फलज्योतिषाचा बागुलबुवा

हटके

फलज्योतिषाचा बागुलबुवा

फलज्योतिषाचा बागुलबुवा

क्रांती wave 08 Jul 2026 5 मिनिटे वाचन 9 views
Facebook WhatsApp X
फलज्योतिषाचा बागुलबुवा – जगदीश काबरे
फलज्योतिषासंबंधी विचार करतांना ग्रहताऱ्यांच्या परिणामाचा मुद्दा प्रकर्षाने लोकांना जाणवत राहतो. भविष्याबद्दलचे कुतूहल समजू शकते. पण त्यासाठी निसर्गातील ग्राहगोलांना वेठीस धरणं समजू शकत नाही. भविष्यकाळ उज्ज्वल व्हावा म्हणून प्रयत्न केलेले समजू शकतात. पण त्या प्रयत्नांच्या जोडीला नशीब, देव-देव यांचा आधार घ्यावा लागणं हे समजू शकत नाही. विचारांची पायवाट फलदायी ठरणारी असते, हे आपल्याला कळतं. पण त्याच वेळेस कष्टांना घाबरून भावनाशीलतेच्या आहारी जात ज्योतिषांच्या हातातलं बाहुलं बनणं समजू शकत नाही. या विसंगतीपूर्ण वागण्यामागची कारणं निव्वळ भविष्याविषयीची अनाकलनीयता असते की, आत्मविश्वासाचा अभाव? आपण एकाच वेळेस 'आपला हात जगन्नाथ' म्हणत 'प्रयत्नांती रगडीता वाळूचे कण त्यातून तेलही गळे' असा प्रयत्नवादाचा जयघोष करत असतो, तर त्याचवेळेस दुसरं मन मात्र आपला हात ज्योतिषमार्तंडांच्या हातात देऊन भाग्य उजळण्याची पळवाट शोधत असतं. 
ह्याचं एक कारण असंही असू शकेल की, माणसाचं मन विचारांपेक्षा भावनेच्या आहारी सहज आधीन होतं. कारण भावनाशीलता ही माणसाला आभासी का होईना पण तात्काळ चिंतामुक्त करते. मनाला हवी तशी उत्तरं शोधते. तर बुद्धिनिष्ठता मनाला सतत बोचणी लावत असते. सतत विचार करायला प्रवृत्त करते. स्वाभाविकच मानवी मन हे सोयीच्या भावनांना बळी पडतं आणि हे बळी पडणंच माणसाच्या आत्मविश्वासाला तडा देतं, मन कमकुवत करतं. हळूहळू अशी वेळ येते की, माणूस विचार करणंच टाळायला लागतो. विचार करणं म्हणजे डोक्याला नसती कटकट वाटायला लागते. परिणामी एवढ्या-तेवढ्या गोष्टींना मानवी मन घाबरू लागते. मग प्रयत्नाची वाट चोखाळण्याऐवजी माणूस सुखाचा शॉर्टकट शोधायला धावतो आणि अंधश्रद्धेचा बळी ठरतो. मग ज्योतिषांचे चक्र त्याच्यामागे शुक्लकाष्ठासारखे  चालूच राहाते. या चक्रात आपण पिळून निघतोय असं मात्र त्याला कधीही वाटत नाही हे विशेष. कारण तोपर्यंत त्याच्या मनाने प्राक्तन, नशीब, दैव, भोग ह्या सर्वांचा असा घट्ट हात पकडलेला असतो की, हेच शब्द त्याला पूर्वजन्मीचे कर्म असं वाटायला लावून सगळं सहन करायला शिकवत असतात. हीच खरी माणसाच्या आयुष्याची शोकांतिका असते. गगनाला गवसणी घालण्याची विजिगिषू वृत्ती बाळगणारा माणूस दुसऱ्या बाजूनं मात्र असा गर्भगळीत झालेला, नियतीच्या हातातलं वाहूलं बनलेला दिसतो. ह्या दुर्विलासाला काय म्हणावं?
वैज्ञानिक दृष्टिकोनाने विचार केला तर आपल्या सहज लक्षात येते की, आकाशातील ग्रह आणि राशी (तारकापुंज) यांचा माणसाच्या जीवनावर काही परिणाम होतो याला यत्किंचितही पुरावा नाही. असा कोणताच परिणाम होत नाही असे सर्व वैज्ञानिक नि:संदिग्धपणे सांगतात. म्हणून फलज्योतिष, त्यांतील ग्रहयोग, युती-प्रतियुतीचे परिणाम, शनीची साडेसाती, मंगळाचा कोप, इ. सर्व संकल्पना निरर्थक आहेत. थोडक्यात फलज्योतिष हे एक भंपक विज्ञान (स्यूडो सायन्स) आहे, हे वारंवार सिद्ध झाले आहे. फलज्योतिषाचा अभ्यास छद्म विज्ञानाच्या मागे लपतो. एवंच फलज्योतिष विषयावरील पुस्तके वाचणे आणि त्यावर आपले जीवन बेतणे हा केवळ नुसता कालापव्ययच नाही तर मानसिक आणि आर्थिक नुकसानीचेही आहे.JK