*विळ्या-भोपळ्याचे सख्ख म्हणजे सहजीवन नव्हे –जगदीश काबरे*
'आमच्या समाजात घटस्फोट होत नाहीत' हे वाक्य अनेकदा कुटुंब संस्थेच्या राखणदारांकडून कौतुकाने उच्चारले जाते; परंतु या विधानामागील वास्तव अधिक गुंतागुंतीचे असू शकते. कायदेशीर घटस्फोटांचे प्रमाण कमी असणे म्हणजे सर्व वैवाहिक नाती आनंदी आणि समाधानकारक आहेत, असा निष्कर्ष काढता येत नाही. अनेक दांपत्ये सामाजिक प्रतिष्ठा, मुलांचे भविष्य, आर्थिक परावलंबित्व, कुटुंबाचा दबाव, धार्मिक समजुती किंवा समाजाच्या टीकेची भीती यांसारख्या कारणांमुळे एकत्र राहतात. अशा वेळी धूसफूस न करता सामंजस्याने किंवा बरेचदा धुसफुसतही विवाह टिकवला जातो; परंतु परस्परांतील विश्वास, जिव्हाळा, संवाद, स्नेह आणि भावनिक जवळीक हळूहळू नष्ट होत जाते. यालाच आधुनिक मानसशास्त्रात 'सायलेंट डिव्होर्स' किंवा 'भावनिक विभक्तता' असे संबोधले जाते.
मनुष्याला केवळ अन्न, वस्त्र आणि निवारा पुरेसा नसतो; त्याचबरोबर त्याला भावनिक सुरक्षितता, स्वीकार, सन्मान, प्रेम आणि संवादाचीही गरज असते. जेव्हा दोन व्यक्ती एकाच घरात राहतात, पण त्यांच्यात अर्थपूर्ण संवाद राहत नाही, परस्परांबद्दलची संवेदनशीलता हरवते, पण संघर्ष टाळण्यासाठी मौन स्वीकारले जाते किंवा केवळ कर्तव्य म्हणून सहजीवन चालू राहते तेव्हा त्याचा संपूर्ण कुटुंबाच्या मानसिक आरोग्यावर खोल परिणाम होऊ शकतो. सततचा ताण, नैराश्य, एकाकीपणाची भावना, आत्मसन्मान कमी होणे, चिडचिड, चिंता आणि काही वेळा शारीरिक आरोग्याच्या तक्रारीही वाढू शकतात. बाहेरून सर्व काही सुरळीत दिसत असले तरी आतून व्यक्ती भावनिकदृष्ट्या तुटलेली असू शकते. अशावेळी दररोज तीळ तीळ मारण्यापेक्षा एक घाव दोन तुकडे करून कायदेशीर घटस्फोट घेणे केव्हाही चांगले. मग जग काही का म्हणे ना! कारण समाज हा व्यक्तिगत निर्णय घेतलेल्यांना धड घोड्यावर बसू देत नाही आणि घोड्यावर बरोबर चालूही देत नाही. त्यामुळे समाजाच्या दुषणांकडे दुर्लक्ष करणेच योग्य असते. एकदा का समाजाला कळले की तुम्ही त्याला भीक घालत नाही, तेव्हा तेही तुमच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करणे बंद करतात. अशावेळी गरज असते ती फक्त सुरुवातीला धाडसाने पाऊल उचलण्याची.
आज कुटुंब संस्था कितीही मोडकळीला आलेली असली तरी अनेक समाजांमध्ये विवाहसंस्था टिकवण्यावर भर दिला जातो, परंतु नात्याचा दर्जा टिकवण्यावर तितकाच भर दिला जात नाही. त्यामुळे लग्न टिकणे यालाच यश मानले जाते, पण त्या नात्यातील व्यक्ती खरोखर समाधानी आहेत का, याकडे दुर्लक्ष होते. अशा वातावरणात अनेक स्त्री-पुरुष आपल्या भावनांना दाबून रडत-कुढत जगत असतात. याचा परिणाम मुलांवरही होऊ शकतो. सतत तणावग्रस्त, संवादहीन किंवा थंड नात्यात वाढणाऱ्या मुलांवर नातेसंबंधांविषयी नकारात्मक छाप पडण्याची शक्यता असते. त्यामुळे समाजात पुढील पिढ्यांमध्येही निरोगी संवाद आणि भावनिक अभिव्यक्ती कमी होऊ शकते. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक मतभेदाचा शेवट घटस्फोटातच व्हावा किंवा सायलेंट डिव्होर्स असलेल्या प्रत्येक नात्याचा परिणाम सारखाच असतो. अनेक जोडपी समुपदेशन, संवाद, परस्पर समजूत, आत्मपरीक्षण आणि एकमेकांच्या भावनिक गरजा ओळखण्याच्या प्रयत्नांमुळे पुन्हा जवळ येऊ शकतात. दुसरीकडे, काही नाती इतकी तुटलेली असतात की कायदेशीर विभक्त होणेच दोघांसाठी अधिक आरोग्यदायी पर्याय ठरू शकतो. त्यामुळे घटस्फोट वाईट आणि लग्न टिकणे चांगले किंवा घटस्फोटच योग्य अशी टोकाची भूमिका न घेता प्रत्येक नात्याकडे त्या त्या परिस्थितीनुसार पाहणे आवश्यक असते.
म्हणूनच समाजाने केवळ घटस्फोटांची संख्या हा विवाहसंस्थेच्या यशाचा निकष मानू नये. अधिक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की किती दांपत्ये परस्पर आदर, विश्वास, प्रेम, संवाद आणि मानसिक समाधानाने जगत आहेत. कायदेशीर घटस्फोट हा न्यायालयीन नोंदीत दिसतो; परंतु सायलेंट डिव्होर्स अनेकदा आकडेवारीत दिसत नाही. त्यामुळे या विषयावर कुणा एकावर दोषारोप न करता संवेदनशीलपणे प्रामाणिक चर्चा होणे आवश्यक आहे. निरोगी समाजाचा पाया केवळ टिकलेल्या विवाहांवर नसून, सन्मान, समता, संवाद आणि भावनिक आरोग्य जपणाऱ्या नात्यांवर उभा असतो, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. हे जर टिकवता येत नसेल तर घटस्फोट न घेता एकत्रित आयुष्य काढण्यापेक्षा घटस्फोट घेऊन मैत्रीपूर्ण विभक्त आयुष्य जगणे केव्हाही चांगलेच.🎯JK