आणि वजीर रेस्क्यू फोर्सचा संयुक्त बचाव सराव

कोल्हापुरात महापुराचा धोका; शिरोळमध्ये NDRF आणि वजीर रेस्क्यू फोर्सचा संयुक्त बचाव सराव
08 Jul 2026, 14:31 32 views
कोल्हापुरात महापुराचा धोका; शिरोळमध्ये NDRF आणि वजीर रेस्क्यू फोर्सचा संयुक्त बचाव सराव
शिरोळ / प्रतिनिधी 
कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात, विशेषतः शिरोळ तालुक्यात महापुराचे संकट गडद होत आहे.संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि स्थानिक वजीर रेस्क्यू फोर्स यांनी कृष्णा - पंचगंगा संगम परिसरात यांत्रिक बोटींसह संयुक्त बचाव सराव करून आपली सज्जता दाखवून दिली.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या पथकाने शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त व पूरधोक्याच्या गावांना भेटी देत नदीपात्राची पाहणी केली.सुरक्षित स्थलांतराचे मार्ग, बचावासाठी आवश्यक ठिकाणे आणि आपत्कालीन प्रतिसादाची तयारी यांचा आढावा घेण्यात आला.
कृष्णा - पंचगंगा संगम परिसरात एनडीआरएफच्या आधुनिक यांत्रिक बोटी पाण्यात उतरवून प्रत्यक्ष बचाव कार्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. वेगवान प्रवाहात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणे,बोटींचे नियंत्रण,लाइफ जॅकेटचा वापर तसेच आपत्कालीन परिस्थितीत बचावाची कार्यपद्धती याचा सराव करण्यात आला.या प्रशिक्षणामुळे पूरकाळात जलद आणि प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी जवानांना प्रत्यक्ष अनुभव मिळाला.
या संयुक्त सरावात स्थानिक वजीर रेस्क्यू फोर्सच्या स्वयंसेवकांनीही सक्रिय सहभाग घेतला. स्थानिक भौगोलिक परिस्थितीची अचूक माहिती आणि एनडीआरएफचे तांत्रिक कौशल्य यांचा समन्वय साधून भविष्यातील बचाव कार्य अधिक परिणामकारक करण्यावर भर देण्यात आला.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने पूरस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून आवश्यक ती सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, नदीकाठच्या धोकादायक भागात जाणे टाळावे आणि आवश्यक असल्यास तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
शेअर करा:
Facebook Twitter WhatsApp
कमेंट्स (0)

अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!