ऊस उत्पादन वाढविण्यासाठी पाणी महत्त्वाचे असले, तरी किती पाणी आणि केव्हा द्यायचे, हे अधिक महत्त्वाचे आहे. गरजेपेक्षा जास्त पाणी दिल्याने उत्पादन वाढण्याऐवजी जमिनीचे आरोग्य बिघडण्यासोबतच वीज, मजुरी आणि निविष्ठांचा खर्च वाढतो. त्यामुळे पिकाच्या गरजेनुसार पाणी देण्याची अचूक पद्धत आता ऊसशेतीत आवश्यक ठरत आहे. जमिनीतील ओलावा मोजून पिकाला पाणी देण्याची योग्य वेळ सांगणाऱ्या मॉइश्चर सेन्सरच्या वापरामुळे पाण्याच्या व्यवस्थापनात अचूकता येऊन ऊस उत्पादन वाढण्यास मदत होते. याच उद्देशाने क्रांती साखर कारखान्याने ऊस विकास योजनेतून शेतकऱ्यांना मॉइश्चर सेन्सर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
— जयप्रकाश साळुंखे, व्हाईस चेअरमन, क्रांती साखर कारखाना, कुंडल
पिकाच्या गरजेनुसार पाणी देण्याची गरज
पाणी ही शेतीची अमूल्य नैसर्गिक संपत्ती आहे. ऊस हे दीर्घ मुदतीचे बागायती पीक असल्याने त्याला तुलनेने अधिक पाण्याची गरज असते. मात्र पिकाला आवश्यकतेपेक्षा अधिक पाणी दिल्यास त्याचा थेट परिणाम जमिनीच्या आरोग्यावर होतो. पाण्याचा अतिरिक्त वापर झाल्यामुळे उत्पादन खर्च वाढतो आणि अपेक्षित एकरी उत्पादन मिळण्याऐवजी त्यात घट होण्याची शक्यता असते.
क्रांती साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सुमारे ६२ टक्के क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आले आहे. तरीही नदीकाठच्या अनेक गावांमध्ये आजही पाटपाण्याद्वारे ऊसशेती केली जाते. सर्वसाधारणपणे पाटपाण्याने आडसाली ऊस पिकाला सुमारे १.५० कोटी लिटर, पूर्वहंगामी पिकाला १.२० कोटी लिटर, तर सुरू व खोडवा पिकाला सुमारे १ कोटी लिटर पाणी लागते. प्रत्यक्षात मात्र सुमारे २.५० कोटी लिटरपर्यंत पाण्याचा वापर होत असल्याचे दिसून येते. पाण्याच्या या अतिरिक्त वापरामुळे जमिनीच्या आरोग्यासोबतच वीज आणि मजुरीचा खर्चही वाढतो. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने आणि पिकाच्या गरजेनुसार वापर करणे ही काळाची गरज आहे.
जमिनीतील ओलावा मोजणार मॉइश्चर सेन्सर
पिकाला पाणी देताना शेतातील जमिनीमध्ये प्रत्यक्ष किती ओलावा आहे, हे समजणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी मॉइश्चर सेन्सर उपयुक्त ठरतो. हा जमिनीतील ओलावा मोजणारे इलेक्ट्रॉनिक उपकरण असून पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पाण्याची गरज ओळखण्यास मदत करतो. मॉइश्चर सेन्सरच्या माध्यमातून जमिनीतील ओलाव्याची माहिती मोबाईलवर मिळते. त्यामुळे शेतकऱ्याला केवळ अंदाजावर अवलंबून राहावे लागत नाही. पिकाला पाणी देण्याची गरज आहे की नाही, हे अधिक अचूकपणे समजू शकते. एकदा पाणी दिल्यानंतर पुढील पाणी कधी द्यावे, याबाबतही सूचना मिळतात. यामुळे गरज नसताना पाणी देणे किंवा पिकाला आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी देणे टाळता येते. पाण्याचा अचूक वापर झाल्यामुळे पाण्याची बचत होण्यासोबतच वीज व मजुरीच्या खर्चातही बचत होऊ शकते.
पाण्याच्या अतिरेकाचा जमिनीवर परिणाम
पाणी जास्त दिल्यामुळे केवळ पाण्याचा अपव्यय होत नाही, तर जमिनीत क्षारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. पाण्याची गुणवत्ता हा देखील ऊसशेतीतील महत्त्वाचा घटक आहे. विशेषतः पाण्यातील ईसी (विद्युत वाहकता) आणि टीडीएस यांचा विचार करणे आवश्यक आहे. जास्त टीडीएस असलेले पाणी सातत्याने दिल्यास जमिनीमध्ये अतिरिक्त क्षार साचू शकतात. त्यामुळे पाण्याची उपलब्धता असण्याबरोबरच त्याचा योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी वापर होणे आवश्यक आहे.
ठिबक सिंचनाला सेन्सरची जोड
ठिबक सिंचनामुळे पाणी थेट पिकाच्या मुळांच्या परिसरात देता येते. मात्र ठिबक असूनही पाणी किती वेळ आणि किती प्रमाणात द्यायचे, याचे योग्य नियोजन नसेल तर पाण्याची बचत अपेक्षित प्रमाणात होऊ शकत नाही. त्यामुळे ठिबक सिंचनाला मॉइश्चर सेन्सरची जोड दिल्यास पाणी व्यवस्थापन अधिक शास्त्रीय पद्धतीने करता येते. सेन्सर बसविल्यानंतर ४ ते ६ इंचांवर लॅटरल ठेवावी. मशागत करताना लॅटरल सेन्सरपासून दूर जाणार नाही, याची काळजी घ्यावी. सेन्सर बसविल्यानंतर नियोजनानुसार दोन ते तीन ठिबकचे पाणी द्यावे आणि त्यानंतर सेन्सरच्या सूचनेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
शेतातील ठिबकच्या वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्यक्ष किती पाणी मिळते, हे तपासण्यासाठी दोन-तीन ठिकाणी डिस्चार्ज मोजणेही आवश्यक आहे. ठिबकची लांबी, प्लॉटचे अंतर, मोटारची क्षमता, हेड आदी बाबींचा पाण्याच्या वितरणावर परिणाम होतो.
पाणी आणि खत व्यवस्थापनातही फायदा
पिकाला खत देताना त्यासोबत अनावश्यक पाणी देण्याची पद्धत टाळणे आवश्यक आहे. पिकाला पाण्याची गरज असतानाच पाण्यासोबत खत दिल्यास त्याचा अधिक परिणामकारक वापर करता येतो. मॉइश्चर सेन्सरमुळे मागील आठवड्यात, पंधरवड्यात किंवा महिन्यात जमिनीमध्ये किती टक्के ओलावा राहिला, याची माहिती मिळू शकते. संबंधित प्लॉटवर झालेल्या खर्चाची नोंदही ठेवता येते. या माहितीचा उपयोग पुढील हंगामातील पाणी व खत व्यवस्थापनाचे नियोजन करण्यासाठी करता येतो.
उत्पादनात १५ टक्क्यांपर्यंत वाढीची शक्यता
गरजेनुसार पाणी दिल्यामुळे ऊस उत्पादनात सुमारे १५ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर रासायनिक खतांच्या खर्चात सुमारे २० टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकते. पाण्याचा कार्यक्षम वापर झाल्यामुळे जमिनीचे आरोग्य संवर्धन करण्यासही मदत होते.
लागण हंगाम २०२६-२७ मध्ये कारखान्यामार्फत फायालो कंपनीचे सेन्सर्स पात्र शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. एका सेन्सरची किंमत १० हजार ५०० रुपये असून त्यामध्ये एक वर्षाचा रिचार्ज समाविष्ट आहे. यापैकी ५ हजार रुपये शेतकऱ्यांनी कारखान्याकडे रोखीने भरायचे असून उर्वरित ५ हजार ५०० रुपये उधारीने उपलब्ध करून दिले जाणार आहेत. ही रक्कम गाळप हंगाम २०२६-२७ मध्ये ऊस बिलातून बिनव्याजी वसूल केली जाणार आहे. सेन्सर बसविल्यानंतर शेतकऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण, देखभाल आणि विक्रीनंतरची सेवा कंपनी व कारखान्यामार्फत दिली जाणार आहे.
शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा
ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गाळप हंगाम २०२६-२७ साठी लागण ऊस नोंद आहे किंवा सोयाबीन-भुईमूग यांसारखी पिके आहेत, त्यांनी सेन्सरसाठी नोंदणी करावी. लागण ऊस गाळपासाठी आल्यानंतर किंवा हंगामी पीक निघाल्यानंतर त्या शेतात सेन्सर बसवून देण्यात येणार आहे. ऊस शेतीमध्ये उत्पादन वाढविताना पाण्याचे अचूक व्यवस्थापन हा महत्त्वाचा टप्पा आहे. केवळ अधिक पाणी उपलब्ध आहे म्हणून ते अधिक प्रमाणात देण्यापेक्षा पिकाला जेवढी गरज आहे तेवढेच पाणी देणे अधिक फायदेशीर ठरते. मॉइश्चर सेन्सरमुळे हा निर्णय अंदाजाऐवजी जमिनीतील ओलाव्याच्या माहितीच्या आधारे घेता येतो. त्यामुळे पाण्याचा कार्यक्षम वापर, उत्पादनवाढ, खर्चात बचत आणि जमिनीचे आरोग्य अशा अनेक बाबींमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे.
क्रांतीच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून आपल्या शेतातील पाणी व्यवस्थापन अधिक अचूक करावे आणि त्यातून ऊस उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
मॉइश्चर सेन्सरची वैशिष्ट्ये : मॉइश्चर सेन्सरमध्ये सेन्सरसोबत सिमकार्ड, बॅटरी आणि बॅटरी चार्जिंगसाठी सौरऊर्जा पॅनेलचा समावेश आहे. या सेन्सरचे अंदाजे आयुष्य पाच वर्षांचे आहे. सेन्सरवरील माहिती मोबाईलवर उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्याला शेतात प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही ओलाव्याची स्थिती जाणून घेता येते.
सेन्सरनंतरही योग्य देखभाल महत्त्वाची : सेन्सर बसविल्यानंतर त्याच्या सूचनेनुसार पाणी व्यवस्थापन करण्याबरोबरच सेन्सरची योग्य देखभाल करणे आवश्यक आहे. सेन्सर खरेदीवेळी एक वर्षाचा रिचार्ज देण्यात आला आहे. त्यानंतरचा रिचार्ज खर्च शेतकऱ्यांनी स्वतः करावयाचा आहे. सेन्सरच्या वापरानंतर शेतकऱ्यांना प्रशिक्षण व देखभाल सेवा कंपनी आणि कारखान्यामार्फत उपलब्ध करून दिली जाणार आहे.