महाराष्ट्र

तिरंगा देशाचा स्वाभिमान : शरद लाड

तिरंगा देशाचा स्वाभिमान : शरद लाड
14 Aug 2026, 16:50
पलूसमध्ये भव्य तिरंगा रॅली ; शेकडो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग                                                                         पलूस : क्रांती wave वृत्तसेवा                              ‘तिरंगा हा केवळ एक झेंडा नसून तो देशाचा स्वाभिमान आहे. तिरंग्यामागे देशासाठी बलिदान दिलेल्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग आणि देशाच्या एकतेची भावना आहे. त्यामुळे ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत तिरंगा आणि प्रत्येक मनापर्यंत राष्ट्रप्रेम पोहोचले पाहिजे,’ असे प्रतिपादन क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व भाजप नेते शरद लाड यांनी केले.                                                                           पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार पलूस येथे भाजप नेते पृथ्वीराज देशमुख व शरद लाड   यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिकांच्या सहभागातून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या रॅलीने पलूस शहरात राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण झाले.                                                                             फेटा कॉर्नर येथून रॅलीला सुरुवात झाली. हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने नागरिक, युवक आणि कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांनी रॅलीचा मार्ग दुमदुमून गेला. फेटा कॉर्नर ते शिवतीर्थ या मार्गावर रॅलीचा उत्साह दिसून आला.                                                                        यावेळी क्रांती कारखान्याचे अध्यक्ष व भाजप नेते शरद लाड म्हणाले, ‘हर घर तिरंगा’ हे केवळ शासकीय अभियान नसून देशातील प्रत्येक नागरिकाला राष्ट्रध्वजाशी आणि राष्ट्रभावनेशी जोडणारे अभियान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनामुळे देशभरात तिरंग्याविषयी अभिमानाची भावना अधिक दृढ झाली आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारही या राष्ट्रभावनेला लोकसहभागाची जोड देत आहे. पलूसमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या अभियानाला दिलेला प्रतिसाद कौतुकास्पद आहे.’‘देशाची प्रगती केवळ सरकारच्या प्रयत्नांनी होत नाही. त्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक असतो. देशाच्या विकासात योगदान देणे, संविधानाचा सन्मान करणे, सामाजिक एकोपा जपणे आणि राष्ट्रध्वजाचा सन्मान करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. युवकांनी राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात पुढे यावे, हाच ‘हर घर तिरंगा’ अभियानामागील व्यापक संदेश आहे,’ असेही लाड यांनी सांगितले.                                                                      रॅलीमध्ये मिलिंद पाटील, सर्जेराव  नलवडे, संजय येसुगडे, रामानंद पाटील, विजय  चोपडे, प्रल्हाद जाधव, गणेशा नलवडे, अमृत माळी, सागर सुतार, संकेत येसुगडे, हरीभाऊ पाटील, किरण निकम, अजिंक्य पाटील, रोहित सदामते यांच्यासह विविध क्षेत्रातील नागरिक, कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.                                                                         रॅलीच्या मार्गावर नागरिकांनी तिरंगा हातात घेऊन उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. अनेक ठिकाणी नागरिकांनी रॅलीचे स्वागत केले. तिरंग्यांनी सजलेले रस्ते आणि देशभक्तीपर घोषणांमुळे पलूस शहरातील वातावरण भारावून गेले होते.                                                             स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमातून राष्ट्रध्वजाप्रती आदर, देशाच्या स्वातंत्र्याचा अभिमान आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. विविध राजकीय व सामाजिक घटकांतील नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेतल्याने तिरंगा रॅलीला व्यापक लोकसहभागाचे स्वरूप प्राप्त झाले.                                                                           फेटा कॉर्नर येथून सुरू झालेली रॅली शिवतीर्थ येथे पोहोचली. तेथे राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन रॅलीची सांगता करण्यात आली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करून राष्ट्राची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व अबाधित ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
शेअर करा:
Facebook Twitter WhatsApp
कमेंट्स (0)

अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!