एकनाथ भाई शिंदे ‘साहेब’ झाल्यापासून ठाण्यातील प्रत्येक नेत्याला शिंदेंसारखा ‘भाई’ होण्याची आणि मुंबईशेजारच्या ठाण्याला महानगरी मुंबई होण्याची ‘घाई’ झाल्याचे दिसते. त्यामुळे तलावांचे शहर असलेले, ऐतिहासिक श्रीस्थानक ठाणे वेगाने जागा-जमिनी, फुगवलेली कंत्राटे आणि राजकीय डिलिंगच्या ‘गुप्त खजिन्या’चे केंद्र बनले आणि दिल्लीच्या किल्लीने राज्यातील सत्ताकेंद्र होण्याची स्वप्ने पाहू लागले.
गेल्या दोन दशकांत ठाण्याचा चेहरामोहरा बदलला होता. मात्र, चार वर्षांपूर्वी ठाण्याला पहिला महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाभला आणि या बदलांना अफाट वेग आला. भलेमोठे प्रकल्प, त्यांचे बडे-बडे आकडे, प्रचंड बांधकामे, अफाट आर्थिक उलाढाल आणि वाढती गुन्हेगारी यामुळे सालस ठाणे माजून, सुजून आणि गजबजून गेले आहे.
एकेकाळी कवीवर्य पी. सावळाराम, पंडित राम मराठे, अशोक चिटणीस यांचे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाणारे ठाणे पुढे भाई, बंटी, शेठ, सुधा असे लीडर, बदनाम बिल्डर आणि त्यांचे पंटर, चिटर, शार्पशूटर यांचे आगर बनले... ते कायमचे!
त्यामुळे झाले काय, तर ठाण्याच्या सर्वच क्षेत्रांत अनागोंदी माजली. परिणामी कोणालाही महत्त्व आले. ‘आंदू-पांडू’ गुंडांची ‘भाईगिरी’ फोफावली. ‘शिंदेशाही’च्या आश्रयाला आलेल्या शासकीय अधिकाऱ्यांनी आकडे फुगवण्याचे अगणित विक्रम केले आणि मोडले. या सगळ्याचा कहर म्हणजे ठाण्यातील रंगीबेरंगी थापादेखील स्वतःला ‘गगनभेदी’ म्हणवून घेताना दिसू लागल्या.
एकूणच ठाण्याचे जुने वैभव हरवले.
म्हणूनच या बदलत्या ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांची कार्यालयात घुसून हत्या होणे, ही केवळ राज्यातील आणखी एक गुन्हेगारी घटना नाही, तर हा एका शहराच्या सांस्कृतिक आणि सामाजिक बदलाचा मन अस्वस्थ करणारा टप्पा आहे.
२९ सप्टेंबरच्या रात्री पूर्णेकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यात गोळीबाराबरोबर धारदार शस्त्राचाही वापर झाल्याचे वृत्त आहे. हल्ल्यापूर्वी रेकी झाल्याचे आणि आरोपी नियोजनपूर्वक घटनास्थळी आल्याचे पोलिस तपासातील प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून, एका आरोपीला अटक झाल्याचेही वृत्त आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
या प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीय म्हणून उल्लेख झालेल्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे नाव चर्चेत येणे, ही बाब गंभीर आहे. त्याहून गंभीर बाब म्हणजे या हत्येमागील कारणांविषयी सुरू झालेली चर्चा. पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी स्थानिक क्लस्टर डेव्हलपमेंट आणि राजकीय वर्चस्वाच्या वादाचा संदर्भ दिला आहे. त्यांच्या मुलानेही हल्ल्यापूर्वी रेकी झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांची नावे FIRमध्ये असल्याचे वृत्त आहे. मात्र, मीनाक्षी शिंदे यांनी हत्येशी आपला संबंध नसल्याचे सांगत आपल्याला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचे म्हटले आहे.
अर्थात, या आरोपांमधील राजकीय अथवा आर्थिक संबंध न्यायालयीन किंवा पोलिस तपासातून सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे कोणावरही आधीच ठपका ठेवणे योग्य ठरणार नाही. पण एवढे मात्र स्पष्ट आहे की, उपलब्ध वृत्तांनुसार हा हल्ला नियोजनपूर्वक झाल्याचा तपास यंत्रणांचा संशय आहे. म्हणून या हत्येचा सूत्रधार कोण आणि त्यामागील नेमका हेतू काय, याचा तपास होणे आवश्यक आहे.
त्याचसोबत, आज या खुनाने मुंबईशी स्पर्धा करणाऱ्या ठाण्यापुढे जे प्रश्न उभे केले आहेत, त्याचाही विचार केला पाहिजे. ठाण्यातील बलाढ्य राजकीय नेते, त्यांच्या बरोबरीचे धनाढ्य बिल्डर, सत्तेच्या तुकड्यासाठी चाललेली पक्ष-संघटनांमधील स्पर्धा, हे सारे वाढतच आहे. त्यामुळं ठाण्यात जातीय तेढ, स्थानिक विकास प्रकल्पांवरील वाद, वादग्रस्त कंत्राटे, पुनर्विकास, जमीन आणि आर्थिक हितसंबंध यांच्याभोवती सुरू असलेला संघर्ष तीव्र आणि हिंसक होताना दिसतो आहे. आणि म्हणूनच तो थेट कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न बनला आहे.
एखाद्या मोठ्या राजकीय कार्यकर्त्याला कार्यालयात घुसून संपवता येत असेल, तर सामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होणारच. पूर्णेकर कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन केल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली. समर्थकांची गर्दी आणि कुटुंबीयांचा संताप हा केवळ भावनिक उद्रेक म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. हे बदलत्या सामाजिक वास्तवाचे प्रतिबिंब आहे.
आपण सारे जाणतो की, पैसा, दादागिरी आणि सत्ता या ‘त्रिसूत्री’भोवती आपले राजकारण फिरत आहे. किंबहुना या त्रिसूत्रीनेच आपले राजकारणी बांधले गेले आहेत. एकेकाळी, “ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करा”, असे सांगणारे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आता त्यांच्या अनुयायांनाही पटणार नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे. मग इतरांचे काय बोलावे?
पण या खुनाचा संबंध ज्याप्रकारे एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या लोकांशी जोडला जात आहे, ते राज्यासाठी निश्चितच भूषणावह नाही. त्यामुळे सरकारच्या प्रतिमेला तडा गेल्याची चर्चा होणे स्वाभाविक आहे. मात्र, या चर्चेचा अंतिम निष्कर्ष पोलिस तपासातूनच स्पष्ट होणे आवश्यक आहे.
एकीकडे वादग्रस्त सचिन वाझे यांना साडेपाच वर्षांनंतर जामीन मंजूर झाल्याची बातमी आली आणि दुसरीकडे त्याच काळात ठाण्यातील ठाकरे गटाच्या विभागप्रमुखाची हत्या झाली. विशेष NIA न्यायालयाने वाझे यांना जामीन मंजूर केला होता; मात्र त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या जामिनाला ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे त्यांची तातडीची सुटका झालेली नाही.
या पार्श्वभूमीवर या हत्येला राजकीय रंग देण्यासाठी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत सक्रिय झाल्याचे दिसते. उद्धव ठाकरे यांच्या संघटनात्मक बैठकीची चर्चाही सुरू आहे. ‘इंडिया आघाडी’च्या बैठकीत उद्धव ठाकरे ऑनलाइन सहभागी झाल्याचे वृत्त आहे. निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भूमिकेवर ‘इंडिया आघाडी’कडून आक्रमक भूमिका घेतली जात असून, ४ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चाही जाहीर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
अशा वेळी मुंबईतील उद्धवसेनेच्या विभागप्रमुख आणि अन्य पदाधिकाऱ्यांची बैठक महत्त्वाची ठरते. पूर्णेकर हत्या, मुंबईतील आगामी आंदोलन आणि बदलते राजकीय वातावरण या सगळ्यांचा प्रभाव आता वाढत जाणे साहजिक आहे.
म्हणूनच पूर्णेकर यांच्या हत्येचा सूत्रधार कोण, हत्येचा नेमका हेतू काय, आर्थिक व्यवहार किंवा विकास प्रकल्पांशी त्याचा संबंध आहे का आणि हल्लेखोरांना कोणाचे संरक्षण होते का, या सर्व प्रश्नांची उत्तरे पुराव्यांसह जनतेसमोर आली पाहिजेत. या प्रकरणाचा तपास निष्पक्ष, पारदर्शक आणि पुराव्यांच्या आधारे झाला पाहिजे. ठाण्यासारख्या वेगाने बदलणाऱ्या शहरात कायदा-सुव्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास अबाधित राहणे, हीच या संपूर्ण प्रकरणातील सर्वांत महत्त्वाची बाब आहे.
महेश म्हात्रे
संपादक, महाराष्ट्र रिसर्च सेंटर