पश्चिम महाराष्ट्रासाठी महत्त्वाची असलेली कोयना, चांदोली (वारणा), राधानगरी, धोम आणि कण्हेर ही प्रमुख धरणे ५० टक्क्यांपेक्षा अधिक भरल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसत आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाण्याची आवकही कायम आहे.
कोयना धरण ६० टीएमसीपार
सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. महाबळेश्वर, नवजा आणि कोयना परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार १०५.२५ टीएमसी क्षमता असलेल्या कोयना धरणात सुमारे ६१.३० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे धरण निम्म्याहून अधिक भरले आहे.
चांदोली धरणातही समाधानकारक पाणीसाठा
सांगली जिल्ह्यातील वारणा खोऱ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू आहे. विशेषतः पाथरपुंज परिसरातील पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढली आहे. ३४.४० टीएमसी क्षमता असलेल्या धरणात सुमारे २२.२४ टीएमसी पाणीसाठा झाल्याची माहिती आहे. धरणातील पाणीसाठा ६४ टक्क्यांपेक्षा अधिक झाला आहे.
राधानगरीच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे. ८.३६ टीएमसी क्षमता असलेल्या या धरणात सुमारे ५.३० टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण ६३ टक्क्यांपेक्षा अधिक भरले आहे. पाऊस कायम राहिल्यास धरणाच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
धोम आणि कण्हेरही पन्नाशीपार
सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील धोम धरणाची क्षमता १३.५० टीएमसी असून त्यामध्ये सुमारे ६.८० टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे धोम धरण ५० टक्क्यांच्या पुढे गेले आहे. कण्हेर धरणाची एकूण क्षमता सुमारे १०.१० टीएमसी असून त्यामध्ये सुमारे ६.३० टीएमसी पाणीसाठा असल्याची माहिती आहे. त्यामुळे हे धरणही ६० टक्क्यांपेक्षा अधिक भरले आहे.
शेती आणि सिंचनाला मोठा दिलासा
जूनमध्ये पावसाने काही काळ ओढ दिल्याने पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, जुलैमध्ये पावसाने पुन्हा जोर धरल्याने परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. कृष्णा, वारणा, वेण्णा आणि पंचगंगा खोऱ्यातील पाणीपातळी वाढत असून धरणांतील पाणीसाठाही समाधानकारक स्थितीत पोहोचत आहे. धरणांमध्ये वाढत असलेला पाणीसाठा आगामी रब्बी हंगाम तसेच ऊस आणि इतर सिंचनावर अवलंबून असलेल्या पिकांसाठी दिलासादायक ठरणार आहे. त्याचबरोबर शहरांसह ग्रामीण भागाच्या पिण्याच्या पाण्याच्या नियोजनालाही याचा फायदा होणार आहे.
जलविद्युत निर्मितीलाही फायदा
कोयना धरणातील वाढता पाणीसाठा जलविद्युत निर्मितीच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. पावसाळ्यात धरणात समाधानकारक पाणीसाठा झाल्यास आगामी काळातील जलविद्युत निर्मिती आणि पाणी व्यवस्थापनासाठी त्याचा फायदा होऊ शकतो.
नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. पाण्याची आवक वाढल्यास धरणातून नदीपात्रात विसर्ग करण्याची आवश्यकता निर्माण होऊ शकते. तसेच कर्नाटकातील अलमट्टी धरण भरू लागले आहे. यामुळे पुढील दोन महिन्यात पाऊस मोठा पडला तर कृष्णा, वारणा, पंचगंगा या नद्यांना पूर येण्याची निर्माण झाली आहे.
अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!