महाराष्ट्र

सांगलीत शुक्रवारी महावितरणवर शेतकऱ्यांचा मोर्चा : आ. अरुण लाड

सांगलीत शुक्रवारी महावितरणवर शेतकऱ्यांचा मोर्चा : आ. अरुण लाड
23 Jul 2026, 11:25
धोकादायक वीज वितरण व्यवस्था, लोडशेडिंग आणि लिफ्टच्या प्रश्नांवर इरिगेशन फेडरेशन आक्रमक; आरडीएसएसच्या १४७.६८ कोटींच्या कामांचा हिशेब देण्याची मागणी
सांगली : क्रांती WAVE वृत्तसेवा जिल्ह्यातील धोकादायक बनलेली वीज वितरण व्यवस्था, वारंवार होणारे लोडशेडिंग, कमी-जास्त दाबाचा वीजपुरवठा आणि लिफ्ट इरिगेशन योजनांना भेडसावणाऱ्या गंभीर समस्यांसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवार, दि. २४ जुलै रोजी दुपारी १ वाजता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या विश्रामबाग, सांगली येथील अधीक्षक अभियंता कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष तथा आमदार अरुण लाड यांनी दिली.
याबाबत महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना पाठविलेल्या निवेदनात आमदार लाड यांनी जिल्ह्यातील वीज वितरण व्यवस्थेच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधले आहे. पावसाळी अधिवेशनात उपस्थित केलेल्या लक्षवेधी प्रश्नाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या वीज समस्यांवर महावितरणने तातडीने कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यातील अनेक भागांत वीज वितरण यंत्रणा जीर्ण आणि धोकादायक बनली आहे. अनेक ठिकाणी जुन्या व जीर्ण वीज वाहिन्या, उघडे आणि धोकादायक डीपी, गंजलेले व झुकलेले वीज खांब तसेच झाडांच्या फांद्यांमधून गेलेल्या आणि धोकादायक पद्धतीने लटकणाऱ्या वीज वाहिन्यांमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडांमुळे ग्रामीण भागातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. शॉर्टसर्किटमुळे उभ्या पिकांना आग लागण्याच्या घटनाही घडत आहेत. त्याचबरोबर कमी-जास्त दाबाने होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे कृषिपंप आणि विद्युत उपकरणांचे नुकसान होत आहे. वाढत्या लोडशेडिंगमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी वेळेवर पाणी देणे कठीण होत आहे. या सर्व समस्यांमुळे जिल्ह्यातील शेतकरी आणि ग्रामस्थ त्रस्त असल्याचे आमदार लाड यांनी म्हटले आहे.
आरडीएसएसच्या १४७.६८ कोटींच्या कामांचा हिशेब द्या
केंद्र शासनाच्या आरडीएसएस (Revamped Distribution Sector Scheme) योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यात सुमारे १४७.६८ कोटी रुपयांची कामे मंजूर झाली आहेत. या कामांचा तालुकानिहाय तपशील महावितरणने जाहीर करावा, आतापर्यंत किती कामे पूर्ण झाली, किती कामे प्रलंबित आहेत आणि उर्वरित कामे कधीपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत, याबाबतचा स्पष्ट कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
लिफ्ट इरिगेशनच्या वीजपुरवठ्याचा प्रश्न गंभीर
जिल्ह्यातील लिफ्ट इरिगेशन योजनांना अनियमित आणि कमी-जास्त दाबाने वीजपुरवठा होत असल्याने सिंचन व्यवस्थेवर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. वारंवार ट्रान्सफॉर्मर जळणे, वीजपुरवठा खंडित होणे आणि कमी दाबाने वीज मिळणे यामुळे पाणीपुरवठा योजनांचे कामकाज विस्कळीत होत आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे, अशा नुकसानीची भरपाई संबंधित शेतकऱ्यांना तातडीने देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात येणार आहे.तसेच सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या पाणीपुरवठा आणि सिंचन योजनांच्या वीज बिलांची थकबाकी माफ करण्यात यावी, हीदेखील मोर्चातील प्रमुख मागणी असल्याचे आमदार लाड यांनी स्पष्ट केले.या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मोर्चावेळी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारावे आणि विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार अरुण लाड यांनी केली आहे.दरम्यान, मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कुंडल येथे झालेल्या बैठकीस आमदार अरुण लाड, किरण लाड, जे. पी. लाड, अशोक पवार, दिनकर लाड, हनुमंत लाड, शिवाजी पवार, श्रीकृष्ण लाड, विश्वास पवार, बाळासो शिंदे, रवींद्र चव्हाण यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जिल्ह्यातील वीज वितरण व्यवस्थेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे महावितरण प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आयोजित या मोर्चात जिल्ह्यातील शेतकरी, नागरिक आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले. 

शेअर करा:
Facebook Twitter WhatsApp
कमेंट्स (0)

अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!