सध्या पाऊस, सोबतच वाऱ्याचा जोर यामुळे अनेक ठिकाणी आडसाली ऊस आडवा होण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः नुकतेच पाणी दिलेल्या उसाच्या शेतात ही समस्या अधिक गंभीर होते. पाऊस आणि वारा एकत्र आल्यावर भरदार झालेला ऊस एका बाजूला झुकतो आणि काही वेळातच संपूर्ण प्लॉट आडवा होतो. एकदा ऊस अस्ताव्यस्त पडला की तो पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न करणेही अनेकदा धोकादायक ठरते. त्यामुळे नेमके काय करावे, याबाबत शेतकऱ्यांत संभ्रम असतो. त्यासाठी हे मार्गदर्शन.
पडलेल्या उसामुळे केवळ उत्पादनाचे नुकसान होत नाही, तर शेतातील व्यवस्थापनही अडचणीचे होते. पाणी देणे, दारी धरणे, शेतात फिरणे, कीड-रोगाची पाहणी करणे, तसेच पुढील काळात ऊसतोडणी करणे या सर्वच कामांमध्ये अडथळे निर्माण होतात. त्यामुळे ऊस पूर्णपणे लोळण्याची वाट पाहण्यापेक्षा तो पडण्यापूर्वीच योग्य पद्धतीने नियोजन करून घेणे अधिक फायदेशीर ठरते. ऊस साधारण १५ ते १६ कांडीवर आल्यानंतर त्याचे वजन झपाट्याने वाढू लागते. या काळात ऊस हळूहळू एका बाजूला कलायला सुरुवात करतो. हाच काळ ऊस पडण्यापूर्वीची पूर्वतयारी करण्यासाठी महत्त्वाचा असतो.
पडण्यापूर्वी रेलून घेणे महत्त्वाचे
ऊस लोळण्यास सुरुवात होण्यापूर्वी शेताच्या बाहेरील चारी बाजूंनी ऊस आतल्या बाजूला दाबून म्हणजेच रेलून घेता येतो. यामुळे ऊस बाहेरच्या बाजूला पसरण्याऐवजी प्लॉटच्या आतल्या बाजूला झुकतो. परिणामी शेताच्या कडेला मोकळी जागा राहते आणि प्लॉटच्या चारही बाजूंनी व्यवस्थित फिरता येते. याचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे शेजारील शेतकऱ्यांच्या उसामध्ये आपला ऊस जाण्याची शक्यता कमी होते. पाणी देताना दारी धरण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध राहते. दारी धरण्याच्या ठिकाणी ऊस आतल्या बाजूला रेलून घेतल्यामुळे तो पुन्हा बाहेरच्या दिशेने फिरून येत नाही. त्यामुळे नंतर पाऊस किंवा वारा आला आणि ऊस पडला, तरी पाणी व्यवस्थापनात फार मोठी अडचण निर्माण होत नाही. ऊस रेलून घेण्याची पद्धत प्रत्येक शेताच्या परिस्थितीनुसार ठरवावी. मातीचा प्रकार, उसाची वाढ, वाऱ्याची दिशा, पाण्याची व्यवस्था आणि उसाची जाडी यांचा विचार करणे आवश्यक आहे.
ड्रिपची लॅटरल वरंब्यावर ठेवू नका
सध्या अनेक शेतकरी ठिबक सिंचनाचा वापर करतात. अशा वेळी ऊस पडण्यापूर्वी ड्रिपची लॅटरल वरंब्यावर असेल, तर ती शक्य असल्यास सरीमध्ये खाली घेणे फायदेशीर ठरते. कारण ऊस आडवा झाल्यानंतर त्याचा मोठा भार ड्रिपच्या लॅटरलवर पडू शकतो. त्यामुळे पाण्याचा प्रवाह अडण्याची शक्यता असते. काही ठिकाणी लॅटरल दाबली जाऊन पाणी समान प्रमाणात पोहोचत नाही. त्याचा परिणाम उसाच्या वाढीवर होऊ शकतो. याशिवाय तोडणीच्या वेळीही वरंब्यावर असलेल्या लॅटरलचे नुकसान होण्याची शक्यता असते. कोयता किंवा इतर अवजार लागून लॅटरल कापली जाणे, फुटणे किंवा मोठ्या प्रमाणात नुकसान होणे शक्य आहे. त्यामुळे ऊस पडण्यापूर्वी ड्रिपची योग्य व्यवस्था करून ठेवणे हा भविष्यातील खर्च आणि त्रास कमी करण्याचा एक मार्ग ठरतो.
किती वाटा ठेवाव्यात?
हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. प्लॉटमध्ये आत जाण्यासाठी, पाणी पाहण्यासाठी किंवा दारी धरण्यासाठी काही शेतकरी मोठ्या प्रमाणात उभ्या-आडव्या वाटा म्हणजेच भांगे ठेवतात. काहीजण पाच-सहा सरींनंतर वाट ठेवतात, तर काहीजण आठ-नऊ सरींनंतर वाट ठेवतात. काही ठिकाणी प्रत्येक खांडामध्ये उभी वाट करून त्याला आडवा ऊस दाबून खोप करण्याची पद्धतही आढळते. परंतु प्रश्न असा आहे की, उसामध्ये वाटा जितक्या जास्त, तितका उत्पादनावर त्याचा परिणाम होतो का? अनुभवातून पाहिले तर अनावश्यकपणे जास्त वाटा आणि खोप केल्याने उसाच्या वाढीवर आणि अंतिम उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. कारण ज्या ठिकाणी जादा वाटा काढल्या जातात, त्या ठिकाणी उसाची सलगता तुटते. त्या भागात मुळांना धक्का बसतो. मातीची घट्ट पकड कमी होते. पावसाळ्यात किंवा जोरदार वाऱ्यात अशा ठिकाणी ऊस पुन्हा आडवा होण्याची शक्यता वाढते. काही वेळा मुळ्या तुटून उसाचे संपूर्ण बेटच जमिनीवर आडवे होते. काही बेटे मुळासकट उखडली जातात. अशी बेटे तोडणीपर्यंत जमिनीवर पडून राहिल्यास त्यातील ऊस वाळण्याचे प्रमाण वाढू शकते.
वाटा जास्त म्हणजे उत्पादन कमी?
उसाच्या शेतात वाटा ठेवण्यामागे शेतकऱ्यांचा उद्देश चांगला असतो. शेतात सहज जाता यावे, पाण्याची दारी धरता यावी, औषध फवारणी करता यावी, पाहणी करता यावी, यासाठी वाटा ठेवण्यात येतात. परंतु सुविधा आणि उत्पादन यामध्ये योग्य समतोल असणे आवश्यक आहे. जितक्या जास्त ठिकाणी वाटा आणि खोप केली जाते, तितक्या ठिकाणी सलग वाढ खंडित होते. अशा ठिकाणी मुळांना धक्का बसणे, बेटे सैल होणे आणि पुढे ऊस आडवा होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. तोडणीच्या वेळीही अशा ठिकाणचा वाळका, मरका किंवा जळका ऊस अधिक प्रमाणात निघण्याचा अनुभव अनेक शेतकऱ्यांनी सांगितला आहे. शेतकऱ्याने स्वतःच्या प्लॉटमध्ये याचा प्रयोग करून पाहणे अधिक योग्य ठरेल. वाटा असलेल्या भागातील आणि नसलेल्या भागातील उसाची वाढ, जिवंत उसाची संख्या, बेटांची स्थिती आणि शेवटी मिळणारे वजन यांची तुलना केली, तर फरक लक्षात येऊ शकतो. काही शेतकरी उत्तम वाढ झालेला, भरदार आणि वजनदार ऊस उभा करतात; मात्र नंतर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात उभ्या-आडव्या वाटा पाडतात. त्यामुळे सुरुवातीला मिळवलेली चांगली वाढ आणि उत्पादनक्षमता काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता असते. शेतकऱ्याच्या भाषेत सांगायचे झाले तर, ‘ऊस एक नंबर आणला; पण नंतर जास्त वाटा पाडून त्याची वाट लावली’, अशी परिस्थिती निर्माण होऊ नये.
निर्णय शेतकऱ्याचा; पण नियोजन महत्त्वाचे!
याचा अर्थ प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतात एकही वाट ठेवू नये, असा नाही. प्रत्येक शेताची परिस्थिती वेगळी असते. काही ठिकाणी जमीन, पाण्याची पद्धत, शेताचा आकार, उतार, वाऱ्याची दिशा आणि वाढ यानुसार वाट आवश्यक असू शकते. मात्र, गरज नसताना भरपूर वाटा पाडणे आणि प्रत्येक काही सरींनंतर खोप करणे टाळणे गरजेचे आहे. शेतात आत-बाहेर जाण्यासाठी, पाणी व्यवस्थापनासाठी किंवा आवश्यक त्या कामासाठी फार फार तर एखादी उभी अथवा आडवी वाट ठेवता येईल. पण प्रत्येक काही सरींनंतर वाटा पाडल्याने उत्पादन वाढते, असे गृहीत धरणे योग्य नाही. शेतकऱ्याने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, उसाला वाढण्यासाठी जितकी मोकळी जागा आणि मुळांना जमिनीची घट्ट पकड आवश्यक आहे, तितकेच त्याचे संरक्षण आणि व्यवस्थापनही महत्त्वाचे आहे. आडसाली ऊस भरदार झाल्यानंतर त्याचे वजन मोठे होते. अशा वेळी पाऊस आणि वारा आला की ऊस पडण्याची शक्यता वाढते. त्यामुळे पडल्यावर उपाय करण्यापेक्षा पडण्यापूर्वीच त्याची योग्य व्यवस्था करणे हा अधिक शहाणपणाचा मार्ग आहे. बाहेरील बाजूने ऊस आतल्या बाजूला रेलून घेणे, दारी धरण्यासाठी आवश्यक जागा ठेवणे, ठिबकची लॅटरल सुरक्षित ठेवणे, अनावश्यक वाटा टाळणे आणि कीड-रोगाची नियमित पाहणी करणे या साध्या उपायांमुळे उसाचे व्यवस्थापन अधिक सुलभ होऊ शकते. शेवटी प्रश्न केवळ ‘वाटा किती ठेवाव्यात?’ एवढाच नाही. प्रश्न आहे तो ‘वाटा ठेवताना उसाच्या उत्पादनक्षमतेला किती धक्का बसतो?’ हा विचार प्रत्येक शेतकऱ्याने करायला हवा. ऊस उभा करण्यासाठी केलेली वर्षभराची मेहनत शेवटच्या टप्प्यात केवळ चुकीच्या नियोजनामुळे वाया जाऊ नये. उसाला भरपूर वाढ मिळवून देणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच त्या वाढलेल्या उसाचे संरक्षण करून त्याचे वजन आणि जिवंत कांड्यांची संख्या तोडणीपर्यंत टिकवणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच माझ्या अनुभवातून मी एवढेच सांगतो, उसामध्ये गरजेपुरत्याच वाटा ठेवा; अनावश्यक भांगे आणि खोप टाळा. ऊस पडण्यापूर्वीच त्याला योग्य पद्धतीने रेलून घ्या. सलग ऊस, मजबूत मुळे आणि कमी वाळका ऊस हेच चांगल्या उत्पादनाचे महत्त्वाचे आधार आहेत. शेतीत प्रत्येक निर्णयाचा परिणाम शेवटी वजनकाट्यावर दिसतो. त्यामुळे सोय पाहताना उत्पादनाचा विचारही तितक्याच गांभीर्याने करणे गरजेचे आहे.
क्लोरो ग्रॅन्युल आणि युरियाबाबत नियोजन
ऊस लोळण्यापूर्वी काही शेतकरी एकरी ५ किलो १० टक्के क्लोरो ग्रॅन्युल आणि १० किलो युरिया मिसळून वरंब्यावर देतात. यामुळे शेतातील काही कीड व्यवस्थापनास मदत होईल, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. विशेषतः लोकरी मावा किंवा उंदरांचा प्रादुर्भाव असल्यास या उपायाचा वापर काही शेतकरी करतात. मात्र, कोणतेही कीटकनाशक किंवा ग्रॅन्युलर औषध वापरण्यापूर्वी उत्पादनाच्या लेबलवरील शिफारस, पिकासाठी मंजुरी, योग्य मात्रा आणि सुरक्षित वापराची पद्धत तपासणे अत्यंत आवश्यक आहे. युरियासोबत कीटकनाशक मिसळण्याबाबतही स्थानिक कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. केवळ अनुभवाच्या आधारावर मात्रा वाढवणे किंवा वेगवेगळी उत्पादने स्वतःहून मिसळणे टाळावे. औषधाचा वापर केल्यानंतर पाणी देणे आणि त्यानंतर ऊस योग्य पद्धतीने आतल्या बाजूला रेलून घेणे, अशी शेतकऱ्यांची पद्धत काही ठिकाणी पाहायला मिळते.
वाटा न ठेवताही व्यवस्थापन शक्य
मी गेली अनेक वर्षे भांगे म्हणजेच वाटा पाडत नाही. ऊस लोळण्यापूर्वी शेताच्या बाहेरील चारी बाजूंनी ऊस आतल्या बाजूला रेलून घेतो. त्यामुळे ऊस बाहेरच्या बाजूला पसरण्याऐवजी आतल्या बाजूला झुकतो. प्लॉटमध्ये आत जाण्यासाठी किंवा पाणी पाहण्यासाठी मी स्वतंत्र वाट ठेवत नाही. उसामध्ये मावा पडला आहे की नाही, याची पाहणी करण्यासाठीही काही लक्षणे लक्षात घेता येतात. माव्याचा प्रादुर्भाव असल्यास पाण्याबरोबर किंवा कडेला पांढरा थर दिसू शकतो. अशा वेळी परिस्थितीनुसार योग्य कीटकनाशकाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, माझ्या अनुभवात माव्याचा प्रादुर्भाव आढळल्यास एकरी साधारण १ लिटर क्लोरो-सायपरचा वापर पाटपाण्यातून किंवा ठिबकद्वारे करण्याची पद्धत आहे. मात्र, औषधाची मात्रा आणि वापरण्याची पद्धत ही संबंधित उत्पादनाच्या लेबलवरील शिफारशीप्रमाणे आणि कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच ठरवणे आवश्यक आहे. उसामध्ये अनावश्यक वाटा न ठेवल्यामुळे तोडणीच्या वेळी माझ्या प्लॉटमध्ये जळका, मरका आणि वाळका उसाचे प्रमाण अतिशय कमी राहते, असा माझा अनेक वर्षांचा अनुभव आहे. त्याचबरोबर अपेक्षित जिवंत उसाची संख्या मिळण्यास मदत होते. उत्पादनवाढीसाठी आपण जे लक्ष्य ठेवतो, त्या दिशेने पोहोचण्यासही सलग उसाचा फायदा होतो.