पेपर फुटी प्रकरणी सरकारने कायदे सक्षम करावेत आमदार अरुण अण्णा लाड यांची मागणी
08 Jul 2026, 12:15
नीटनंतर आता टीईटीचाही पेपर फुटला; सरकारने कायदे अधिक सक्षम करावेत : आ. अरुण लाड मुंबई: राज्यात नीट (NEET) परीक्षेच्या पेपरफुटीची घटना ताजी असतानाच शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीचा प्रकार समोर आल्याने परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर दोषींवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायदे अधिक सक्षम करण्याची मागणी आमदार अरुण लाड यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेत केली.यावेळी बोलताना आ. अरुण लाड म्हणाले की, नीट पेपरफुटीनंतर देशभरात तीव्र संताप व्यक्त झाला होता. त्या घटनेनंतर प्रत्येक स्पर्धा व पात्रता परीक्षेच्या नियोजनात अधिक दक्षता घेणे अपेक्षित होते. मात्र, त्यानंतरही टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याने विद्यमान यंत्रणा आणि कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीवर प्रश्न निर्माण झाला आहे.केवळ गुन्हे दाखल करून उपयोग नाही, तर दोषींना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे. राजस्थानमध्ये पेपरफुटी प्रकरणांमध्ये जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद केल्यानंतर अशा घटनांवर मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्रातही अशा प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी अधिक कठोर कायदे आणि प्रभावी अंमलबजावणीची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यावर उत्तर देताना राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितले की, पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हे प्रकरण उघडकीस आणले आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले असून दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई केली जाईल. तसेच भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी विद्यमान कायद्यात आवश्यक बदल करण्याबाबत शासन गांभीर्याने विचार करत असल्याची माहितीही त्यांनी विधानपरिषदेत दिली.