बहुजन समाजातील मुलांच्या हातात पाटी, पुस्तक आणि लेखणी देऊन शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली करणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक आणि शैक्षणिक इतिहासाला नवी दिशा दिली. ‘कमवा आणि शिका’, स्वावलंबी शिक्षण, समता आणि मानवतावादी विचार या मूल्यांच्या आधारावर त्यांनी उभारलेली रयत शिक्षण संस्था आजही त्यांच्या विचारांचा जिवंत वारसा पुढे नेत आहे. तत्त्वांशी कधीही तडजोड न करणाऱ्या आणि स्वतःचे आयुष्य रयतेच्या शिक्षणासाठी समर्पित करणाऱ्या या शिक्षणमहर्षींच्या कार्याचा घेतलेला हा वेध...
लेखक : डॉ. श्रीमंत कोकाटे, इतिहास संशोधक, पुणे
‘रयत’ हा शब्द मराठी संस्कृतीच्या जिव्हाळ्याचा शब्द आहे. मूळ अरबी भाषेतील असलेल्या या शब्दाने मराठी भाषिकांच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण केले आहे. ‘रयत’ म्हटले की मराठी मनात एक वेगळीच आत्मीय भावना निर्माण होते. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केले, त्या राज्याला ‘रयतेचे राज्य’ असे म्हटले जाते. रयत म्हणजे सर्व जनता! त्यामध्ये भेदभावाला स्थान नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांनी कृषी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रांत समतेचा पाया घातला. हीच परंपरा शैक्षणिक क्षेत्रात १९१९ साली रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पुढे नेली.
कर्मवीर भाऊराव पाटील हे शैक्षणिक क्षेत्रातील रयतेचे तत्त्वनिष्ठ शिक्षणमहर्षी होते. कर्मवीरांचे कार्य सर्व जाती-धर्मांच्या लोकांसाठी होते. रयतेच्या शिक्षणाची माऊली म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, महाराजा सयाजीराव गायकवाड आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याचा वारसा कर्मवीरांनी शैक्षणिक क्षेत्रात पुढे नेला. ते सत्यशोधकी विचारांचे होते. शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक सदस्य होते. ते अत्यंत मानवतावादी होते.
कर्मवीरांनी शिक्षणसंस्था उभारून पैसा कमावला नाही; उलट स्वतःच्या कमाईचा पैसा रयतेच्या शिक्षणासाठी खर्च केला. त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाईंनी मंगळसूत्रासह आपले सर्व दागिने गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी दिले. म्हणूनच अण्णांना शिक्षणमहर्षी म्हटले जाते. संत गाडगेबाबा, प्रबोधनकार ठाकरे, केशवराव जेधे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते.
अण्णा सामान्य शेतकरी कुटुंबातून आले होते. त्यांचा जन्म २२ सप्टेंबर १८८७ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या आजोळी गावी झाला. त्यांचे मूळ गाव वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक हे होय. वडील सरकारी सेवेत असल्यामुळे बदलीच्या ठिकाणी विटा, दहिवडी, इस्लामपूर इत्यादी ठिकाणी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण झाले. त्यांच्या वडिलांना बाणेदारपणामुळे नोकरी सोडावी लागली.
अण्णांचे पुढील शिक्षण कोल्हापुरातील जैन बोर्डिंगमध्ये झाले. बोर्डिंगचे काही कर्मठ नियम मोडल्यामुळे त्यांना अधीक्षकांनी वसतिगृहातून काढून टाकले. त्यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना राजवाड्यावर ठेवून घेतले आणि राजपुत्रांसोबत शिकण्याची संधी दिली.
अण्णा बालवयापासूनच बंडखोर वृत्तीचे होते. अस्पृश्यांना सार्वजनिक विहिरीवरून पाणी भरू दिले जात नव्हते, म्हणून त्यांनी त्या विहिरीचे रहाटच मोडून टाकले. ज्ञानदेव घोलप या मुलाला सोबत घेऊन त्यांनी परिवर्तनाचा लढा सुरू केला. ज्ञानदेव घोलप याला ते घरी जेवायला घेऊन गेले, तेव्हा त्यांच्या आईने अण्णांवर राग व्यक्त केला. तरीही अण्णा दुसऱ्या दिवशी त्याला पुन्हा घरी जेवायला घेऊन गेले. परिवर्तनासाठी अण्णा नेहमीच आग्रही आणि हट्टी असायचे. सत्यशोधक चळवळीचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे स्थापन केलेल्या जैन बोर्डिंगमध्ये अण्णा शिक्षणासाठी गेले. तेथे शिक्षण घेत असताना त्यांनी बोर्डिंगचे कर्मठ नियम मोडले. त्यामुळे तेथील अधीक्षकांनी त्यांना वसतिगृहातून काढून टाकले. पण अण्णा निराश होणारे नव्हते. सतत धडपडत राहणे हा त्यांचा स्थायीभाव होता.
खानविलकर नावाचे त्यांचे मित्र अण्णांना घेऊन शाहू महाराजांकडे राजवाड्यावर गेले. त्यांनी सर्व वृत्तांत शाहू महाराजांना सांगितला. तेव्हा शाहू महाराज अण्णांना म्हणाले, ‘तुम्ही आता राजवाड्यावर राहूनच शिक्षण घ्या.’ राजवाड्यावर राहून शाहूपुत्र राजाराम महाराज आणि प्रिन्स शिवाजी यांच्यासोबत अण्णांनी शिक्षण घेतले. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या छत्रछायेखाली कर्मवीर अण्णांचे शिक्षण घडले.
अण्णा सहावीत नापास झाले, पण डगमगले नाहीत किंवा निराश झाले नाहीत. ते अत्यंत हिम्मतवान होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराज त्यांच्या शिक्षक भार्गव कुलकर्णी यांना म्हणाले, ‘भाऊ पाटलाला मार्क कमी आहेत; परंतु तो अत्यंत गुणवान आहे. त्याला वरच्या वर्गात पाठवा.’ त्यावेळी कुलकर्णी मास्तर म्हणाले, ‘महाराज, भाऊ पाटील ज्या बाकावर बसतो, तो बाक वरच्या वर्गात पाठवेन; परंतु भाऊ पाटलाला वरच्या वर्गात पाठवणार नाही.’
ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांना सहावी उत्तीर्ण होता आली नाही, त्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी पुढे असंख्य विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा प्रभाव पडलेल्या विद्यार्थ्यांनी जगातील विविध क्षेत्रांत आपले कर्तृत्व सिद्ध केले.
कर्मवीर भाऊराव पाटील यांना गरीबांविषयी प्रचंड तळमळ होती. गरिबांना शिकवण्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले; पण बहुजन समाजातील मुलांना उपाशी राहू दिले नाही आणि त्यांचे शिक्षणही बंद पडू दिले नाही. गावोगावी जाऊन त्यांनी मुलांना शिक्षणासाठी आणले आणि त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. अण्णा महाराष्ट्राची मायमाऊली होते.
अण्णा प्रचंड महत्त्वाकांक्षी होते. ‘नाही’ हा शब्द त्यांच्या जीवनकोशात नव्हता. संकटांवर मात करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात होते. एकदा अण्णा सातारा येथील डेप्युटी कलेक्टरांना भेटायला गेले होते. डेप्युटी कलेक्टरांनी अण्णांना विचारले, ‘माझ्या मुलीला संस्कृत शिकवाल का?’ अण्णांनी तत्काळ ‘हो, शिकवणार’ असे सांगितले.
नंतर अण्णांच्या लक्षात आले की आपल्याला संस्कृत येत नाही. आपण संस्कृत शिकवण्याचा शब्द दिला आहे. मग त्यांनी स्वतः संस्कृतचे वर्ग लावले. ते एका शिक्षकाकडे सकाळी लवकर संस्कृत शिकायला जात आणि त्यानंतर डेप्युटी कलेक्टरांच्या मुलीला संस्कृत शिकवत. अण्णा प्रचंड प्रयत्नवादी होते. त्यांनी कधीही नकारघंटा वाजवली नाही.
अण्णांनी आपल्या विचारधारेशी कधीही तडजोड केली नाही. ते शेतकरी कामगार पक्षाशी एकनिष्ठ होते. मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी रयत शिक्षण संस्थेचे अनुदान बंद केले, तरी त्यांनी पक्षांतर केले नाही किंवा साधी भेटही घेतली नाही. ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि त्याविरुद्ध लढत राहिले. इतके ते स्वाभिमानी होते. अण्णा जितके कनवाळू होते, तितकेच बाणेदार होते. संत गाडगेबाबा बाळासाहेब खेर यांना भेटले आणि त्यानंतर रयत शिक्षण संस्थेचे अनुदान पुन्हा सुरू झाले. अण्णा आर्थिक अडचणीत असताना एक व्यापारी त्यांना म्हणाला, ‘मी तुम्हाला पैसे देतो; पण तुम्ही कॉलेजला दिलेले शिवाजीराजांचे नाव बदला आणि माझे नाव कॉलेजला द्या.’
तेव्हा अण्णांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, ‘एक वेळ जन्मदात्या बापाचे नाव बदलेन; पण एकदा कॉलेजला दिलेले शिवाजीराजांचे नाव मी कधीही बदलणार नाही. इमान विकून पैसे घेतले तर हा भाऊ पाटील मेला.’
पैशासाठी त्यांनी कधीही आपली निष्ठा बदलली नाही. अण्णा महान शिवप्रेमी होते. मात्र त्यांनी शिवाजीराजांचे नाव घेऊन तरुणांच्या डोक्यात द्वेष आणि हातात दगड-धोंडे किंवा तलवारी दिल्या नाहीत; तर त्यांच्या हातात पाटी, पुस्तक आणि लेखणी दिली. त्यांनी असंख्य विद्यार्थी घडवले. आज रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी जगभर विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत.
कर्मवीर अण्णांनी शिवरायांचे नाव घेऊन शाळा उभारल्या. जाती-जातींत आणि धर्मा-धर्मांत प्रेम, समता आणि आपुलकीची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तरुणांना डॉक्टर, वकील, अभियंते, न्यायाधीश आणि उद्योजक होण्याची संधी मिळवून दिली.
अण्णा हे महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते होते. १९०६ साली सयाजीराव गायकवाड यांनी अस्पृश्योद्धाराबाबत केलेले भाषण वाचल्यानंतर अण्णांच्या मनात उपेक्षित वर्गाबद्दलची तळमळ अधिक तीव्र झाली. पुढे शाहू महाराजांच्या छत्रछायेखाली त्यांचे शिक्षण झाले आणि सामाजिक समतेचा विचार त्यांच्या जीवनकार्याचा केंद्रबिंदू बनला.
कर्मवीर भाऊराव अण्णांनी सत्यशोधकी विचारांसाठी मरण पत्करले, परंतु सनातनी विचारधारेला ते कधीही शरण गेले नाहीत. बाळासाहेब खेर यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कर्मवीर अण्णांच्या रयत शिक्षण संस्थेचे अनुदान बंद केले, तरी अण्णा आपल्या विचारांपासून ढळले नाहीत. शेवटपर्यंत पुरोगामी वृत्ती आणि तत्त्वनिष्ठा त्यांनी सोडली नाही.
ते नीतिमान, निःस्वार्थी, निष्कलंक, निर्भय, निर्व्यसनी आणि निःपक्षपाती होते. त्यांनी डोंगरदऱ्यांत आणि दुष्काळी भागांत शाळा उभारल्या. अनेक जमीनदार, सरदार आणि शेतकऱ्यांनी त्यांना मोठ्या मनाने देणग्या दिल्या. सातारच्या छत्रपतींनीही संस्थेसाठी जमीन दिली. ‘घेणारे हात स्वच्छ असतील, तर देणारे लाखो हात पुढे येतात’ याचे मूर्तिमंत उदाहरण अण्णांचे जीवन होते. अण्णा स्वच्छ मनाचे आणि स्वच्छ वृत्तीचे होते.
‘कमवा आणि शिका’ आणि स्वावलंबी शिक्षण हे अण्णांचे धोरण होते. मन, मनगट आणि मेंदू सक्षम करणारे शिक्षण असावे, हा त्यांचा आग्रह होता. विद्यार्थ्यांबरोबर अण्णा स्वतः काम करायचे. विद्यार्थ्यांबरोबर पंक्तीला जेवायचे. एखादा विद्यार्थी आजारी पडला तर अण्णा स्वतः रात्रभर जागून त्याची सेवा करायचे. विद्यार्थ्यांसाठी अण्णा जणू आईच होते.
कर्मवीर अण्णांच्या या अद्वितीय कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने आणि पुणे विद्यापीठाने डी.लिट. पदवीने सन्मानित केले. अशा या शैक्षणिक क्षेत्रातील संततुल्य शिक्षणमहर्षींचे ९ मे १९५९ रोजी निधन झाले.
अण्णांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या राज्यात आणि परराज्यांत आज सुमारे ६५० शाखा आहेत. आशिया खंडातील एक महत्त्वाची शिक्षणसंस्था म्हणून रयत शिक्षण संस्थेचा लौकिक आहे. अत्यंत तळमळीने काम करणारे शिक्षक आणि शिक्षणाची व्यापक परंपरा ही या संस्थेची ओळख बनली आहे.
शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्याचे साधन नसून माणूस घडवण्याचे माध्यम आहे, हा विचार कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपल्या कार्यातून समाजासमोर ठेवला. शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक समता, स्वाभिमान, स्वावलंबन आणि मानवता रुजविणाऱ्या या शिक्षणमहर्षींचे कार्य महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील या शैक्षणिक क्षेत्रातील संततुल्य, तत्त्वनिष्ठ शिक्षणमहर्षींना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!