महाराष्ट्र

साखर उद्योगाला ‘मल्टी प्रॉडक्ट बायोमास रिसोर्स’ बनवा : जयंत पाटील

साखर उद्योगाला ‘मल्टी प्रॉडक्ट बायोमास रिसोर्स’ बनवा : जयंत पाटील
11 Aug 2026, 10:37

इथेनॉल, बायोगॅस, बायो-सीएनजीसह मूल्यवर्धित उत्पादनांवर भर देण्याचे आवाहन; एआय, डिजिटल मॉनिटरिंग आणि प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्सचा वापर वाढविण्याची गरज


पुणे : क्रांती wave वृत्तसेवा 

साखर उद्योगाकडे केवळ साखर उत्पादन करणारा उद्योग म्हणून पाहण्याची मानसिकता आता बदलण्याची गरज आहे. साखर कारखान्यांनी उपलब्ध जैविक संसाधनांचा अधिकाधिक वापर करून इथेनॉल, बायोगॅस, बायो-सीएनजी तसेच विविध मूल्यवर्धित उत्पादने निर्माण करणारे ‘मल्टी प्रॉडक्ट बायोमास रिसोर्स’ म्हणून विकसित व्हावे. त्यातून कारखान्यांची आर्थिक व्यवहार्यता वाढविण्यासोबतच उद्योगाला भविष्यातील बाजारपेठेतील आव्हानांना सामोरे जाण्याची ताकद मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे माजी गृह व अर्थमंत्री जयंत पाटील यांनी केले.


पुण्यात डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या (डीएसटीए) ७१व्या वार्षिक अधिवेशन व साखर प्रदर्शनाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. सेनापती बापट रस्त्यावरील जेडब्ल्यू मॅरियट येथे आयोजित या अधिवेशनाला साखर उद्योगातील तज्ज्ञ, कारखानदार, अभियंते, संशोधक, तंत्रज्ञ आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री राजेश टोपे, दिलीप देशमुख, राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, माजी आयएएस अधिकारी डॉ. शेखर गायकवाड, कर्नाटकचे माजी मंत्री श्रीमंत पाटील, बी. बी. ठोंबरे, आर. व्ही. कुंभार, सोहन शिरगावकर, संभाजी कडू पाटील यांच्यासह साखर उद्योगातील अनेक मान्यवर उपस्थित होते.


साखर कारखान्यांच्या उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करा


साखर उद्योगासमोर सध्या बाजारातील चढ-उतार, उत्पादन खर्चातील वाढ, ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा आणि वाढती किंमत स्पर्धा अशी अनेक आव्हाने आहेत. या बदलत्या परिस्थितीत केवळ साखर उत्पादनावर अवलंबून राहणे उद्योगासाठी दीर्घकालीनदृष्ट्या आव्हानात्मक ठरू शकते. यासाठी कारखान्यांनी उसापासून मिळणाऱ्या प्रत्येक घटकाचा अधिकाधिक उपयोग करून विविध उत्पादने निर्माण केली पाहिजेत. साखरेबरोबरच इथेनॉल, बायोगॅस, बायो-सीएनजी आणि अन्य जैवआधारित मूल्यवर्धित उत्पादनांमधून उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण करण्याची गरज जयंत पाटील यांनी व्यक्त केली. ऊस हा केवळ साखर उत्पादनासाठीचा कच्चा माल नसून त्यातून ऊर्जा, इंधन आणि विविध औद्योगिक उत्पादने निर्माण करण्याची मोठी क्षमता आहे. त्यामुळे साखर उद्योगाने या क्षमतेकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याची आवश्यकता आहे.


गाळप हंगाम कमी होत असल्याने आर्थिक आव्हाने


पूर्वी अनेक साखर कारखाने सुमारे सहा महिने गाळप हंगाम चालवत होते. मात्र, बदलत्या परिस्थितीत अनेक कारखान्यांचा गाळप हंगाम आता तीन ते चार महिन्यांवर आला आहे. त्यामुळे कारखान्यांच्या क्षमतेचा पूर्ण वापर होत नाही आणि आर्थिक व्यवहार्यतेवरही परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर कारखान्यांनी उपलब्ध संसाधनांचा वर्षभर विविध प्रकारे वापर करण्याची दिशा स्वीकारणे गरजेचे आहे. उत्पादन प्रक्रिया अधिक कार्यक्षम करून खर्च कमी करणे आणि त्याच वेळी विविध उपउत्पादनांमधून महसूल वाढविणे हा भविष्यातील साखर उद्योगाचा महत्त्वाचा मार्ग ठरू शकतो.


ब्राझील, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेच्या तंत्रज्ञानाचा अभ्यास आवश्यक


जागतिक साखर उद्योगात होत असलेल्या बदलांचा अभ्यास करून भारतीय साखर उद्योगाने आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारले पाहिजे. ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या देशांमध्ये साखर उद्योगात वापरल्या जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञान आणि कार्यपद्धतींचा अभ्यास करून त्यातील उपयुक्त बाबी भारतीय परिस्थितीनुसार स्वीकारण्याची गरज जयंत पाटील यांनी व्यक्त केली. कारखान्यांमध्ये उत्पादन क्षमता वाढविण्याबरोबरच ऊर्जा बचत, कच्च्या मालाचा कार्यक्षम वापर, उत्पादनातील नुकसान कमी करणे आणि उपउत्पादनांचे मूल्यवर्धन या बाबींवरही लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.


एआय आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवा


आधुनिक साखर उद्योगात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय, प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स, डिजिटल मॉनिटरिंग आणि डेटा आधारित निर्णयप्रक्रियेचे महत्त्व वाढत आहे. कारखान्यांमध्ये याचा व्यापक वापर केल्यास यंत्रसामग्रीतील संभाव्य बिघाड आधीच ओळखता येऊ शकतो. त्यामुळे अनपेक्षित बंद पडण्याचा धोका कमी होऊन उत्पादन कार्यक्षमता वाढविता येऊ शकते. डिजिटल मॉनिटरिंगच्या माध्यमातून उत्पादन प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर लक्ष ठेवता येते. त्यामुळे वेळ, ऊर्जा आणि कच्च्या मालाची बचत करण्याबरोबरच उत्पादनाचा दर्जाही सुधारता येऊ शकतो. भविष्यात स्पर्धात्मक राहण्यासाठी साखर कारखान्यांनी या तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे अपरिहार्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


संशोधन कारखान्यांच्या प्रत्यक्ष कामात पोहोचले पाहिजे


वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटसह विविध संशोधन संस्था साखर उद्योगासाठी संशोधन व तंत्रज्ञान विकसित करीत आहेत. मात्र, संशोधनाचा प्रत्यक्ष कारखान्यांमध्ये वापर वाढणे आवश्यक आहे. प्रयोगशाळा आणि प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रिया यांच्यातील दरी कमी झाली पाहिजे, असेही जयंत पाटील यांनी नमूद केले. संशोधन संस्थांनी विकसित केलेले तंत्रज्ञान कारखान्यांपर्यंत पोहोचले आणि त्याचा परिणाम उत्पादन खर्च, साखर उतारा, ऊर्जा कार्यक्षमता आणि उपउत्पादनांच्या निर्मितीवर दिसला तरच त्या संशोधनाचा खरा उपयोग होईल.


साखर टाळा’च्या मानसिकतेला उद्योगाने उत्तर द्यावे


आरोग्याबाबत समाजामध्ये जागरूकता वाढत असून अनेक ग्राहक साखरेचे सेवन कमी करण्याकडे किंवा टाळण्याकडे वळत आहेत. ही बदलती ग्राहक प्रवृत्ती साखर उद्योगासाठी महत्त्वाचे आव्हान आहे. या बदलाकडे केवळ संकट म्हणून न पाहता उद्योगाने नव्या संधी शोधल्या पाहिजेत. तंत्रज्ञान, संशोधन, उत्पादनातील विविधता आणि कार्यक्षमता यांच्या माध्यमातून उद्योगाने बदलत्या बाजारपेठेशी जुळवून घेतले पाहिजे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.


नव्या पिढीला साखर उद्योगाशी जोडण्याची गरज


साखर उद्योगाच्या भवितव्यासाठी तरुण पिढीला उद्योगाशी जोडणे आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल प्रणाली, कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमेशन, डेटा अनालिटिक्स आणि जैवतंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये तरुणांची क्षमता मोठी आहे. तरुण अभियंते, तंत्रज्ञ आणि संशोधकांना साखर उद्योगातील समस्या सोडविण्यासाठी संधी मिळाल्यास नवकल्पना आणि आधुनिकीकरणाला मोठी चालना मिळू शकते. त्यामुळे नव्या पिढीला उद्योगात आकर्षित करण्यासाठी साखर कारखान्यांनी आधुनिक कार्यसंस्कृती आणि तंत्रज्ञानाधारित वातावरण निर्माण करण्याची गरज आहे.


डीएसटीए’ची तांत्रिक प्रगतीतील भूमिका महत्त्वाची


डीएसटीएचे अध्यक्ष सोहन शिरगावकर यांनी प्रास्ताविकात साखर उद्योगातील तांत्रिक प्रगती, संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रसारामध्ये संस्थेची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. साखर उद्योगासमोरील तांत्रिक आणि औद्योगिक आव्हानांवर चर्चा करून देश-विदेशातील आधुनिक तंत्रज्ञान कारखान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम डीएसटीए सातत्याने करत आहे. साखर कारखाने, अभियंते, तज्ज्ञ आणि संशोधन संस्था यांच्यातील समन्वय वाढवून उद्योग अधिक कार्यक्षम, स्पर्धात्मक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्यावर संस्थेचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी यांनी केले.


साखर उद्योगातील मान्यवरांचा पुरस्कारांनी गौरव


अधिवेशनादरम्यान साखर उद्योगात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. साखर उद्योग गौरव पुरस्कार एस. एस. इंजिनिअर्सचे चेअरमन एस. बी. भड, माजी मंत्री व समर्थ साखर समूहाचे प्रमुख राजेश टोपे, गुजरात साखर संघाचे मानसिंहभाई पटेल, कृष्णा समूहाचे प्रमुख डॉ. सुरेशबाबा भोसले तसेच कर्नाटकचे आमदार, माजी मंत्री व अथणी शुगरचे चेअरमन श्रीमंत पाटील यांना प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार गोदावरी बायोरिफायनरी लिमिटेड, विलास सहकारी साखर कारखाना, जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखाना यांना देण्यात आला. इंडस्ट्रीयल एक्सलन्स अवॉर्ड मेरू इंडस्ट्रीजचे शरद गोरे, कॅन बायोसिसच्या संदीपा कानिटकर, केमिकल सिस्टीमचे अनुप केसरवाणी, टीकेआयएल इंडस्ट्रीज आणि स्वजित इंजिनिअरिंगचे अजित चव्हाण यांना प्रदान करण्यात आला. टेक्निकल एक्सलन्स अवॉर्ड सुबोध जोशी, प्रमोदकुमार बेलसरे आणि श्रीपाद गंगावती यांना देण्यात आला. ९० वर्षांवरील ज्येष्ठ सदस्यांसाठीचा पुरस्कार यशवंत घारपुरे, मानसिंगराव जाधव आणि पी. एन. राव यांना प्रदान करण्यात आला. जीवनगौरव पुरस्काराने बालाजी पाबशेटवार, डॉ. स्वेन, रमेश गंगाई, आर. एस. कुलकर्णी आणि आर. बी. माने यांचा गौरव करण्यात आला. डीएसटीए एक्सेप्शनल सर्विस अवॉर्ड एम. आर. कुलकर्णी, एस. बी. देव, जगदीश कुलकर्णी, डॉ. सुरेश एम. पवार आणि एस. डी. बोरुडे यांना प्रदान करण्यात आला. तर बेस्ट रिसर्च पेपर अवॉर्ड एस. एस. हेगाना, राजेंद्र भिलारे, नारायण मेहाना, डॉ. एम. बी. लोंढे, टी. एम. कर्णे आणि आर. बी. पाटील यांना देण्यात आला.

शेअर करा:
Facebook Twitter WhatsApp
कमेंट्स (0)

अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!