महाराष्ट्र

कुंडल परिसरातील आठ ते दहा गावांना मिळणार ताकारी योजनेचे पाणी; ५४०० हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली,

कुंडल परिसरातील आठ ते दहा गावांना मिळणार ताकारी योजनेचे पाणी; ५४०० हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली,
25 Jul 2026, 15:40
आ. अरुण लाड यांच्या पाठपुराव्याला यश; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची मंजुरी

कुंडल : क्रांती WAVE वृत्तसेवा

कुंडल व परिसरातील पाण्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घडामोड घडली आहे. ताकारी उपसा सिंचन योजनेतून बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणी उपलब्ध करून देण्याच्या मागणीला यश मिळाले असून, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. विधान परिषदेचे सदस्य आ. अरुण लाड यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे कुंडलसह परिसरातील आठ ते दहा गावांतील सुमारे ५४०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येरळा नदी बारमाही करण्याची मागणीही करण्यात आली आहे. यालाही मंत्री विखे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.  

कुंडल, कुंभारगाव, तुपारी, दह्यारी, घोगाव, सावंतपूर, पलूस वसाहत तसेच परिसरातील इतर गावांतील अनेक शेतजमिनी आजही कायमस्वरूपी सिंचन सुविधेपासून वंचित आहेत. कृष्णा कालवा या भागातून जात असला तरी अनेक शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचत नसल्याने शेतीला मोठा फटका बसत होता. परिणामी, ताकारी उपसा सिंचन योजनेतून बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणी देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून अनेक वर्षांपासून सातत्याने केली जात होती.

या पार्श्वभूमीवर आ. अरुण लाड यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर करून या भागातील सिंचनाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा केल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होईल, बाष्पीभवनामुळे होणारे नुकसान टळेल आणि शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांपर्यंतही पुरेशा दाबाने पाणी पोहोचेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले होते.

राज्य शासनाने ताकारी उपसा सिंचन योजनेतील पाण्याचा अधिक कार्यक्षम वापर करण्यासाठी बंदिस्त पाइपलाइन प्रणालीचा अवलंब करण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्याच अनुषंगाने कुंडल परिसरातील प्रस्तावाला प्राधान्य देण्यात आले आहे. या योजनेची अंमलबजावणी झाल्यानंतर शेती उत्पादनात वाढ होण्याबरोबरच पाणीटंचाईच्या समस्येवरही मोठ्या प्रमाणात मात होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

या प्रस्तावामुळे सुमारे ५४०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून, कुंडलसह परिसरातील आठ ते दहा गावांतील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्याची अपेक्षा आहे.  भागातील शेतीला नवसंजीवनी देणारा हा निर्णय ठरणार असल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

दरम्यान, जलसंपदा विभागाकडून आवश्यक प्रशासकीय कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर बंदिस्त पाइपलाइन योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला वेग येणार आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या सिंचनाच्या प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी आ. अरुण लाड यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे परिसरातून स्वागत होत आहे.


शेअर करा:
Facebook Twitter WhatsApp
कमेंट्स (1)
Dattatray Bhagvat Andhale 25 Jul 2026 19:22

Very nice