महाराष्ट्र

कोयना धरणाला ‘छत्रपती शिवाजी महाराज जलसागर’ नाव देणार

कोयना धरणाला ‘छत्रपती शिवाजी महाराज जलसागर’ नाव देणार
29 Jul 2026, 22:30
राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय ; शासन आदेश जारी; जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्याच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण निर्णय घेत कोयना जलसागराचे नामांतर करून त्याला ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असे नाव देण्यास मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला असून, ही माहिती जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

राज्याच्या जलसंपदा क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा कोयना जलसागर आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखला जाणार आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना अभिवादन करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

कोयना धरण हे राज्यातील सर्वात महत्त्वाच्या बहुउद्देशीय प्रकल्पांपैकी एक असून, सिंचन, जलसाठा आणि वीजनिर्मितीच्या दृष्टीने त्याचे विशेष महत्त्व आहे. आता या जलाशयाला अधिकृतपणे ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ या नावाने ओळख मिळणार आहे.

राज्य सरकारने यासंदर्भातील शासन आदेश जारी केल्यानंतर विविध स्तरांतून या निर्णयाचे स्वागत होत असून, हा निर्णय महाराष्ट्राच्या इतिहासाशी आणि सांस्कृतिक वारशाशी जोडलेला महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.


शेअर करा:
Facebook Twitter WhatsApp
कमेंट्स (0)

अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!