आजकाल आपल्या देशात एक नवीन व्यवसाय प्रचंड वेगाने वाढत आहे.
तो म्हणजे "सोशल पोलिसिंग".
या व्यवसायासाठी ना कोणती पदवी लागते, ना अनुभव, ना प्रशिक्षण, ना जबाबदारी. फक्त इंटरनेट कनेक्शन आणि दुसऱ्यांच्या आयुष्यात नाक खुपसायची इच्छा असली की पुरे.
तुम्ही ब्रेड खाताय?
"ब्रेड खाऊ नका, विष आहे."
तुम्ही पोळी थेट गॅसवर भाजली?
"असं करू नका, कॅन्सर होतो."
तुम्ही गाडी चिखलात घातली?
"गाडीची वाट लावली."
तुम्ही मोबाईल वापरलात?
"रेडिएशन होईल."
तुम्ही एसी वापरलात?
"नैसर्गिक जीवन जगा."
तुम्ही दूध प्यायलात?
"दूध विष आहे."
दूध बंद केलं?
"कॅल्शियम कुठून आणणार?"
तुम्ही सेंद्रिय शेती केली?
"यातून काही निघणार नाही."
रासायनिक शेती केली?
"जमीन संपवणार."
असं वाटतं की जगात अशी एकही गोष्ट उरलेली नाही ज्यावर कोणीतरी तुम्हाला काय करावं आणि काय करू नये हे सांगायला तयार नाही.
अलीकडे मी माझ्या एका मित्राचा व्हिडिओ केला होता. त्याचं आडनाव अग्रवाल आहे. तो उत्तम मराठी बोलतो. पण आमची मैत्री अनेक वर्षांची आहे आणि लहानपणापासून आमच्यात संवाद हिंदीमध्येच होत आला आहे. त्यामुळे व्हिडिओमध्ये मी त्याच्याशी हिंदीत बोलत होतो.
त्यावर लगेच प्रश्न आले.
"हिंदीत का बोललात?"
"मराठीत बोलायला हवं होतं."
पण मी कोणती भाषा बोलावी हे मी ठरवणार की इंटरनेटवरील स्वयंघोषित भाषा निरीक्षक?
दोन मित्रांमध्ये कोणत्या भाषेत संवाद व्हावा हे ठरवण्याचा अधिकार समाजाला कोणी दिला?
उद्या कदाचित काही लोक आपण घरी कोणत्या भाषेत बोलतो हेही ठरवायला लागतील.
समस्या सल्ला देण्यात नाही.
समस्या न मागितलेला सल्ला देण्यात आहे.
समस्या अनुभव सांगण्यात नाही.
समस्या प्रत्येक गोष्टीवर अंतिम सत्याचा मालक असल्यासारखं वागण्यात आहे.
आणि सर्वात मोठी समस्या म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्याचा स्वयंघोषित व्यवस्थापक बनण्यात आहे.
सोशल पोलिसिंग करणाऱ्या लोकांनी स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा.
तुमच्या आयुष्यात सगळं परफेक्ट आहे का?
तुमचा आहार परफेक्ट आहे का?
तुमची आर्थिक शिस्त परफेक्ट आहे का?
तुमचं आरोग्य परफेक्ट आहे का?
तुमचे नातेसंबंध परफेक्ट आहेत का?
तुम्ही पर्यावरणासाठी आदर्श नागरिक आहात का?
तुम्ही रोज व्यायाम करता का?
तुम्ही कधीही चूक करत नाही का?
जर उत्तर "हो" असेल तर अभिनंदन. तुम्ही बहुधा या पृथ्वीवरील पहिले परिपूर्ण मानव आहात.
आणि जर उत्तर "नाही" असेल, जे जवळजवळ प्रत्येक वेळी खरं असतं, तर मग दुसऱ्यांच्या आयुष्याचा पंच बनण्याची एवढी घाई का?
खरं सांगायचं तर स्वतःचं आयुष्य सुधारण्यापेक्षा दुसऱ्यांचं आयुष्य सुधारण्याचे सल्ले देणं खूप सोपं असतं.
स्वतःच्या चुका पाहण्यासाठी प्रामाणिकपणा लागतो.
दुसऱ्यांच्या चुका दाखवण्यासाठी फक्त बोट लागते.
आपल्या समाजात एक म्हण आहे.
"आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पाहावं वाकून."
सोशल मीडियाने या म्हणीला अक्षरशः जीवनमंत्र बनवलं आहे.
स्वतःच्या समस्या, चुका आणि कमतरता झाकून ठेवायच्या आणि दिवसभर दुसऱ्यांच्या आयुष्याचं ऑडिट करत बसायचं.
कदाचित आपण एक साधा नियम स्वीकारला तर बऱ्याच समस्या सुटतील.
जोपर्यंत कोणी तुमचं मत विचारत नाही, तोपर्यंत ते देणं बंधनकारक नाही.
जोपर्यंत कोणाच्या कृतीमुळे तुमचं किंवा समाजाचं प्रत्यक्ष नुकसान होत नाही, तोपर्यंत प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करणं आवश्यक नाही.
प्रत्येक प्रौढ व्यक्तीला स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे.
स्वतःच्या चुका करण्याचा अधिकार आहे.
आणि त्या चुकांमधून शिकण्याचा अधिकार आहे.
स्वातंत्र्य म्हणजे फक्त आपल्याला हवं ते करण्याचा अधिकार नाही.
स्वातंत्र्य म्हणजे इतरांनाही त्यांच्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे हे मान्य करणं.
बाकी, जगात पोलिसांची कमतरता असू शकते.
सोशल पोलिसांची मात्र अजिबात नाही.
-- मुक्तक जोशी