कुंडल : प्रतिनिधी
सागरेश्वर अभयारण्य परिसरालगत असलेल्या कुंडल गावात पुन्हा एकदा बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुंडल–आंधळी (जुना सातारा रस्ता) परिसरातील वस्तीवर बुधवारी रात्री बिबट्याने शिरकाव करून पाळीव कुत्र्यावर हल्ला केला व त्याला उचलून नेल्याची घटना घडली. विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यांतील ही दुसरी घटना असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र चिंतेचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुंडल–आंधळी जुन्या सातारा रस्त्यालगत अनिल शामराव लाड यांच्या वस्तीवर रात्री बिबट्याने दबा धरून पाळीव कुत्र्याची शिकार केली. कुत्र्याला पकडून नेल्यानंतर परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घबराट व्यक्त केली. शेतकरी, शेतमजूर तसेच रात्रीच्या वेळी शेतात जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यापूर्वीही सुमारे सहा महिन्यांपूर्वी याच परिसरात अनिल लाड यांच्या वस्तीवरील एका कुत्र्याची बिबट्याने शिकार केली होती. आता पुन्हा त्याच ठिकाणी दुसऱ्यांदा हल्ला झाल्याने बिबट्याचा कायमस्वरूपी वावर असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे ग्रामस्थांनी वन विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, सागरेश्वर अभयारण्य परिसरातून बिबट्याचा वावर वाढत असून तो आता मानवी वस्तीपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे पाळीव जनावरे धोक्यात आली असून रात्रीच्या वेळी नागरिकांनी बाहेर पडताना विशेष काळजी घेण्याची वेळ आली आहे. शेतातील कामे, जनावरांची देखभाल आणि रात्रीचा प्रवास याबाबतही ग्रामस्थांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे.
दरम्यान, कुंडल गावाजवळील जुन्या सातारा रस्त्यापर्यंत बिबट्याचा वावर स्पष्टपणे दिसून येत असल्याने वन विभागाने तातडीने पाहणी करून या परिसरात पिंजरा लावावा, बिबट्याचा बंदोबस्त करावा तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कुंडल ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत वन विभागाला अधिकृत निवेदनही देण्यात आले असल्याची माहिती मिळाली.
ग्रामस्थांनी वन विभागाने नियमित गस्त वाढवावी, बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा ट्रॅप बसवावेत तसेच नागरिकांना आवश्यक सूचना द्याव्यात, अशीही मागणी केली आहे. बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे सावट कायम असून प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!