महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यातील महावितरणची धोकादायक वीज वितरण व्यवस्था; तातडीने उपाययोजनांची गरज: आ. अरुण लाड

सांगली जिल्ह्यातील महावितरणची धोकादायक वीज वितरण व्यवस्था; तातडीने उपाययोजनांची गरज: आ. अरुण लाड
08 Jul 2026, 12:21

सांगली जिल्ह्यातील महावितरणची धोकादायक वीज वितरण व्यवस्था; तातडीने उपाययोजनांची गरज: आ. अरुण लाड


मुंबई: सांगली जिल्ह्यातील महावितरणच्या वीज वितरण व्यवस्थेची अत्यंत गंभीर व धोकादायक स्थिती लक्षात घेऊन आमदार अरुण लाड यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेत लक्षवेधी सूचना सादर केली आहे. जिल्ह्यातील जीर्ण वीज वाहिन्या, उघडे व धोकादायक ट्रान्सफार्मर (रोहित्र), गंजलेले व झुकलेले वीज खांब, झाडांच्या फांद्यांतून जाणाऱ्या लटकणाऱ्या वाहिन्या आणि वारंवार होणारे तांत्रिक बिघाड यामुळे शेतकरी व नागरिकांच्या जीवितासह शेतीचेही मोठे नुकसान होत असल्याचा गंभीर मुद्दा त्यांनी उपस्थित केला.आ. अरुण लाड यांनी सांगितले की, सांगली जिल्ह्यातील सुमारे २,२०० हून अधिक ट्रान्सफार्मरपैकी अनेक डीपी अत्यंत धोकादायक अवस्थेत आहेत. जिल्ह्यातील २०० हून अधिक गावांमध्ये २५ ते ३० वर्षांपूर्वी बदलणे आवश्यक असलेल्या वीज वाहिन्या आजही १९६२ ते १९७० या कालावधीत उभारलेल्या जुन्याच वाहिन्यांवर सुरू आहेत. त्यामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होणे, कमी दाबाने वीज मिळणे आणि तांत्रिक बिघाड वाढणे, अशा समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.लटकणाऱ्या वीज वाहिन्यांमुळे ऊस, द्राक्षबागा व इतर पिकांचे नुकसान होत असून शॉर्टसर्किटमुळे उभ्या पिकांना आग लागण्याच्या घटनाही वारंवार घडत आहेत. खराब पिन इन्सुलेटर, निकृष्ट साहित्य आणि देखभालीअभावी अनेक ठिकाणी वीज खांबांमध्ये विद्युत प्रवाह उतरत असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे.विशेषतः ईश्वरपूर व विटा परिसरातील ३०० हून अधिक डीपी दयनीय अवस्थेत असून बहुतांश डीपी बॉक्सची दारे व फ्युज नसल्याने ते उघडे पडले आहेत. ही परिस्थिती नागरिकांच्या सुरक्षेसाठी अत्यंत धोकादायक असल्याचे आ. लाड यांनी निदर्शनास आणून दिले.महावितरणने वीज वितरण व्यवस्थेच्या मूलभूत सुविधांच्या देखभाल व दुरुस्तीकडे तातडीने गांभीर्याने लक्ष देऊन जीर्ण वीज वाहिन्या बदलणे, धोकादायक ट्रान्सफार्मर व डीपी सुरक्षित करणे, झुकलेले खांब बदलणे तसेच संपूर्ण यंत्रणेचे आधुनिकीकरण करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली. याबाबत शासनाने तातडीने ठोस उपाययोजना करून सांगली जिल्ह्यातील वीज वितरण व्यवस्था सुरक्षित व सक्षम करावी, अशी मागणीही त्यांनी विधानपरिषदेत केली.
शेअर करा:
Facebook Twitter WhatsApp
कमेंट्स (0)

अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!