नागराळे येथील क्रांतिदिन चर्चासत्र
नागराळे : क्रांती WAVE वृत्तसेवा क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतीअग्रणी जी. डी. बापू लाड, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्यासह असंख्य क्रांतिकारकांच्या संघर्ष व त्यागामुळेच भारताला स्वातंत्र्य मिळाले , असे प्रतिपादन व्ही. वाय. पाटील यांनी केले.
नागराळे येथे व्ही. वाय. आबा पाटील समाज प्रबोधन अकॅडमी, ग्रामविकास वाचनालय आणि समाजवादी प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ९ ऑगस्ट क्रांतिदिन चर्चासत्रात ते बोलत होते.
पाटील पुढे म्हणाले, ९ ऑगस्ट हा केवळ क्रांतिदिन नसून स्वातंत्र्याच्या लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या क्रांतिकारकांच्या स्मरणाचा आणि त्यांच्या शौर्यशाली कार्याला क्रांतिकारी अभिवादन करण्याचा दिवस आहे. देशात श्रमिकांचे राज्य प्रस्थापित व्हावे, सत्ता-संपत्ती-ज्ञानावर सर्वांना समान अधिकार मिळावा आणि समताधिष्ठित व्यवस्था निर्माण व्हावी, हे क्रांतिकारकांचे अपुरे स्वप्न होते. हे स्वप्न साकार करण्याची प्रतिज्ञा करणे आणि लोकशाही, स्वातंत्र्य, समता व सामाजिक न्यायाची मूल्ये जपणे, हेच क्रांतिकारकांचे खरे स्मरण ठरेल. भारताच्या स्वातंत्र्याची चळवळ हा जगातील एक अभूतपूर्व लोकलढा होता. ब्रिटिश साम्राज्याच्या दडपशाहीविरोधात भारतीय जनतेने केलेल्या संघर्षाला ९ ऑगस्टच्या ‘भारत छोडो’ आंदोलनाने निर्णायक दिशा दिली. महात्मा गांधी यांनी ‘ब्रिटिशांनो, चालते व्हा’ आणि ‘करेंगे या मरेंगे’, तर क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतीअग्रणी जी. डी. बापू लाड यांनी ‘मरा पण स्वातंत्र्य मिळवून मरा’ असा संदेश दिला. या आवाहनामुळे संपूर्ण देश पेटून उठला. घरदार आणि संसाराचा त्याग करून स्वातंत्र्यासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या हजारो क्रांतिकारक युवकांनी या आंदोलनात सहभाग घेतला. या गौरवशाली लढ्यातून प्रेरणा घेऊन सुखासमाधानाने जगण्याचा हक्क मिळविण्यासाठी तसेच राज्यघटनेतील मूल्यांचे रक्षण करण्यासाठी सर्व जाती-धर्माच्या भारतीयांनी एकजुटीने पुढे आले पाहिजे,
यावेळी माजी मुख्याध्यापक प्रकाश राजाराम पाटील यांनी स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास ओघवत्या शैलीत मांडला. स्वातंत्र्यलढ्यातील विविध टप्पे, क्रांतिकारकांचे योगदान आणि सामान्य जनतेने दिलेला लढा यावर त्यांनी प्रकाश टाकला.
चर्चासत्राच्या प्रारंभी उपस्थितांनी स्वातंत्र्यलढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या क्रांतिकारकांच्या स्मृतीला क्रांतिकारी अभिवादन केले. तसेच राष्ट्रीय व सामाजिक प्रगतीसाठी तसेच विविध संकटांच्या काळात बहुमोल योगदान देणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, क्रांतिसिंह नाना पाटील, सहकारमहर्षी राजारामबापू पाटील आणि ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ. एस. आर. स्वामिनाथन यांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले.
स्वागत व प्रास्ताविक विशाल दिंडे यांनी केले. राहुल पाटील यांनी समारोप व सूत्रसंचालन केले. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी सुनील पाटील होते.
यावेळी बबन पाटील, गणपती पाटील, विष्णुपंत दिंडे, चंद्रकांत गायकवाड, शशिकांत पाटील, श्रीतेज पाटील, दीपक गायकवाड, माऊली पंढरीनाथ गायकवाड, दिलीप पाटील, पोपट पाटील, उल्हास पाटील, शाहूराज पाटील, चंद्रकांत पाटील, अशोक शेवाळे, झुंजार पाटील, सुनील काशिनाथ पाटील, नितीन जाधव, नितीन पाटील यांच्यासह मान्यवर आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!